अजित पवारांना रक्ताने लिहिले पत्र; केली 'ही' मागणी
09-Jul-2023
Total Views |
मुंबई : राजकारण्यांचे समर्थक आपल्या नेत्यासाठी नेहमीच मैदानात उतरतात. त्यातच आता राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका तरुणाने स्वतःच्या रक्ताने लिहिलेले एक पत्र त्यांना दिले. या पत्राद्वारे नाईक घराण्यातील आमदार इंद्रनील नाईक यांनादेखील मंत्री करून नाईक घराण्याला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथदेखील घेतली. स्वतःच्या रक्ताने अजितदादांना पत्र लिहिणारी व्यक्ती मनोरा तालुक्यातील शेंदोना येथील आहे.
दरम्यान, आ. इंद्रनील नाईक हे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक व माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या घराण्यातील असून नाईक घराण्याचा महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोलाचा वाटा असून चौथ्या पिढीतील आ. इंद्रनील नाईक यांनादेखील मंत्री करावे अशी मागणी अजित पवारांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, रक्ताने लिहिलेले पत्र सोशल मीडियावर प्रसारित केले असून सध्या याची जोरदार चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.