वणव्यात धुमसणारा ग्रीस

    24-Jul-2023   
Total Views | 89
Greek island of Rhodes after wildfires engulfed large parts of the island

पर्यटनासाठी सर्वाधिक पसंती लाभलेल्या ग्रीसमधील रोड्स बेट सध्या वणव्याच्या धगीत होरपळत आहे. मागील सहा दिवस ग्रीसमधील रोड्स बेटावर वणव्याने अक्षरश: थैमान घातले. हवामान बदलाचा प्रभाव आणि त्यामुळे तीव्र झालेल्या उष्णतेच्या लाटांमुळे ही आग लागली. रविवार, दि. २३ जुलै रोजी सुटलेल्या वादळी वार्‍यामुळे ती अधिकाअधिक पसरतच चालली आहे. सलग आठवडाभर सुरू असलेल्या या वणव्यामुळे पर्यावरणाचे आणि रोड्स बेटावरील जैवविविधतेचे अपरिमित नुकसान होत आहे. देशभरात हा जंगलातील आगीचा धोका अजून कायम असून, येणार्‍या उष्णतेच्या लाटांमुळे ही आग वाढण्याचा धोका अधिक आहे, असे सांगितले जात आहे.

ग्रीसमध्ये याच सुमारास एकूण ८२ वणवे लागल्याचा आकडा एका आंतरराष्ट्रीय संकेतस्थळाने दिला आहे. यापैकी ६४ वणव्यांची सुरुवात ही रविवारी सर्वाधिक उष्ण दिवस असल्यामुळे झाल्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. रोड्स बेटावर लागलेल्या प्रचंड ज्वालाग्रही आगीमुळे हजारो नागरिक आणि पर्यटकांना सरकार स्थलांतरित करत आहे. इव्हिया आणि कॉर्फ्यु या बेटांवर ही आग पसरली आहे. रोड्स बेटावर जंगली फॅलो हरीण, सूक्ष्म घोड्यांची एक दुर्मीळ प्रजाती, संरक्षित गिझानी गोड्या पाण्यातील मासे, फुलपाखरांची खोरी (पेटालॉड्स) आहेत. कोनिफर, प्लेन ओक्स, ओक्स, थाईम, केपर्स, सायक्लेमेन्स आणि इतर अनेक वन्य फुले व त्याच्या वनस्पतींचाही यामध्ये समावेश आहे. रोड्समधील मेडियव्हल ओल्ड टाऊन सिटी ही तिच्या समृद्ध सांस्कृतिक वारशामुळे ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित करण्यात आली आहे.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नुकसानाबरोबरच तेथील जनजीवनही या नावाने विस्कळीत झाले आहे. जंगल किंवा नैसर्गिक अधिवासावर उदरनिर्वाह करण्यार्‍या (उदा. देवदार वृक्षे जळाल्यामुळे त्यावर आधारित लोकांचे आर्थिक नुकसान) गटाचे मात्र यात सर्वाधिक हाल होतात. असे असल्याने रोड्स बेट आणि शहरामध्ये पर्यटाकांचा राबता असतो. गेल्या काही वर्षांत जंगलात अशा मोठ्या प्रमाणावर आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते. ऑगस्ट २०१२ मध्ये दक्षिण इव्हिया या ग्रीसमधील जंगलातही अशाचप्रकारे मोठा वणवा लागला होता. ४७.१ अंश सेल्सिअस पार तापमान जाऊन या तापमानाचा परिणाम म्हणूनच ऑगस्ट २०२१ मध्ये वणवा लागला. यामध्ये तीन मृत्यू, तर २० जण गंभीर जखमी झाले. ग्रीसमध्ये उष्ण तापमानामुळे लागणारे वणवे ही आता सामान्य गोष्ट झाली असली, तरी अलीकडच्या काही काळात अतिउष्ण तापमान, कोरडे आणि वादळी उन्हाळ्यांनी या देशाला आगीचे मुख्य केंद्रच बनवले आहे.

अगदी अशाच प्रकारे गेल्या वर्षी (२०२२) अ‍ॅमेझॉनच्या जंगलांमध्ये मोठे वणवे लागल्याचेही आपण बघितले आहेच. या आगीमध्ये अ‍ॅमेझॉन या जगातील सर्वात मोठ्या जंगलामधील जैवविविधतेतील अनेक प्रजातींचे नुकसान झाले. हे गमावलेले नैसर्गिक धन पुन्हा प्राप्त करणे; केवळ अशक्यच. कळस म्हणजे काही अहवालांतून ही आग मानवनिर्मित होती, असेही समोर आले आहे. विकास आणि पैशांच्या हव्यासापोटी पृथ्वीची चालवलेली, ही दुर्दशा थांबायला हवी. निसर्गाचा रुद्रावतार झाला, तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही; हे सांगणारी निसर्गाच्या हा चेतावणीचा सूर आपल्याला ओळखता यायला हवा.

तूर्तास ग्रीसमधील आणि तत्सम काही मोठ्या जंगलांमध्ये तापमानवाढीमुळे लागणार्‍या वणव्यांवर लक्ष केंद्रित करून त्याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. तापमानवाढ ही एक जागतिक समस्या. त्याला मानवच कारणीभूत आहे; हे उघड आहे. झपाट्याने होणारी तापमानवाढ रोखण्यासाठी चाललेले प्रयत्न केवळ वृक्षारोपणाच्या अवैज्ञानिक लागवडीमुळे थांबेल, हे गृहीत धरून अजिबात चालणार नाही. तापमानवाढीसाठी प्रदूषण, नैसर्गिक स्रोतांचा यथेच्छ वापर, वर्षानुवर्षे विघटन न होऊ शकणारा कचरा, हे सर्व घटक त्याकरिता या ना त्याप्रकारे कारणीभूत आहेत. या सगळ्या घटकांवर नियंत्रण आणल्याशिवाय या जागतिक समस्येला तोंड देणे केवळ अशक्यप्राय गोष्टच. मानवनिर्मित वणवे थांबवण्याबरोबरच, या नैसर्गिक वनव्यांच्या प्रश्नांवरही आपण उत्तर शोधू हीच अपेक्षा!


समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121