पुणे: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त 'या' शाळांना सुट्टी!
31-Jul-2023
Total Views |
पुणे: शहरातील शाळा, महाविद्यालयांना उद्या मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) सुट्टी द्या, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जंयतीच्या पार्श्वभूमीवर आरपीआयने ही मागणी केली. तसेच या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील पुणे दौरा असल्याने अनेक रस्ते बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरीता ही मागणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली. या वेळी आरपीआयचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब जानराव, पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, हिमाली कांबळे, शाम सदाफुले, निलेश आल्हाट, विशाल शेवाळे आदीसह पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले की, मंगळवारी 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जंयती आहे. पुणे शहरातील येरवडा, बिबवेवाडी व सारसबाग येथे मोठ्या प्रमाणामध्ये अनुयायी पुष्पहार अर्पण करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.या साठी मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीची गैरसोय होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनावर मोठा ताण असतो. वाहतुकीत बदल केला जातो. सध्या पुणे शहरामध्ये पडणाऱ्या पावसाने रस्त्यांवरील खड्यांची चाळण झाली आहे. त्याचा वाहनधारकांना त्रास होत आहे व वाहतूक कोंडी होते आहे.
या कार्यक्रमासह उद्या 1 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे येथे नियोजीत दौरा आहे. पुणे शहर वाहतूक विभागाचे उप-आयुक्त यांनी पुणे शहरातील विविध रस्त्यांवर सकाळी ६ ते दुपारी तीन वाजेपर्यंत वाहतुक बंदी केलेली आहे.या सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहिर करावी. तसे करता न आल्यास शाळेच्या वेळेमध्ये बदल करण्याच्या सूचना जारी कराव्यात, अशी मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली.