जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंत्री राजेंद्र सिंह गुडा यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीवर त्यांनी आपल्याच सरकारला आरसा दाखवला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचवेळी मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओवरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यामुळेच राजेंद्र सिंह गुढा यांना पदावरून हटवण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांची शिफारस स्वीकारत राज्यपाल कलराज मिश्रा यांनी राजेंद्र सिंह गुडा यांच्या बडतर्फीला मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांना मंत्रिपदावरून तत्काळ बडतर्फ करण्याची शिफारस केली होती. काँग्रेस हायकमांडची मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
राजेंद्र सिंह गुढा विधानसभेत म्हणाले होते की, “सत्य हे आहे की महिलांच्या सुरक्षेत आपण अपयशी ठरलो आहोत. राजस्थानमध्ये ज्याप्रकारे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, त्या मणिपूरऐवजी आपण स्वतःच्या घरात पाहायला हवे. त्यांच्या या विधानाने सरकारचेच पितळ उघड पडलं. त्यामुळेच नाराज झालेल्या अशोक गेहलोत यांनी त्यांना आपल्या मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला.