भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत फेरबदल

१३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय सरचिटणीस आणि १३ राष्ट्रीय चिटणीस

    29-Jul-2023
Total Views |
Changes In BJP National Executive

नवी दिल्ली
: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये फेरबदल केले आहेत. यामध्ये १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय सरचिटणीस आणि १३ राष्ट्रीय चिटणीसांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी होणाऱ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने संघटनात्मक फेरबदलांना प्रारंभ केला आहे. यामध्ये १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, आठ राष्ट्रीय महासचिव, एक राष्ट्रीय संघटनमंत्री, एक राष्ट्रीय सह-संघटनमंत्री, , एक कोषाध्यक्ष, एक सह-कोषाध्यक्ष आणि १३ राष्ट्रीय सचिवांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये नव्या आणि जुन्या चेहऱ्यांचा समन्वय साधण्यात आला असून अपवाद बगळता पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदांवर कायम ठेवण्यात आले आहे.

भाजपने जारी केलेल्या यादीत राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह, झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास आणि सौदान सिंह यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय कैलाश विजयवर्गीय, अरुण सिंह आणि तरुण चुघ यांना सरचिटणीस करण्यात आले आहे. राजेश अग्रवाल यांची खजिनदारपदी आणि नरेश बन्सल यांची सहकोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केरळमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांना राष्ट्रीय सचिव करण्यात आले आहे.

यामध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रीय सरचिटणीसपदी विनोद तावडे आणि राष्ट्रीय चिटणीसपदी पंकजा मुंडे, विजया रहाटकर हे आहेत. यापूर्वी चिटणीसपदी असणाऱ्या सुनील देवधर यांना वगळण्यात आले आहे.

हे आहेत नवे पदाधिकारी

राष्ट्रीय उपाध्यक्ष
डॉ. रमण सिंह, आमदार (छत्तीसगढ़), वसुंधरा राजे, आमदार (राजस्थान), रघुबर दास (झारखंड), बैजयंत पांडा (ओडिशा), सरोज पाण्डेय, खासदार (छत्तीसगढ़), रेखा वर्मा, खासदार (उत्तर प्रदेश), डी.के. अरुणा (तेलंगणा), एम. चौबा एओ (नागालँड), अब्दुल्ला कुट्टी (केरळ), लक्ष्मीकांत वाजपेई, खासदार (उत्तर प्रदेश), लता उसेंडी (छत्तीसगढ़), तारिक मंसूर, विधान परिषद सदस्य (उत्तर प्रदेश), राष्ट्रीय सरचिटणीस, अरुण सिंह, सांसद (उत्तर प्रदेश), कैलाश विजयवर्गीय (मध्य प्रदेश), दुष्यंत कुमार गौतम (दिल्ली), तरुण चुघ (पंजाब), विनोद तावडे (महाराष्ट्र), सुनील बंसल (राजस्थान), संजय बंदी, खासदार (तेलंगाना), राधा मोहन अग्रवाल, खासदार (उत्तर प्रदेश).

राष्ट्रीय चिटणीस
विजया राहटकर (महाराष्ट्र), त्या कुमार (आंध्र प्रदेश), अरविंद मेनन (दिल्ली), पंकजा मुंडे (महाराष्ट्र), नरेन्द्र सिंह रैना (पंजाब), डॉ. अल्का गुर्जर (राजस्थान), अनुपम हाजरा (पश्चिम बंगाल), ओमप्रकाश धुर्वे (मध्य प्रदेश), ऋतुराज सिन्हा (बिहार), आशा लाकड़ा (झारखंड), कामख्या प्रसाद तासा (आसाम), सुरेन्द्र सिंह नागर (उत्तर प्रदेश), अनिल अँटोनी (केरल).

पसमांदा मुस्लिम चेहरा राष्ट्रीय उपाध्यक्षपदी
भाजपने मुस्लिमांमधील मागास अशा पसमांदा मुस्लिमांना राजकीय आणि सामाजितदृष्ट्या मुख्य प्रवाहात आणण्याचे विशेष धोरण आखले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू तारिक मंसूर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्यत्वही भाजपने दिले आहे.