‘एनपीएस’ गुंतवणुकीसह पेन्शनचा स्मार्ट पर्याय

    06-Jul-2023   
Total Views |
article on National Pension Scheme

सर्वांना वृद्धापकाळाचे जीवन काही प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सुसह्य व्हावे म्हणून ‘नॅशनल पेन्शन योजना’ केंद्र सरकारनेकार्यान्वित केली. सेवानिवृत्ती नियोजनाच्या दृष्टीने हा एक चांगला दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. ही सरकार चालवत असलेली अंशदायी पेन्शन योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करणे, हा एक ‘स्मार्ट’ आर्थिक निर्णय आहे, जो तुम्हाला वयाच्या साठीनंतर फायदेशीर ठरू शकतो. ६० वर्षे होईपर्यंत यात गुंतवणूक करावी लागते. त्याविषयी सविस्तर...

निवृत्तीनंतर वृद्धापकाळात आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता देण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय पेन्शन योजना’ (नॅशनल पेन्शन स्कीम - एनपीएस) जानेवारी २००४ मध्ये सुरू केली. पेन्शन ही फक्त सरकारी नोकरीतील कर्मचारी, सार्वजनिक उद्योगातील कर्मचारी यांनाच मिळते. खासगी व अन्य ठिकाणी नोकरी करणार्‍यांना पेन्शन मिळत नाही. असंघटित कामगारांनाही पेन्शन मिळत नाही. या सर्वांना वृद्धापकाळाचे जीवन काही प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सुसह्य व्हावे म्हणून ‘नॅशनल पेन्शन योजना’ केंद्र सरकारने कार्यान्वित केली. सेवानिवृत्ती नियोजनाच्या दृष्टीने हा एक चांगला दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. ही सरकार चालवत असलेली अंशदायी पेन्शन योजना आहे. या योजनेत १८ ते ७० वयापर्यंतच्या व्यक्ती सहभागी होऊ शकतात.

हे खाते सार्वजनिक उद्योगातील बँका, पोस्ट ऑफिस, ‘एचडीएफसी बँक’, ‘कोटक बँक’, ‘आयसीआयसीआय बँक’, ‘अ‍ॅक्सिस बँक’ यांसारख्या मोठ्या खासगी बँका, ‘कार्व्ही स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन’ या ठिकाणी उघडता येते. याशिवाय ‘एनएसडीएल’ तसेच ‘कार्व्ही’च्या साईटवर लॉगिन करून ऑनलाईन ईपीएफ खाते उघता येते. हे खाते निवासी तसेच अनिवासी भारतीय केवळ एकाच्याच नावाने उघडू शकतात. हे खाते संयुक्त नावाने उघडता येत नाही. यात जास्तीत जास्त ठेव रुपये दीड लाख प्रत्येक आर्थिक वर्षी जमा करता येऊ शकते. ही दीर्घकालीन गुंतवणूक असून यातून ‘रिटायरमेंट प्लानिंग’ करता येते. यातील गुंतवणूक प्राप्तिकर ‘कलम ८० सी’ व ‘८० सीसीडी १) बी’अंतर्गत कर सवलतीस पात्र आहे. हे खाते भारतभर कुठेही ऑपरेट करता येते. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन अनुभवी व व्यावसायिक फंड मॅनेजर करतात. यातून सरासरी ९.५ ते १०.५ टक्क्यांच्या दरम्यान परतावा मिळतो. जो ‘पीपीएफ’, ‘एनएससी’, बँक एफडी या अन्य पर्यायांपेक्षा जास्त असतो.


खातेदाराने केलेल्या गुंतवणुकीवर दरमहा पेन्शन मिळते. यात ‘टिअर १’ खाते उघडे बंधनकारक आहे, तर ‘टिअर २’ उघडणे वैकल्पिक आहे. पेन्शन फक्त ‘टिअर १’ खात्यात असणार्‍या रकमेतूनच मिळते व ‘टिअर १’ मधील शिल्लक रक्कम काही ठरावीक कारणांसाठीच व ठरावीक कालावधीनंतर (फक्त तीन वेळाच) काढता येते. ‘टिअर २’ खात्यातील रक्कम बचत खात्याप्रमाणे कधीही काढता येते. या खात्यास ‘नॉमिनेशन’ करता येते. जास्तीत जास्त तीन नॉमिनी करता येतात व त्यांना द्यावयाच्या रकमेची टक्केवारीसुद्धा ठरवून देता येते.या योजनेत गुंतवणूक करणे, हा एक ‘स्मार्ट’ आर्थिक निर्णय आहे, जो तुम्हाला वयाच्या साठीनंतर फायदेशीर ठरू शकतो. ६० वर्षे होईपर्यंत यात गुंतवणूक करावी लागते.६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी तुम्ही अंशत: किंवा मुदत संपण्यापूर्वी तुमच्या जमा रकमेपैकी काही टक्के रक्कम काढू शकता. खातेदाराचा खाते सुरू असताना मृत्यू झाल्यास संपूर्ण जमा झालेला पेन्शन कॉर्पस नॉमितील किंवा कायदेशीर वारसाला परत केला जातो.


ही योजना निवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी बचत करण्याची सवलत लागावी म्हणून भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम, मान्यताप्राप्त शेअर्स, सरकारी रोखे, कॉर्पोरेट डिबेंचर्स यात विभागून गुंतविली जाते. ही योजना पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण यांच्याद्वारे नियंत्रित केली जाते. ही लौकिक योगदान योजना आहे. ही योजना सर्वांसाठी खुली आहे. परंतु, सर्व सरकारी कर्मचार्‍यांसाठी अनिवार्य आहे. सुरुवातीला ही योजना सरकारी कर्मचार्‍यांसाठी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर २००९ पासून ही योजना सर्वांसाठी खुली करण्यात आली. यात वर्षाला किमान रुपये सहा हजार गुंतवणूक करावी लागते. कमाल गुंतवणूक कितीही करता येते. पण, जुन्या कररचनेनुसार दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. हे पेन्शन खाते असल्यामुळे यातून पैसे काढण्यावर बंधने आहेत. ‘टिअर १’ मधून वर्षे पूर्ण होईपर्यंत निधी काढता येत नाही. ‘टिअर १’ सक्रिय ठेवण्यासाठी वार्षिक गुंतवणूक आधीच्या किमान सहा हजार रुपयांवरून आता एक हजार रुपये करण्यात आले आहे.

‘टिअर २’ खाते बचत खात्याप्रमाणे आहे ‘टिअर १’ खाते उघडल्यानंतर ‘टिअर-२’ खाते उघडता येते. गुंतवणूकदाराला ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच्या खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम मिळते. उरलेल्या रक्कमेवर दरमहा पेन्शन दिली जाते.यात गुंतवणूक वयाच्या ७० वर्षांपर्यंत करता येऊ शकते. वयाच्या साठीनंतर जे हे खाते उघडतात, ते वयाच्या ७५व्या वर्षांपर्यंत हे खाते सुरू ठेवू शकतात. ६५ वर्षांनंतर खातेे उघडणार्‍यांसाठी तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. एक व्यक्ती एकच ‘एनपीएस’ला खाते उघडू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती ‘एनपीएस’ खाते उघडते, तेव्हा त्याला (PRAN) कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक दिला जातो. आधारकार्डचा पुरावा देऊन हे खाते उघडता येते.

तुम्ही घरी बसून हे खाते उघडू शकता. या योजनेचे फायदे पुढीलप्रमाणे. या योजनेतील निधी सक्षम व पात्र फंड व्यवस्थापकांद्वारे गुंतविले जातात. हे निधी व्यवस्थापन पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरणाद्वारे नियंत्रित केले जाते. ‘एनपीएस टिअर २’ खाते चांगल्या व उच्च परताव्याची अनुमती देते. या योजनेचा गुंतवणूक खर्च फार कमी आहे. या योजनेचे पेपरवर्क फार साधे. योजनेत सहभागी होण्यास १८ ते ७० वर्षांच्या सर्वांना सहज संधी उपलब्ध आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर करलाभ, लवचिक वार्षिक पर्याय, गुंतवणूक पर्याय, कमी खर्च हे फायदे आहेत, असे बरेच गुंतवणूकदार आहेत. ज्यांना ‘सिक्युरिटीज’, ‘इक्विटी’, ‘डेट’ इत्यादींशी संबंधित अटी माहीत नाहीत. त्यामुळे असे गुंतवणूकदार ‘एनपीएस’ गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ‘एनपीएस’ फंड व्यवस्थापक निवडण्यात अपयशी ठरतात. ऑनलाईन खाते उघडण्यासाठी वेबसाईट (https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html)  भेट द्या. तुमच्या मोबाईल नंबर, आधार आणि परमनट अकांऊट नंबर (PAN) ‘एनपीएस’ खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे. या प्रकियेत तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येतो, अशी ही सोपी प्रक्रिया आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.