ठाणे : मूळ पुसद तालुक्यातील व सध्या ठाणे शहरात वास्तव्य असलेल्या बंजारा समाजाच्या शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या कार्यक्रमात भाजपाचा झेंडा हाती घेतला. महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी कार्यकर्त्यांच्या भाजपा प्रवेशासाठी पुढाकार घेतला होता.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याबरोबरच नातू आमदार नीलय नाईक यांना मानणारा बंजारा समाजातील अनेक नागरिक ठाण्यात राहत आहेत. या नागरिकांना भाजपाबरोबर जोडण्यासाठी माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्याकडून प्रयत्न केले जात होते. त्यानुसार बंजारा समाजाचे ठाण्यातील नेते लखन आडे व विकास राठोड यांच्या नेतृत्वाखाली समाजातील कार्यकर्ते व नागरिकांनी भाजपामध्ये आज प्रवेश केला. मुंबईतील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, आ. नीलय नाईक, ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले, मनोहर डुंबरे, माजी नगरसेविका अर्चना मणेरा यांचीही उपस्थिती होती.
बंजारा समाजाच्या पाठीशी भाजपा कायम राहील. समाजाच्या विविध मागण्या प्राधान्याने सोडविण्यासाठी युती सरकार प्रयत्न करेल, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली.