चीनने भारताच्या ‘जी २०’ दस्तऐवजांवर ‘वसुधैव कुटुम्बकम्’ असा शब्दप्रयोग करण्यास नुकताच विरोध नोंदवल्याचे वृत्त झळकले. संस्कृत ही संयुक्त राष्ट्रात मान्यता प्राप्त भाषा नसल्याच्या कारणावरून चीनने हा शब्दप्रयोग उचित नसल्याचे म्हटले आहे. गोव्यात ‘जी २०’ ऊर्जा बदल मंत्रिमंडळाच्या बैठकीचे परिणाम दस्तऐवज आणि अध्यक्षांच्या सारांशमध्ये ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा शब्दप्रयोग करण्यात आला होता, त्यावर चीनने आक्षेप घेतला. ‘जी २०’ दस्तऐवजामध्ये ‘वसुधैव कुटुम्बकम्’चे ‘एक पृथ्वी, एक परिवार, एक भविष्य’ असे इंग्रजी भाषांतर समाविष्ट आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या थीमचे अनावरण केले होते.
संयुक्त राष्ट्राच्या सहा अधिकृत भाषा अरबी, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश. पण, चीन हा ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या शब्दप्रयोगावर आक्षेप घेणारा एकमेव देश होता. इतर राष्ट्रांना या शब्दप्रयोगावर आक्षेपार्ह असे काहीही आढळले नाही. तसेच, अनेक देशांनी ‘जी २०’चा वर्तमान अध्यक्षपदाच्या नात्याने भारताला तसे करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. पहिले ‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणजे नेमकं काय, हे जाणून घेणे आवश्यक आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या परिकल्पनेचा पहिला उल्लेख महाउपनिषदात येतो. ‘वसुधा’ अर्थात पृथ्वी, ‘इव’ म्हणजे ही, ‘कुटुम्बकम्’ अर्थात कुटुंब. संपूर्ण पृथ्वी ही एकच कुटुंब आहे. अयं निजः परोवंति गणना लघुचेतसाम्। उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥
भारताच्या संसदेच्या प्रवेश कक्षासमोरही, हे वाक्य कोरलेलं आहे. म्हणजेच पृथ्वी एक कुटुंब आहे, असा अर्थ या वाक्यांशाचा होतो. याच उक्तीप्रमाणे नेहमीच भारताची कृती राहिलेली आहे. पाकिस्तानसोबत युद्ध जिंकल्यानंतर कित्येक पाक सैनिकांना भारताने मुक्त केले. कोरोना महामारीचे उगमस्थान अर्थात चीन. जगभरात कोरोना हाहाकार माजवत असताना चीनला आपल्या पापाची जराही लज्जा नव्हती. बलाढ्य देश असूनही चीनने अन्य कोणत्याही देशाला मदत करण्याची तसदी घेतली नाही. चीनच्या पापामुळे कित्येक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडून पडल्या. अशावेळी संपूर्ण जग हे एक कुटुंब समजून भारतच पुढे आला. कोरोनावर मात करण्यासाठी भारताने कोरोना प्रतिबंधक लस बनवली. संपूर्ण देशभरात मोफत लसीकरण मोहीम सुरू केली. एवढेच नाही तर श्रीलंका, ब्राझील, बांगलादेश, भूतान, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका अशा असंख्य देशांना लसपुरवठा केला. त्यावर ब्राझीलच्या राष्ट्रप्रमुखांनी हनुमानाचा फोटो द्विट करून भारताने ‘कोविड’ काळात केलेल्या मदतीबद्दल आभार मानले होते.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी वर्चस्व आल्यानंतर त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर धान्यपुरवठाही भारताने केला. श्रीलंकन अर्थव्यवस्था डबघाईला आल्यानंतर भारताने आर्थिक मदत देऊ केली. ही मदत करताना भारताला कोट्यवधी रूपये कमावता आले असते. परंतु, तसे भारताने केले नाही. भारताची विचारी संस्कृती आणि चीनची व्यापारी संस्कृती यांतील फरक त्यामुळे अधिक स्पष्ट होतो.गरीब आणि असाहाय्य देशांमध्ये मदत-सहकार्याच्या नावाखाली गुंतवणूक करायची, नंतर कर्ज द्यायचे आणि हळूहळू संपूर्ण देशच गिळंकृत करण्याचे मनसुबे आखायचे, ही चिनी नीती सर्वश्रुत. आपल्या स्वार्थासाठी चीन नेहमी लहानसहान देशांना धमक्या देऊन आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतो. भारताने मात्र चीनची आर्थिक कोंडी जागतिक स्तरावर वेळोवेळी केली. जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणार्या भारताची प्रगती चीनला न रूचणारी. त्यामुळे आता ‘वसुधैव कुटुम्बकम्’ सारख्या महान विचारालाही चीनने विरोध करण्याचा नतद्रष्टपणा दाखवला. रशिया-युक्रेन युद्धादरम्यानही भारताने शांततेच्या भूमिकेला कायम समर्थन दिले. दोन्ही देशांमध्ये संवादाचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
संत ज्ञानेश्वरांनीही ‘आता विश्वात्मके देवे,’ असे सांगत पसायदानाच्या माध्यमातून संपूर्ण जग कुटुंब असल्याचे म्हटले. भारताने आपल्या मित्रराष्ट्रांनाही वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला. शेजारील राष्ट्रांना भारत कधीही छेडण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु, चीन मात्र हे उद्योग कायम करत असतो. जागतिक स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यामुळे ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही भूमिका भारत प्रत्यक्षात जगत आला, आताही जगतोय आणि यापुढेही जगेल, यात काही शंका नाही. भले मग चीनने कितीही विरोधाचे किती का अश्रू ढाळले तरीही...