मतिमंद आणि मूक कर्णबधिर मुलांच्या शैक्षणिक आणि शारीरिक प्रगतीसाठी गेली ४१ वर्ष ‘अस्तित्व’ संस्था काम करीत आहे. एवढेच नव्हे, तर या मुलांना प्रशिक्षण देऊन छोटे छोटे उद्योग करण्यासाठी सक्षम केले आहे. जेणेकरून ते पुढील जीवन सन्मानाने जगू शकतील. या संस्थेने लोकाग्रहास्तव नुकतेच वृद्धाश्रमदेखील सुरू केले आहे. आयुष्याची संध्याकाळ ही आनंददायी करण्याचा संस्थेचा हा एक नवीन प्रयत्न आहे. ज्येष्ठ नागरिक असो किंवा विशेष मुले त्यांच्या चेहर्यावर हसू उमटविण्यासाठी ‘अस्तित्व’ची सततची धडपड वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या या कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश.
घरात एक अपंग मूल कोणत्याही व्याधीने ग्रासलेले असेल, तर ते कुटुंब आणि त्यांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होते, हे डॉ. सुरेश आडकर यांनी डॉक्टर या नात्याने सर्वकाही जवळून अनुभवलेले होते. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्राच्या प्रवासात त्यांना अशी ६०० हून अधिक कुटुंब दिसून आली. अपंग पाल्यांच्या पालकांना आपले मूल असे झाले ते आपल्या पूर्व कर्मामुळे किंवा पापांमुळे या अगतिक विचारसरणीतून बाहेर काढून त्यांना दोषमुक्त विचारसरणी देऊन शास्त्रीय मार्गदर्शन करणे, त्यांच्या पाल्यांना सामाजिक पुनर्वसन सामावून घेणे, जमेल तेवढे त्यांचे पुनर्वसन करणे, समाजाला अपंगाबद्दल घृणेऐवजी किंवा दयेऐवजी आपुलकी दाखविण्यास प्रवृत्त करणे, शासनाला अपंगाच्या समस्या समजाव्यात आणि त्यांच्यामार्फत या दिव्यांगांना सुविधा मिळवून देणे या हेतूने डॉ. सुरेश आडकरसह अन्य सहा जण यांनी १९८१ मध्ये ‘अस्तित्व’संस्थेची स्थापना केली.
‘अस्तित्व’ ही दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी झटणारी एक संस्था आहे. काही पालकांना त्यांच्या मतिमंद मुलांना घेऊन शिक्षणासाठी लोकलचा त्रास सहन करून मुंबईला न्यावे लागत असे. दोन पालक व वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमधील आणखी पाच जण दि. ६ सप्टेंबर, १९८१ या जागतिक दिव्यांग वर्षात एकत्र आले आणि त्या दिवशीच या संस्थेची स्थापना केली. महान कार्याची मुख्य जबाबदारी सात विश्वस्तांमध्ये वयाने सर्वांत लहान असलेल्या सध्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश आडकर यांच्यावर टाकण्यात आली. बी. जी. कर्वे (उपाध्यक्ष), निवृत्त मेजर जे.के. काळे (सचिव), एम. पी. सडेकर (कोषाध्यक्ष), एस. पी. शिंदे (सहसचिव), सी.पी. व्हेरा आणि पी. वाय. मुणगेकर विश्वस्त या नात्याने अध्यक्षांना मदत करीत होते. ‘अस्तित्व’ संस्थेत सर्वप्रथम मतिमंद मुलांसाठी शाळा काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार, दि. १ नोव्हेंबर, १९८१ रोजी पहिल्या सहा महिन्यांच्या एप्रिल १९८२ पर्यंतच्या सत्रासाठी २२ विद्यार्थ्यांची शाळा रोटरी हॉल, गोखले कंपाऊंड येथे सुरू करण्यात आली.
संस्थेच्या स्थापनेनंतर लगेचच थोड्याच दिवसात प्लॉट नं. ८ , फेज -१, ‘एमआयडीसी’ डोंबिवली विभाग येथे दोन हजार स्क्वेअर मीटर एवढा भूखंड त्यावेळच्या भावाने १ लाख, ४० हजार रु. ना घेण्यात आला. या भूमीचे भूमिपूजन दि. २२ एप्रिल,१९८२ रोजी श्रीमत जगतगुरू शंकराचार्य विद्यातीर्थ महास्वामीजी, श्रृंगेरी मठ यांच्या हस्ते उपउत्तराधिकारी श्री भारतीतीर्थ स्वामीजी यांच्या उपस्थितीत झाला. एप्रिल १९८२ नंतर मतिमंद शाळेची पूर्वीच्या जागेची मुदत संपल्यामुळे व स्वत:ची वास्तू होईपर्यंत मदतीचा हात टिळकनगर विभागातील ओंकार सोसायटीने दिला. दरम्यानच्या काळात डोंबिवलीतील पश्चिम विभागात सुरू झालेल्या एका मूकबधिर शाळेला जागा सोडावी लागल्यामुळे उद्भवलेल्या त्यांच्या अडचणी संबंधित शिक्षिकांकडून समजल्यामुळे त्या शिक्षिका आणि सर्व मूकबधिर विद्यार्थी यांना ‘अस्तित्व’ संस्थेने सामावून घेऊन हा विभाग पण ऑक्टोबर १९८२ पासून सुरू केला. जागेच्या अडचणीमुळे मतिमंद विभाग ओंकार सोसायटी येथे सकाळच्या सत्रात आणि मुकबधिर विभाग दुपारच्या सत्रात चालवावा लागत होता. संस्थेची ‘एमआयडीसी’ विभागातील वास्तू बांधण्याच्या दृष्टीने निधी जमविण्याच्या विविध योजना आखण्यात आल्या.
३० हजार रु. देणगी देणार्या व्यक्तीचे नाव संस्थेच्या खोल्यांना देण्यात येईल, असे ठरविले. ‘चॅरिटी शुड बिगीन अॅट होम’ या तत्वानुसार डॉ. शुभांगी आडकर यांनी पहिले ३० हजार रु. देण्याचे ठरविले. त्यानंतर पोपट भंडारी, शंकर भोईर यांच्यामार्फत तेवढीच रक्कम मिळविली. काही वषार्ंनंतर मेजर काळे, छापवाले आणि धारप यांच्याकडून खोल्यासाठी निधी मिळाला. १९८४ साली कागझी परिवारातर्फे दोन लाख रुपयांची देणगी मिळाली व त्यासाठी ‘अस्तित्व’ संस्थेचे अस्तित्व प्रल्हादराय कागझी दिव्यांगांसाठी कार्यान्वित संस्था असे नामकरण करण्यात आले. दि. ११ एप्रिल, १९८५ साली ‘लायन्स क्लब’ कल्याण विभाग यांच्यातर्फे संस्थेला एक लाख रुपये देणगी मिळाली. त्याप्रीत्यर्थ मतिमंद विभागाला ‘लायन्स क्लब’चे नाव देण्यात आले. तळमजल्यापैकी एक तृतीयांश एवढे बांधकाम जून १९८४ मध्ये पूर्ण झाले.
डॉ. सुरेश आडकर आणि मेजर काळे यांनी जीव ओतून संस्थेसाठी काम केले. मेजर काळे हे तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संस्थेसाठी झटत होते. डॉ. आडकर यांच्या मदतीसाठी एस. पी. शिंदे आणि प्राचार्या राधिका गुप्ते होते. काळे यांच्या अनुपस्थितीत प्रा. गुप्ते आणि शिंदे डॉ. आडकरांना मदत करीत. माजी प्राचार्य व सध्याच्या अध्यक्ष राधिका गुप्ते यांचा मदतीचा हात आजतागायत तसाच आहे. संस्थेचे ध्येय ठरलेले होते. विशेष मुलांच्या पालकांना दिलासा देऊन मोकळ्या वातावरणात निर्भिडपणे लाज न वाटता पालकांनी त्यांच्या मुलांना घराबाहेर काढून त्यांच्या भल्यासाठी संस्थेत आणण्यासाठी प्रवृत्त करणे. त्याचबरोबर लोकप्रबोधन करणेदेखील गरजेचे होते. त्यादृष्टीने संस्थाचालक कामास लागले होते. त्याचेच फलित आज संस्थेच्या रुपाने दिसत आहे.
शारीरिकदृष्ट्या अपंग, अंध, कर्णबधिर आणि मतिमंद या वेगवेगळ्या अपंगाच्या समस्यासारख्या असू शकत नाहीत. त्यामुळे ‘अस्तित्व’ने जरी कर्णबधिर (मूकबधिर)व मतिमंद या दोन समस्यांचा विचार केला असला तरी बहुतेक संस्था वरीलपैकी एखाद्या गटासाठीच आपली ताकद पणाला लावतात. अपंगत्वावर व शारीरिक कमतरतेवर किंवा वैगुण्यावर मात करून अशा व्यक्तीस समाजात चारचौघांसारखे वावरता यावे आणि जमल्यास त्याला कमी जास्त प्रमाणात स्वत:पुरते शारीरिक व आर्थिक स्वावलंबन दाखविता यावे हा उद्देश बहुतांशी अपंगासाठी चालविणार्या सर्व संस्थांच्या चालकांचा असतो. शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेल्या मुलांपेक्षा विशेष मुलांसाठी प्रेम, जवळीक, लाड आणि खर्च वगैर जरा जास्तीच करणे पालकांकडून अपेक्षित असते. तेव्हाच संस्था आणि समाज त्यांच्यासाठी जे करीत आहे त्याचा जास्तीत जास्त लाभ अपंग व्यक्तीस व त्यांच्या पालकांना मिळेल, असे डॉ. आडकर व राधिका गुप्ते सांगतात.
मोजक्याच विद्यार्थ्यांच्या सोबतीने सुरू झालेल्या या शाळेत आजपर्यंत १७० मतिमंद विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ‘आयक्यू’ ३० ते ७० या रेंजमधील मुले शाळेत आहेत. माजी प्राचार्याच्या आणि या विभागातील शिक्षकांच्या अथक परिश्रमातून मतिमंद मुलांना ‘नॅशनल ओपन स्कूल प्रथम’ या प्रोग्रामद्वारे तिसरी व पाचवीच्या परीक्षांना बसविण्यात आणि यशस्वी करण्यात यश मिळाले ही अभिमानास्पद गोष्ट आहे. हे एक लक्षणीय यशच म्हणावे लागेल. तसेच, २० विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सुरू झालेल्या मूकबधिर विभागात आजपर्यंत ८३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही मुले छोटे छोटे उद्योग चांगल्या पद्धतीने चालवू शकतात. या विभागातून बरेच विद्यार्थी आजपर्यंत दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडले आहेत. संस्थेतील तिसरा विभाग म्हणजे संरक्षित कर्मशाळा. यामध्ये वय वर्षे १८ ते २१ पर्यंतचे विद्यार्थी आहेत.
संस्थेतील २१ वर्षांच्या वरील मुलांसाठी शक्य आहे तोपर्यंत काम करण्यासाठी कर्मशाळा आहे. त्यांना कामात गुंतवून ठेवणे आणि पुढील आयुष्यासाठी शक्यतो चरितार्थासाठी थोडी बहुत कमाई करणे हा त्यामागील उद्देश आहे. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीतून येणार नफा विद्यार्थ्यांच्या गटाप्रमाणे बँकेत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतो. संस्थेने दि. २६ जानेवारी, १९९२ पासून मतिमंद विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले आहे. मुंबई, वसईतील अशी जुनी वसतिगृहे सोडली, तर मुंबई ते पुणे पट्ट्यातील मतिमंदांसाठीचे हे पहिले वसतिगृह असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. ‘अस्तित्व’ संस्था एकाच वेळेस मतिमंदासाठी शाळा, मूकबधिरासाठी शाळा, संरक्षित कर्मशाळा आणि मतिमंदांसाठी वसतिगृह असे चार विभाग यशस्वीरीत्या सांभाळत आहे. सर्व विभागात एकूण ३५० ते ४०० विद्यार्थी दर वर्षी असतात त्यांची देखभाल करण्यासाठी शासकीय काही मानद आणि संस्थेतर्फे नेमलेले असे कर्मचारी उपलब्ध आहेत. सध्या संस्थेच्या कार्यकारिणीस संस्थापक अध्यक्ष-विश्वस्त डॉ. एस. व्ही. आडकर, अध्यक्ष राधिका गुप्ते, सचिव मनोज प्रधान, खजिनदार प्रवीण कुबेर, सहसचिव डॉक्टर प्रमोद बाहेकर विश्वस्त डी. एस. भामरे, अविनाश परांजपे, सभासद कार्यकारिणीत माधव सिंग, किरणकुमार पाटील, विशेष निमंत्रित अॅड. राजकुमार तिवारी हे आहेत.
संस्थेच्या ४० वर्षांच्या वाटाचालीनंतर ‘अस्तित्व सन्मान’ हे वृद्धाश्रम नव्याने सुरू केले आहे. या वृद्धाश्रमात एकट्याने किंंवा जोडीदारासह राहण्याची व्यवस्था आहे, शेअर रूम, खेळ वाचन व्यवस्था, ध्यानधारणेसाठी मंदिर, वैद्यकीय सेवा जवळच उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचा तळमजला या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिला आहे. तळमजल्यावर ३० जणांची व्यवस्था केली आहे. गरजूंनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
९३२१६५८५७१