नवी दिल्ली : काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी २७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजस्थान दौऱ्याला राजकीय वादात ओढण्याचा प्रयत्न केला आहे. गेहलोत यांनी दावा केला की , पंतप्रधानांच्या कार्यक्रमातून त्यांचे भाषण काढून टाकण्यात आले आहे. या प्रोपगेंडाची पोलखोल पंतप्रधान कार्यालयाने केली आहे. पीएमओ कार्यालयाने सांगितले की, मुख्यमंत्री गेहलोत यांना प्रोटोकॉलनुसार कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तसेच त्यांना भाषणासाठी ही वेळ देण्यात आला होता. मात्र त्यांच्या कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे सांगितले.
ज्या कार्यक्रमाबाबत गेहलोत यांनी दावा केला होता तो कार्यक्रम सीकरमध्ये होणार आहे. येथून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १४वा हप्ता नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. तसेच पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र आणि युरिया गोल्ड लॉन्च केला जाणार आहे. सीकरसह राज्यातील ५ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन आणि ७ महाविद्यालयांची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. यानंतर पंतप्रधान जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.
परंतु पंतप्रधान सीकरला पोहोचण्याच्या काही तास आधी, गेहलोत यांनी ट्विट करत आरोप केला की त्यांचे पूर्व-नियोजित तीन मिनिटांचे भाषण पीएमओने हटविले आहे. त्यांनी लिहिले, “माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी. आज तुम्ही राजस्थानला भेट देत आहात. तुमच्या ऑफिस PMO ने कार्यक्रमातून माझे पूर्व नियोजित ३ मिनिटांचे भाषण काढून टाकण्यात आले आहे. म्हणूनच मी तुमचे स्वागत भाषणातून करू शकणार नाही. त्यामुळे या ट्विटद्वारे मी तुमचे राजस्थानमध्ये मनापासून स्वागत करतो.
गेहलोत यांनीही या ट्विटमध्ये ५ मागण्या मांडल्या आहेत. याला उत्तर देताना पीएमओने सांगितले की, गेहलोत यांच्या कार्यालयाने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते. पीएमओने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अशोक गेहलोत जी, प्रोटोकॉलनुसार तुम्हाला आमंत्रित करण्यात आले आहे. तुमचे भाषणही ठरले आहे. पण तुमच्या कार्यालयाने तुम्हाला हजर राहता येणार नसल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील दौऱ्यांमध्ये तुम्हाला नेहमीच आमंत्रित करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमांना तुम्हीही उपस्थितीत राहिलात. आजच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुमचे स्वागत आहे. विकासकामांच्या फलकावरही तुमचे नाव आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या दुखापतीमुळे तुम्हाला शारीरिक त्रास होत नसेल, तर तुम्ही नक्की उपस्थित राहा.
सीएम गेहलोत यांच्या मागण्या
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मागण्यांमध्ये अग्निवीर योजना रद्द करून पूर्वीप्रमाणे सैन्य भरती सुरू करावी, केंद्र सरकारने जात जनगणनेचा निर्णय घ्यावा, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वन टाईम सेटेलमेंटच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, आदिवासी भागात उघडलेल्या तीन वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत द्यावी.