मेजर जनरल किरिलो बुडानेव्ह आज फक्त ३७ वर्षांचा आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी २०२० साली त्याला ‘डायरेक्टरेट ऑफ इंटेलिजन्स’ किंवा ’एलयूआर’चा म्हणजेच युक्रेनियन गुप्तहेर खात्याचा प्रमुख बनवलं. तेव्हा तर तो फक्त ३४ वर्षांचा होता. एवढ्या तरुण वयाचा माणूस गुप्तहेर खात्याचा प्रमुख? खुद्द युक्रेनमध्ये आणि बाहेरच्या गुप्तहेर संबंधित जगातल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण, बुडानेव्हची कर्तबगारीच तशी होती.
मार्च २०२२ मधली घटना. युक्रेनची राजधानी कीव्ह किंवा कीयेफ शहराजवळचं रिबाल्स्की नावाचं बेट. तिथल्या ‘एचयूआर’च्या कार्यालयावर अचानकपणे क्षेपणास्त्र आणि वैमानिक विरहित विमानांचा म्हणजेच ड्रोन्सचा हल्ला झाला. सकाळी ११ वाजताची वेळ होती. ‘एचयूआर’चे बरेचसे अधिकारी मुख्य बैठक कक्षात एकत्र येऊन त्यांच्या बॉसची वाट पाहत होते. अचानक हा हल्ला झाला. स्फोटांनी इमारत हादरली. सगळेच जण प्रशिक्षित लष्करी अधिकारी होते. धडाधड सगळे जण पोटावर पालथे पडले आणि डोकं खाली करून, कान बंद करून निपचित पडून राहिले. प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता- ’अखेर या रशियनांनी आपल्या सुरक्षा यंत्रणेला चकवून आपल्या मुख्यालयावर हल्ला चढवलाच तर!’
जेमतेम दीड मिनिटं उलटली. एक दार उघडल्याचा आणि बंद झाल्याचा आवाज आला. सर्वांची मान आपोआपच वर झाली. दरवाजात त्यांचा बॉस उभा होता - मेजर जनरल किरिलो बुडानेव्ह. त्याने स्वतःचे कपडे झटकले. डोक्यावरची बॅरेट टोपी ठीकठाक केली आणि जवळ पडलेली एक उझी सबमशीनगन उचलून घेत, तो गुरगुरला, ’सगळं काही ठीक आहे. चला पटकन उठा. बाहेर पडून एकदा चारी बाजूंना नजर टाकून येऊया.’
वास्तविक असं करणं धोक्याचं असतं. कारण, पुन्हा लगेच हल्ला होण्याचा धोका असतो. रशियन ड्रोन्सच्या कॅमेर्यांनी जर टिपलं की, ‘एचयूआर’चा खुद्द बॉस उघड्यावर येऊन पाहणी करतोय, तर यांना पुन्हा त्याच्यावर झेपावण्याची आयतीच संधी मिळाली असती. पण, जमिनीवरून उठून उभ्या राहणार्या या अधिकार्यांच्या मनात, हे विचार येण्यापूर्वी बुडानेव्ह दरवाजा सरकावून बाहेर पडलासुद्धा!
मेजर जनरल किरिलो बुडानेव्ह आज फक्त ३७ वर्षांचा आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी २०२० साली त्याला ‘डायरेक्टरेट ऑफ इंटेलिजन्स’ किंवा ’एलयूआर’चा म्हणजेच युक्रेनियन गुप्तहेर खात्याचा प्रमुख बनवलं. तेव्हा तर तो फक्त ३४ वर्षांचा होता. एवढ्या तरुण वयाचा माणूस गुप्तहेर खात्याचा प्रमुख? खुद्द युक्रेनमध्ये आणि बाहेरच्या गुप्तहेर संबंधित जगातल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण, बुडानेव्हची कर्तबगारीच तशी होती.
१९९१ नंतर सोव्हिएत रशियन सोशालिस्ट रिपब्लिक संघाचे तुकडे उडाले. या संघातला प्रजासत्ताक देश युक्रेन (किंवा खरं म्हणजे उक्रेन) या नावाने स्वतंत्र आणि सार्वभौम असा देश बनला. सोव्हिएत संघाच्या राज्यकर्त्यांनी म्हणजे मुख्यतः लेनिन, स्टॅलिन आणि ब्रेझनेव्ह यांनी सर्व प्रजासत्ताकांमध्ये अत्यंत प्रबळ आणि नितकीच निर्घृण अशी गुप्तहेर संघटना उभी केली होती. तिच नाव होतं ‘केजीबी.’ या ‘केजीबी’ हस्तकांनी परदेशात गाजवलेल्या शौर्याचा नि स्वदेशात केलेल्या क्रौर्याच्या कथांनी पुस्तकांचे खंड भरतील. वर्तमान रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे मूळचे ‘केजीबी’चेच अधिकारी. राजकारणात उतरण्यापूर्वी ते ‘केजीबी’मध्ये कर्नलच्या हुद्द्यावर होते. पण, १९९१ साली सोव्हिएत संघराज्य संपलं, तशी ‘केजीबी’ पण संपली. आता नव्या रशियन फेडरेशन या देशाच्या गुप्तहेर संघटनेचं नाव आहे, (एफएसएस) ‘फेडरल सीक्रेट सर्व्हिस’ किंवा रशियन भाषेत ‘एफएसबी.’
स्वतंत्र झालेल्या युक्रेन देशाने स्वतःची अशी गुप्तहेर संस्था १९९२ साली सुरू केली. ‘मेन डायरेक्टरेट ऑफ इंटेलिजन्स ऑफ युक्रेन’ अशा नावाच्या युक्रेनियन शब्दांचं लघुरूप आहे, ’एचयूआर.’ किरिलो बुडानेव्हचा जन्म १९८६ सालचा. त्यामुळे ’एचयूआर’चा कारभार सुरू झाला, तेव्हा तो सहा वर्षांचा होता. ’एचयूआर’च्या सुरुवातीच्या अधिकार्यांच्या कार्यपद्धतीवर साहजिकच ’केजीबी’चा ठसा होता. कारण, यांच्यातले बहुतेक जण ’केजीबी’च्याच मुशीतून बाहेर पडलेले होते. ’केजीबी’ प्रमाणेच त्यांचे अधिक घनिष्ठ संबंध जर्मन आणि फ्रेंच गुप्तहेर खात्यांशी होते. पण, युक्रेनियन लोकांनी प्रयत्नपूर्वक स्वतःची वेगळी कार्यपद्धती विकसित केली. एकंदर जगाच्या दृष्टीने रशिया-युक्रेन युद्ध फेब्रुवारी २०२२ पासून सुरू झालं. कारण, यावेळी रशियाने युक्रेनच्या सरहद्दीवर तर आक्रमण केलंच शिवाय राजधानी कीव्हवरदेखील जोरदार हवाई हल्ले चढवले. प्रत्यक्षात रशिया-युक्रेन युद्ध २०१४ पासून सुरू आहे. कारण, या वर्षी रशियाने युक्रेनचा भाग असलेला क्रीमिया प्रांत लष्करी हल्ला चढवून जिंकून घेतला आणि त्याला सरळ रशियात विलीन करून घेतलं.
किरिलो बुडानेव्ह तेव्हापासून रशियन आक्रमणाशी टक्कर देतो आहे. २०१५ सालची गोष्ट. बुडानेव्ह तेव्हा लेफ्टनंट कर्नल होता. ब्रिगेडिअर जनरल दिमित्रो तिमकोव्ह आणि बुडानेव्ह आपलं कमांडो पथक घेऊन पूर्व युुक्रेनमधल्या रशियन व्याप्त डोनबास भागात शिरले होते. रशियन छावणीत जोरदार घातपात घडवून परत फिरताना बुडानेव्हचा धक्का एका भूसुरुंगाला लागला. सुरुंगाच्या प्राणघातक कपच्या बुडानेव्हच्या मान आणि खांद्याच्या मधल्या भागात नि हृदयाच्या इंचभर खाली अशा घुसल्या. तिमकोव्ह सांगतो, ’याला स्वतःच्या जीवापेक्षा इतरांच्या जीवाची जास्त काळजी. मला असाच सोडून तुम्ही लवकर सटका, असं हा आम्हाला सांगायला लागला. आम्ही त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष केलं. त्याची गठडी वळली आणि आळीपाळीने खांद्यावरून पळवत पळवत तीन किमी अंतरावरचं सुरक्षित स्थान गाठलं. हा जीवंत असेल असे आम्हाला वाटत नव्हतं. पण, तो जीवंत तर होताच नि चांगला व्यवस्थित शुद्धीवरही होता. एवढ्या वेळात तो एकदा साधा कण्हलासुद्धा नाही.’ याला म्हणतात कमांडो!
२०१६ मध्ये बुडानेव्हच्या कमांडो पथकाने आणखीनच जोखमीची कामगिरी अंगावर घेतली आणि यशस्वीसुद्धा केली. रशिया व्याप्त क्रीमियामधल्या झांकोई इथल्या विमानतळावर रशियाची रसद पुरवठा हॅलिकॉप्टर्स उभी होती. बुडानेव्ह आणि त्याच्या कमांडो पथकाने त्या हॅलिकॉप्टर्सवर गनिमी हल्ला चढवला. त्यांना तोंड द्यायला रशियन कमांडो पथक धावून आलं. जबर कचाकची झाली. यात रशियन कमांडर सकट बरेच रशियन कमांडो ठार करून आणि हॅलिकॉप्टर्स उडवून देऊन बुडानेव्हचं पथक स्वतःची कमीत कमी हानी करून परत आलं.
२०२० मध्ये राष्ट्राध्यक्ष झेलिन्स्किने बुडानेव्हला गुप्तहेर प्रमुख बनवलं, त्यामागे अशा आणखीही मोहिमांमधली चमकदार कामगिरी आहे. ‘एचयूआर’मधले त्याचे सहकारी त्याच्याबद्दल बोलताना, सिंहासारखा शूर, चित्त्यासारखा चपळ, कोल्ह्यासारखा धूर्त अशा उपमा वापरत नाहीत. ते म्हणतात, ’आजवर आमचे बॉस हे चांगले व्यवस्थापक होते. आता हा माणूस चांगला नेता आहे. तो एखाद्या नागासारखा आहे. तो अतिशय संतुलित असतो. तो अतिशय हिशेबी असतो. तो कधीच कशानेही घाबरत नाही. तो सर्वांचं ऐकून घेतो, पण कुणाच्याच आहारी जात नाही. एखादा नाग जसा उंदरावर झडप घालण्यापूर्वी त्याच्याकडे टक लावून पाहत राहतो तसा. त्यामुळे उंदीर म्हणे भ्रमित होतो नि पळायचंच विसरतो. तसा हा आमच्याकडे पाहतो आणि त्याच्या मनातली योजना आम्हाला सांगून तसंच आम्हाला करायला भाग पाडतो.’
फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रत्यक्ष युद्धाला तोंड लागल्यावर, तर बुडानेव्ह झडझडून कामाला लागता. राजधानी कीव्ह शहराजवळ रिबाल्स्की नावाच्या एका बेटावर त्याच्या गुप्तहेर खात्याचं मुख्यालय आहे. ते अर्थातच अत्यंत सुरक्षित आहे. सुरुवातीला या कार्यालयावर झालेल्या रशियन क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यामुळे त्याचं फारसं नुकसान होऊ शकलेलं नाही. त्या हल्ल्यानंतर खुद्द पुतीन यांनी पत्रकारांसमोर बढाई मारली होती की, आमच्या ड्रोन हल्ल्यात ‘एचयूआर’चं मुख्यालय पूर्ण उद्ध्वस्त झालेलं असून, जबर जखमी झालेल्या गुप्तहेर प्रमुख बुडानेव्हला जर्मनीत हलवण्यात आलेलं असून, तो कोमात गेलेला आहे.
प्रत्यक्षात असं काहीही नाही. हा गुप्तहेर प्रमुख उझी मशीनगन लटकवून रिबाल्स्की बेटावर कीव्ह शहरात, जवळच्या होस्टोमेल या विमानतळ परिसरात कुठेही बिनधास्तपणे हिंडत असतो. मुख्यालयातलं त्याचं दालन म्हणजे एक नमुनाच आहे. चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे दालनाच्या बाहेर सुबक स्टेनो पोरी आणि दालनात सगळी श्रीमंती झकपक वगैरे भंकसगिरी अजिबात नाही. सगळ्या खिडक्यांना आतून बाहेरून वाळूची पोती रचून ठेवलेली आहेत. दालनात सर्वत्र मशीन गन्स, पिस्तुलं, अन्य छोटी-मोठी हत्यारं इतरत्र पडलेली आहेत. बुडानेव्ह साहेबांच्या मुख्य टेबलावर अनेक कागदपत्रांचे ट्रे आणि एक स्टॅण्ड- अलोन कॉम्प्युटर आहे. त्यावर युट्यूबरून विवाल्डी या इटालियन संगीतकाराची धून मंदपणे वाजते आहे. कोपर्यात एका फिश टँकमध्ये एक भलामोठा जीवंत बेडूक आहे.
दुसर्या कोपर्यात एक लव्हबर्डचा पिंजरा असून, ते अधूनमधून चिवचिव करताहेत. भिंतींवर सर्वत्र विविध युद्धांची छायाचित्रं लटकत आहेत. समोरच्या भिंतीवर एक मोठा पडदा असून, त्यावर बुडानेव्ह साहेबांचं अंतिम लक्ष्य शहर मॉस्कोचा नकाशा प्रकाशात उजळून निघतो आहे. अंतिम लक्ष्याच्या दिशेने आपण काय करू शकतो, हे बुडानेव्हने मे महिन्यात दाखवून दिलं आहे. रशियाची सगळी सुरक्षा यंत्रणा भेटून युक्रेनियन ड्रोन्स थेट क्रेमलिनच्या घुमटावर पोहोेचली होती. यांनी क्रेमलिनला काही हानी पोहोेचविण्यापूर्वी ती पाडण्यात आली. पण, बुडानेव्ह म्हणतो, ’रशियन सुरक्षा यंत्रणा म्हणजे अगदीच पोटेमकिन गावखेडं आहे, हे यावरून आम्ही सिद्ध केलं.’ पोटेमकिन गावखेडं (व्हिलेज) या शब्दप्रयोगाचा अर्थ कागदी वाघ! मेजर जनरल किरिलो बुडानेव्हच्या या अतिशय आक्रमक धोरणामुळे अमेरिकन आणि ब्रिटिश गुप्तहेर खात्यांना मात्र थोडी चिंता वाटते आहे. त्यांना असं वाटतयं की, प्रत्यक्ष रणांगणातला पराभव आणि बुडानेव्हच्या हैराण करून सोडणार्या गनिमी, घातपाती कारवाया यामुळे चिडीला येऊन पुतीन युक्रेनविरुद्ध अण्वस्त्र तर वापरणार नाहीत ना! तसं होऊ नये म्हणून गनिमी कारवाया थोड्या संयमाने कराव्यात.
यावर बुडानेव्ह म्हणतो, ’असं काहीही होणार नाही, मी गेली नऊ वर्षं या रशियनांची रणनीती आणि राजनीती पाहतो आहे, अभ्यासतो आहे. म्हणजे मी त्यांचा तिरस्कार करतो. पण, त्याचबरोबर मला हे ही पक्कं ठाऊक आहे की, रशियन शासक हे काही बेअक्कल, मूर्ख नाहीत. ते अण्वस्त्र वापरणार नाहीत.’ मग युद्ध कसं थांबू शकेल, यावर तो म्हणतो, ’एकतर रशियाचा पराभव झाला पाहिजे किंवा आमचा तरी. दुसरं म्हणजे रशियात सत्ता परिवर्तन झालं, तर याखेरीज पर्याय नाही?’
ते काहीही असलं तरी एक नक्की की, वयाच्या अवघ्या ३७व्या वर्षी मोठीच चमकदार कामगिरी करून दाखवणार्या या तरुणाचं भवितव्य उज्ज्वल आहे. त्याच्या अनेक सहकार्यांना वाटतं आहे की, पुढच्या वर्षी कदाचित त्याला संरक्षणमंत्रिपद सुद्धा मिळेल. अर्थात, या पदासाठी सध्याचा युक्रेनियन सरसेनापती जनरल व्हॅलरी झालुझ्नी याचंही नाव घेतलं जातं. कारण, प्रत्यक्ष रणांगणात जनरल झालुझ्नी याने भलतीच मर्दुमकी दाखवली आहे. बुडानेव्हचे सहकारी म्हणतात, ’तो स्वतः या कशाचाही विचार न करता फक्त विजयाचा विचार करतो आहे. पण, तो मोठ्या पदावर जाणारच’ आणि मग गदगदा हसून ते पुढे म्हणतात, ’मात्र, तोपर्यंत तो जीवंत राहिला पाहिजे.’ कारण, आतापर्यंत त्याला उडवण्याचे किमान दहा प्रयत्न झाले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.