गांधीनगर : गुजरातच्या अनेक भागात सततच्या पावसामुळे पुराची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच अनेक भागात पूर आणि पाणी साचल्याने लोकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, नॅशनल डिफेन्स रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या टीमने दि. २२ जुलै रोजी या या प्रदेशातील जुनागढ जिल्ह्यात बचाव कार्य केले.
या बचाव कार्यात, एनडीआरएफचे जवान सामान्य लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी शहरातील लोकांना पूर आणि जलमय भाग ओलांडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत केली. याआधी दि. २२ जुलै रोजी नवसारी शहरात पावसाळ्यात एक व्यक्ती बेपत्ता झाली होती, ज्याचा शोध अजूनही सुरू आहे.
दरम्यान नवसारीच्या जिल्हाधिकार्यांनी सांगितले की, सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. नवसारीचे जिल्हाधिकारी अमित प्रकाश यादव म्हणाले, "आमची ४० पथके घटनास्थळी दाखल झालेली आहेत. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र एक जण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे."
याशिवाय सततच्या पावसामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी शिरल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसामुळे गुजरातच्या राष्ट्रीय महामार्ग ४८ वर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, नंतर वाहनांची वाहतूक पुन्हा सुरू झाली.
अनेक भागात पावसाचा इशारा
वलसाड, भावनगर, देवभूमी द्वारका, दमण आणि दादरा नगर हवेलीसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर अहमदाबाद, आनंद, भरूच, बनासकांठा, साबरकांठा, अमरेली, जामनगर, गीर सोमनाथ आणि कच्छसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरेंद्रनगर, दाहोद, जुनागढ, राजकोट, बोटाद, वडोदरा, सुरत आणि नवसारी येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सीएम भूपेंद्र पटेल यांनी केली हवाई पाहणी
तत्पूर्वी दि. २१ जुलै रोजी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सुत्रापारा, मंगरोळ आणि गीर सोमनाथ येथील पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले. NDRF च्या म्हणण्यानुसार, दि.१९ जुलै रोजी राज्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची प्रत्येकी एक टीम गुजरातच्या गीर सोमनाथ, कच्छ, नवसारी, वलसाड, अमरेली आणि राजकोट जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहे.