मराठी युट्यूबर्सना मोठी संधी आहे!

    06-Jul-2023
Total Views |

urmila nimbalkar


मुंबई :
महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मेकअप, शॉपिंग आणि बरचं काही... या विषयाबद्दल त्यांना अधिक माहिती जर का आपल्या मातृभाषेत मिळाली तर? असा विचार करत मराठी भाषेतील पहिली फॅशन इन्फ्लूएन्सर म्हणून समाज माध्यमावर आपली ओळख निर्माण करणारी म्हणजे अभिनेत्री उर्मिला निंबाळकर. अनेक प्रसिध्द आंतरराष्ट्रीय मेक-अप ब्रॅंडसोबत काम करणारी ती पहिली मराठी अभिनेत्री असून उर्मिला जवळपास दहा वर्षे चित्रपट आणि मालिका अशा माध्यमातून काम करत होती. तिने अनेक मराठी चित्रपट, मालिका तसेच प्रसिद्ध हिंदी मालिकांमध्ये काम केले. मात्र सध्या ती मालिकेत काम करताना दिसत नाही. याबद्दल नुकताच तिने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. तसेच, मराठी युट्यूबर्सना आणि विविध विषयांची निर्मिती करणाऱ्या कलाकरांना वाव आहे असेही उर्मिलाने आवर्जून या मुलाखतीत सांगितले आहे.
 
 
...म्हणून मी युट्यूब चॅनल सुरु केला
उर्मिला निंबाळकर म्हणाली की, “खूप वर्षे मालिकेतून काम करत होते आणि माझ्याकडे खूप चांगल्या संधीसुद्धा होत्या. पण मालिकांमध्ये काम करताना दररोज १५-१६ तास काम करावं लागतं ज्याचा शरीरावरती खूप परिणाम होतो, अजूनही सगळ्या मालिका सासू-सूनांमध्येच अडकल्यामुळे मला ते पटत नव्हतं. त्याचवेळी ओटीटी प्लॅटफॅार्म आणि यूट्यूबवर खूप चांगल्या प्रतिचा आशय येत होता, अनेक जागतिक दर्जाचे यूट्यूबर्स उदयाला येत होते. त्यामुळे मला असं वाटलं की स्वतःचं असं काहीतरी निर्माण करायला पाहिजे. कलाकार हा नेहमी चांगले चॅनल, प्रोडक्शन हाउस, दिग्दर्शक यांच्यावरच अवलंबून असतो. पण यूट्यूब किंवा समाजमाध्यमातून स्वतःचा आशय आणि प्रेक्षकवर्ग निर्माण करायची संधी मिळते आणि या विचारातूनच मी २०१८ साली गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्वतःचा यूट्यूब चॅनेल चालू केला”.
 
 
मराठी आशयाला समाजमाध्यमावर भरघोस प्रतिसाद
“मराठी युट्यूबर्सना भरपूर संधी आहे याचे संपूर्ण श्रेय आपल्या मराठी प्रेक्षकांचे आहे. मराठी भाषेत उत्तम प्रतिचा कन्टेट दिला तर प्रेक्षक तो उचलून धरतात आणि प्रतिसादही देतात. फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेतच गोष्टी चालतात हा गैरसमज आहे. मराठी यूट्यूबर्सना भरपूर संधी आहे, या क्षेत्रात भरपूर पैसा आहे. गुगल सुध्दा स्थानिक भाषांना प्रोत्साहन देत आहे आणि लोकांना आपल्या स्वतःच्या भाषेतच कन्टेट बघायला आवडतो. तो कोणीच बनवत नाही त्यामुळे बघितला जात नाही. ही सुध्दा सुरवात आहे अजून बरेच पुढे जायचे आहे”, असंही उर्मिलाने म्हटले.
 
दरम्यान, उर्मिलाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मेकअप आणि स्किनकेअर ब्रॅंडने तिच्यासोबत काम केले आहे. इतकेच नाही तर स्टोरीटेल या ओडीओबुक अॅपवर उर्मिलाने स्वतःच्या पॅाडकास्ट शोची निर्मिती केली तसेच अनेक ओडीओ पुस्तकांना आवाजही दिला. तिच्या पेटलेला मोरपीस या ओडीओ कादंबरीसाठी तिला मानांकीत बेस्ट व्हाइस ओफ इंडीया पुरस्कारानेही गौरवण्यात आले.