मुंबई : झी मराठी वाहिनीवर सध्या विशेष गाजत असलेल्या 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात अनेक दिग्गज मंडळी येईन नवे खुलासे करत आहेत तर कुणाची तरी पोलखोल तरी करत आहेत. आत्तापर्यंत राजकीय नेते, कलाकार अशा अनेकांनी हजेरी लावलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दाऊद इब्राहिमला खुलं चॅलेंज दिलं आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, अभिनेत्री सई ताम्हणकर, उर्मिला मातोंडकर अशा अनेक नावाजलेल्या आणि दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली आहे
समीर वानखेडे सध्या अनेक गोष्टींमुळे चर्चेचा विषय आहेत. अशात 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात त्यांची हजेरी प्रेक्षकांच्या भूवय्या उंचावणारी ठरणार आहे. सध्या या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. प्रोमोमध्ये दाऊद इब्राहिमविषय़ी प्रश्न विचारताच समीर वानखेडे यांनी त्याला 'हिंमत असेल तर समोर ये', असं म्हणत चॅलेंज दिले आहे. समीर वानखेडेंना दाऊद इब्राहिमकडून धमक्या येत आहेत, असं लोकं म्हणतात”, असा प्रश्न अवधूत गुप्तेने समीर वानखेडे यांना विचारला. त्यावर, उत्तर देताना, 'मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही', असं उत्तर त्यांनी दिलं.
नेमकं काय म्हणाले समीर वानखेडे?
“आमच्यासाठी हे खूप लहान गुन्हेगार आहेत आणि त्यांचं नाव घेऊन मी त्यांना आणखी प्रसिद्ध करणार नाही. मी धमक्यांना अजिबात घाबरत नाही”, असे समीर वानखेडेंनी म्हटलं. “मी त्यांना चॅलेंज करतो, तिथे परदेशात बसून धमक्या वैगरे अजिबात देऊ नकोस, हिंमत असेल तर समोर येऊन धमक्या दे”, असे समीर वानखेडे यावेळी उत्तर देताना म्हणाले. त्यामुळे 'खुप्ते तिथे गुप्ते'चा हा भाग नक्कीच मनोरंजक असणार यात शंका नाही.