नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीसाठी दि. ८ जुलै रोजी मतदान होत आहे. पण सकाळपासून सुरू असलेले बॉम्ब हल्ले , गोळीबारांच्या घटनात आतापर्यत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण यात जखमी झाले आहेत. तसेच या हिंसाचारात काही मतदान केंद्रावर मतपत्रिका पेटी चोरण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या मतदानापूर्वी कूचबिहारच्या तुफानगंजमध्ये रात्री उशिरा खुनाची घटना उघडकीस आली आहे. यानंतर कूचबिहारमध्येच आणखी एक खुनाची घटना समोर आली आहे. या हत्येत भाजप कार्यकर्ता माधव विश्वास यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
मुर्शिदाबादच्या बेलडंगा येथेही एक घटना घडली होती ज्यात एका टीएमसी समर्थकाचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे, मुर्शिदाबादच्या खारग्राममध्ये टीएमसी कार्यकर्ता साबिरुद्दीनची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.बंगालच्या उत्तर चोवीस परगणा येथे अपक्ष उमेदवाराच्या समर्थकाचीही हत्या करण्यात आली. यानंतर सीपीएम कार्यकर्ता रेबिना बीबी यांना एका घटनेत गोळी लागल्याने त्यांना मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, तिथे त्यांचाही मृत्यू झाला.
पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या मतदानापूर्वी पहाटे मुर्शिदाबादच्या रायपूरमधील डोमकल क्रमांक आठमध्ये गोळीबार झाला. गोळी लागलेले दोघेही तृणमूल पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, सोहेल राणा आणि अमरुल बिस्वास असे पीडितेचे नाव असून त्यांना गोळी लागल्याने मुर्शिदाबादच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे, दुसऱ्या एका घटनेत उत्तर बंगालमधील दिनहाटा येथे एका काँग्रेस समर्थकावर गोळ्या झाडल्याची बातमी समोर आली आहे.