ज्योर्तिमय भविष्यकाळ...

    30-Jul-2023   
Total Views |
Indians can't have a connection with Mughals

विकृत इतिहासकार भारतातच निर्माण होतात. हा इतिहास असंख्य लोकांनी नाकारला आहे. नाकारणारे सत्तास्थानी नसल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष दिले गेले नाही. आता ही स्थिती बदलली आहे. आता राज्यकर्तेच प्रश्न करू लागले आहेत की, मुघल बादशाही आणि सुलतानी राजवटीशी आमचा संबंध काय? योगी आदित्यनाथ यांनी, हे प्रश्न उपस्थित करावेत, याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत लखनौ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. भैय्याजी जोशी कार्यक्रमाचे मुख्य वक्ते होते. परंतु, बातमी भैय्याजींच्या भाषणाची झाली नाही. बातमी योगी आदित्यनाथ यांच्या भाषणाची झाली आणि ते तसे होणे स्वााभाविक होते. योगी आदित्यनाथ हे भारताच्या सर्वात मोठ्या प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत. संन्यासाची भगवी वस्त्रे आणि डोक्याचे मुंडन ही त्यांची प्रतिमा आहे. अन्य राजकीय नेत्यांप्रमाणे परीट घडीचे पांढरे कपडे आणि पांढर्‍या केसांना काळा कलाप याची त्यांना आवश्यकता नाही. ते राजयोगी आहेत. राज्य ते करतात; पण मानसिकता योग्याची आहे. योगी सर्व काही करूनही सर्वांपासून अलिप्त असतो. आधुनिक काळातील नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे राजयोगी मनाचे आदर्श आहेत.

छत्रपतींच्या ३५०व्या राज्याभिषेक स्मृती सोहळ्यात त्यांनी जे विचार मांडले, ते भारताचा आत्मा व्यक्त करणारे आहेत. “छत्रपती शिवाजी महाराज आमचे महानायक आहेत. मुघल बादशाहींशी आमचा संबंध काय, ते तर आक्रमक होते. मुलायमसिंह यादव यांनी आग्य्राला औरंगजेब याचे म्युझियम बांधले. आम्ही आग्य्रालाच छत्रपती शिवाजी महाराजांचे म्युझियम बांधणार आहोत,” असे त्यांनी यावेळी बोलताना साांगितले. नरेंद्र मोदी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे प्रतीक मानले आहे, असेही योगी म्हणाले.

“मुघल बादशाहीशी आपला काही संबंध नाही. बाबर ते औरंगजेब सगळेच आक्रमक. त्यात अकबराला वगळण्याचे कारण नाही. हा सत्य इतिहास असताना विकृत इतिहासकारांनी आपल्या डोक्यात हे भरविले की, मुघल राजवट आपलीच राजवट आहे. रशियावर सुमारे ४०० वर्षं चंगेजखान वंशावळीचे राज्य होते. पण, रशियन इतिहासकार कधीही असे म्हणत नाहीत की, मंगोल राजवट आमची राजवट होती. म्हणून चंगेजखान वंशावळीविरुद्ध जे रशियन योद्धे लढले, त्यांना रशियाचे नायक समजले जाते. रशियन झारने चंगेज वंशावळीच्या शेवटच्या राजाचा पराभव केला आणि त्यांना देशातून हाकलून लावले. आपल्या देशात जे योद्धे रानटी मुघल सत्तेविरुद्ध लढले, ते आमचे महानायक आहेत. महाराणा प्रताप स्वातंत्र्यसेनानी असतील, तर अकबर हा महान राजा कसा? राणा प्रतापाचा संघर्ष अकबराशी झाला. विसंगतीपूर्ण इतिहास सांगण्याचे आणि शिकविण्याचे बंद करा.

विकृत इतिहासकार भारतातच निर्माण होतात. हा इतिहास असंख्य लोकांनी नाकारला आहे. नाकारणारे सत्तास्थानी नसल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष दिले गेले नाही. आता ही स्थिती बदलली आहे. आता राज्यकर्तेच प्रश्न करू लागले आहेत की, मुघल बादशाही आणि सुलतानी राजवटीशी आमचा संबंध काय? योगी आदित्यनाथ यांनी, हे प्रश्न उपस्थित करावेत, याला ऐतिहासिक महत्त्व आहे.
योगी आदित्यनाथ हे भारतातील पहिल्या श्रेणीचे राज्यकर्ते आहेत आणि इथून पुढे दीर्घकाळ ते राज्यकर्ते म्हणूनच राहणार आहेत. त्यांचे भाषण टाळ्या मिळवण्यासाठी ठोकलेले भाषण नाही. भविष्यकालीन भारताचा इतिहास कशा प्रकारे लिहिला जाईल; याचा तो संकेत आहे. आपल्या राज्यघटनेच्या मूळ हस्तलिखित प्रतीवर अकबर आणि टिपू सुलतान यांची चित्रे आहेत. म्हणजे आक्रमकांची चित्रे आहेत. तो ही विषय आज ना उद्या चर्चेत आल्याशिवाय राहणार नाही!

राजमाता जिजाबाई आणि समर्थ रामदास स्वामी या दोघांचा गौरवपूर्ण उल्लेख योगीजींनी आपल्या भाषणात केला. रामदास स्वामी यांनी विदेशी मुघल राजवटीविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी जो संघर्ष पुकारला; त्याचे समर्थन केले. रामदास स्वामींचा उल्लेख ‘गुरू’ या शब्दाने याोगी आदित्यनाथ यांनी केला. महाराष्ट्रात जी मंडळी ब्राह्मणद्वेषाचे राजकारण करतात, त्यांना ‘गुरू’ हा शब्द चालत नाही. समर्थ रामदास स्वामी ब्राह्मण होते आणि ब्राह्मण मराठ्यांचा गुरू कसा होईल? अशी त्यांची जातीय विचारसरणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर समर्थांनी ‘आनंदवनभुवनी’ या काव्याची रचना केली. त्यात ते म्हणतात,
बुडाला औरंग्या पापी। म्लेंच्छसंहार जाहला। मोडीली मांडिली क्षेत्रे। आनंदवनभुवनी।

महाराजांनी विदेशी, मुस्लीम राजवटीविरुद्ध यशस्वी संघर्ष केला. योगी म्हणाले की, “शत्रूला ज्या भाषेत उत्तर दिले असता समजते, त्या भाषेत शिवाजी महाराजांनी उत्तर दिले आहे. अफझलखानाला भेटीला बोलवून त्याचा कोथळा बाहेर काढून त्याला समजणार्‍या भाषेत महाराजांनी उत्तर दिले. लाल महालात बसलेल्या शाहिस्तेखानावर हल्ला करून त्याची तीन बोटे तोडली. खरं म्हणजे, त्याला मारायचे होते; पण तो वाचला. औरंगजेबाची सूरत महाराजांनी लुटली. शत्रूला समजणार्‍या भाषेत उत्तर द्यावे लागते. पंडित नेहरू पाकिस्तान आणि चीनला निषेधाचे खलिते पाठवीत. नरेंद्र मोदी आणि आदित्यनाथ यांच्या शासनाने पाकिस्तानला ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ’बालाकोट स्ट्राईक’ने उत्तर दिले.” योगी आदित्यनाथ महाराजांची कार्यशैली स्वीकारून आहेत. म्हणून त्यांच्या राज्यातील मुस्लीम गुंडांचे राज्य संपवून टाकले.

उत्तर प्रदेश आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात ऐतिहासिक नाते आहे, हेदेखील त्यांनी सांगितले. महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट काशीचे होते आणि महाराजांवर अप्रतिम काव्य करणारे कवी भूषण कानपूरचे होते. ‘न होत शिवाजी तो सुन्नत होत सबकी’ हे कवी भूषण यांचेच वाक्य!

समर्थांनी शिवाजी महाराजांचे वर्णन ‘श्रीमंतयोगी’ या दोन शब्दात केले आहे. अशा या श्रीमंतयोग्याचे गुणगान दुसर्‍या योग्याने करावे, हे यथोचितच. ते दुसरे योगी राजयोगी आहेत. राज्याचे मुख्य प्रशासक आहेत. श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज राज्याचे उपभोगशून्य स्वामी होते आणि योगी आदित्यनाथ यांनी महाराजांचा आदर्श गिरवला आहे. ज्योतीने तेजाची आरती झाली आहे. जी ऊर्जा तेजात आहे, ती ज्योतीत आहे. म्हणून भारताचा भविष्यकाळ ज्योर्तिमय होणार आहे.

९८६९२०६१०१


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.