म्हणे मराठी साहित्यिक सत्याला भिडत नाहीत! अर्थात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मांडलेला हा मुद्दा आहे, म्हटल्यावर त्याला मान द्यायलाच हवा. नसतील लिहीत लेखक, असतील घाबरत. पण, कोणी मज्जाव केला आहे का? लिहा म्हणावं! वास्तवावर भाष्य करण्यास साहित्यिक कमी पडत असतील, तर नवे साहित्यिक तयार करायला हवेत ना! साहित्यिक म्हणजे कोण? केवळ पुरस्कार प्राप्त लेखक किंवा संमेलनांचे अध्यक्ष म्हणजे साहित्यिक असतील, तर खरेच नव्या साहित्यिकांच्या शोधात जाण्याची गरज आहे. साहित्यिक तयार करण्याचे क्लासेससुद्धा आहेत म्हणे! त्यांच्या अभ्यासक्रमात हे विषय अंतर्भूत करण्याची गरज आहे. पण मूळ मुद्दा काय आहे? साहित्यिक सत्याला का भिडत नाहीत? तर ’राजकीय हैदोस माजतो, तेव्हा लेखकाला समकालीन आणि राजकीय वास्तवाच्या अनुषंगाने लिहिणे कठीण असते, बेधडकपणे लिहिता येत नाही. आणि म्हणूनच पडद्यामागून वास्तवावर बोट ठेवण्याचा प्रयत्न साहित्यिक करतो,’ हे असे घाबरट साहित्यिक रद्द करायला हवेत. महाशयांचे म्हणणे खरे आहे, वास्तवावर लिहिणार्या साहित्यिकांना वाव द्यायला हवा. वास्तवावर भाष्य करायची तयारी असेल, आपले राजकीय विचार निर्भीडपणे मांडण्याची तयारी असेल, तर आज साहित्यिक व्हायची सुवर्णसंधी आहे. या सर्व भीतीदायक वातावरणात राहूनदेखील तुम्ही मात्र वास्तवावर लिहिण्याचा, सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तरीही तुमच्या समीक्षा साहित्याचा फारसा विचार झालेला नाही. काय हो? म्हणजे आता सत्य समजून घेणारे आणि त्याला प्रतिसाद देणारे वाचकसुद्धा तयार करावे लागतील नाही का! दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकारण. बिचार्या साहित्यिकांना संमेलनात नेत्याच्या खुर्चीला खुर्ची लावून बसावे लागते. नाहीतर त्यांना कशाला भीती निर्भीडपणे व्यक्त व्हायची? खरेतर राजकीय नेत्यांनी संमेलनात मुळी हस्तक्षेप करूच नये, येऊही नये आणि मदतही करू नये. साहित्य निर्मितीसाठी संपूर्ण स्वातंत्र्य गरजेचे आहे. ते त्यांना कसे मिळेल, याचा विचार होणे आवश्यक आहे.
सत्यशोधक साहित्य
भारताला साहित्याचा वारसा पूर्वापार लाभलेला आहे. वर्षे उलटली, काळ बदलला तसे साहित्याचे नवनवे प्रकार दिसू लागले. आज तर साहित्याची माध्यमेही नवी रुपे घेत आहे. पूर्वी पेन कागदापुरतं विस्तार असलेलं साहित्य आज ब्लॉग्स, चित्रपट, वेबसिरीज, माहितीपट, सोशल मीडिया पोस्ट्स अशा सगळ्या माध्यमातून ओसंडून वाहतंय. प्राचीन भारतीय वाङ्मयात विनोदी साहित्य दिसून येत नाही. आज वपु आणि पुल आपल्या साहित्यात विनोदाला हवं तसं वळवतायत. पुलंनी शरद पवारांवर लिहिलेला लेख लोकांच्या चांगलाच स्मरणात आहे. सावरकरांनी तर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातूनच लेखणी सोडा नि बंदुका हाती घ्या, असे आव्हान प्रेक्षकांना केले होते. हाच अभिव्यक्त होण्याचा वारसा आजतागायत टिकून आहे. राजकीय वर्चस्ववादावर परखड भाष्य करणार्या कादंबर्या लिहिल्या जातात. ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ कांदबरीचे लेखक अरुण साधू यांनी काळावर लांबलचक ठसा उठवला. अभिजित पानसे, अरविंद जगताप, यांसारखे लेखक नियमितपणे वास्तवाला वाचा फोडत असतात. ‘झेंडा’ चित्रपट, ‘पुरूष’ सारखी नाटके किती म्हणून दाखले देता येतील. आज ‘काश्मीर फाईल्स’, ‘ताश्कन्द फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ यांसारखे चित्रपट वास्तव प्रकाशात आणतात आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो. अगदी ‘सैराट’ चित्रपट, तर महाराष्ट्रातल्याच वास्तवाचे दाखले देतो. आज राजकीय विषयांवर भाष्य करणारे साहित्य तुलनेत कमी आहे, मान्य. पण, व्हायला काय हरकत आहे? ‘कोबाड गांधी’ पुस्तक एक दहशतवादाशी संलग्न असलेल्या आणि शिक्षा भोगून आलेल्या माणसाने लिहिले आहे. त्याचे जाहीर प्रकाशन झाले. त्यावर कोणत्याही प्रकारची बंदी घातली गेली नाही. साहित्याचे प्रवाह समृद्ध आहेत, साहित्याला अनेक विषय आहेत. एक स्वतंत्र विचार घेऊन येणारा प्रत्येक कलाकार इथे आपापल्या माध्यमातून साहित्य निर्मिती करत असतो. शिल्पकार मूर्ती घडवतात, गायक आपल्याला भावलेल्या रागात गीते पुन्हा संगीतबद्ध करतात. अभिव्यक्तीची माध्यमे आणि प्रकार सतत बदलत असतात. बदलायला हवीत, समृद्ध व्हायला हवीत, निर्भीड व्हायला हवीत.
मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.