डोळ्यांनी पाहिलं तर समुद्र निळाशार दिसतो. परंतु, ही माहिती बाजूला पडून आता नवी माहिती समोर आली आहे की, समुद्र पाहिल्यावर तो हिरवा दिसतो! कारण, नुकताच एक अहवाल समोर आला असून, त्यानुसार समुद्राचा एक मोठा भाग, ज्याच्या पृष्ठभागाचा रंग बदललेला दिसत असून, त्यामुळे समुद्राचा रंगही बदललेला जाणवतो. परंतु, यामागील कारणे आणि त्यामुळे कोणते धोके उद्भवू शकतात, याविषयीची माहिती जाणून घेणे आवश्यक ठरावे.
‘नेचर पत्रिका‘ या नामांकित आंतरराष्ट्रीय साप्ताहिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालामुळे हा विषय सध्या चर्चेत आला आहे. मोदीस-अॅक्वा सटेलाईट (MODIS aqua satellite)ने २००२ ते २०२२ या २० वर्षांच्या कालावधीत महासागरांचा अभ्यास वेगवेगळ्या ठिकाणी केला. त्यात महासागराचा रंग निळा नव्हे, तर हिरवा दिसत असल्याचे समोर आले. प्रकाशकिरणांमुळे महासागराचा रंग निळा दिसतो. परंतु, तो आता हिरवा दिसतोय. याठिकाणी महासागराच्या पृष्ठभागावर विशिष्ट सूक्ष्म वनस्पती आहेत. सूर्यप्रकाशामुळेच त्यांचे अस्तित्व टिकून आहे आणि या वनस्पतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मुख्यतः भूमध्य रेषेपासून उत्तर आणि दक्षिणेकडे उष्णकटिबंध महासागरी क्षेत्रात हा हिरवा रंग सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या मध्यात हा हिरवा रंग दिसून येतो. परंतु, महासागराचा रंग निळा का दिसतो, हे जाणून घेऊया. लाल, नारंगी आणि पिवळ्या रंगांची तरंगलांबी लांब असते आणि ती पाण्याद्वारे सहज शोषली जाते. इतर रंगांच्या तुलनेत निळ्या प्रकाशाची तरंगलांबी कमी असते. त्यामुळे तो निळा रंग प्रतिबिंबित करतो. लांब तरंगलांबींचे प्राधान्य शोषण महासागरांचा निळा रंग वाढवते. हे तेव्हाच घडते जेव्हा पाणी स्वच्छ असते. कारण, अल्गल ब्लूम, प्लँक्टन्स किंवा चिखल यांसारख्या अशुद्धत घटकांमुळे निळ्या रंगाचे प्रतिबिंब थांबते. आकाशातही असेच काहीसे होते.
महासागराच्या पाण्याचा रंग हिरवा दिसण्यामागे ‘फाइटोप्लँक्टन’ हे मुख्य कारण आहे. त्याआधी ‘प्लँक्टन’ समजून घेऊया. जलतरंगानुसार प्रवाहित होणार्या प्राणी किंवा वनस्पतींना ‘प्लँक्टन‘ असे म्हणतात. यात दोन प्रकार आहे. ‘जोप्लँक्टन‘मध्ये समुद्री सूक्ष्म जीवांचा समावेश होतो. या जीवांमध्ये जेलीफिश, मोलस्क आणि माशांच्या अळ्या आदींचा प्रामुख्याने समावेश होतो. ‘फाईटोप्लँक्टन’ या दुसर्या प्रकारात सूक्ष्म वनस्पती अर्थात साइनोबॅक्टेरिया, डायनोफ्लॅगलेट्स आणि हिरवे शेवाळ यांचा समावेश होतो. ‘फाईटोप्लँक्टन’ महासागरात जीवन नियंत्रित करम्यास मदत करतात. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतदेखील ते भाग घेतात. कार्बनडाय ऑक्साईड घेऊन नंतर ऑक्सिजन सोडला जातो.
जगभरातील अर्ध्याहून अधिक ऑक्सिजन उत्सर्जन ’फाईटोप्लँक्टन‘ करतात. कारण जमिनीपेक्षा समुद्री भाग पृथ्वीवर सर्वाधिक आहे. अनेक ’फाईटोप्लँक्टन‘ अन्य सूक्ष्म जीवांच्या आधारे अतिरिक्त ऊर्जा प्राप्त करत असतात. समुद्री अन्नसाखळीतही यांचा सहभाग असतो. ’फाईटोप्लँक्टन‘ अधिक झाल्यास सुपोषण वाढू शकते. समुद्रीय परिस्थिती बदलण्यास सुरुवात होईल. त्यामुळे भविष्यात हे संकट अधिक गहिरे होण्याची दाट शक्यता आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले, तर समुद्रातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढले की, समुद्रातील वनस्पती प्लवंग प्रकाशासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर येतात व त्यामुळे पाणी हिरवे वा शेवाळयुक्त दिसते.
प्रकाशकिरण अत्यंत सूक्ष्म कणांवर पडल्यानंतर सर्व दिशांना विखुरते. याला प्रकाशाचे ‘विकिरण’ म्हणतात. आकाश निळे दिसण्याचा संबंध सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करताना होणार्या विकिरणाशी आहे. सर्वांत कमी तरंगलांबी असणार्या निळ्या रंगाचे जास्त प्रमाणात विकिरण तयार होतात. विकिरण झालेला प्रकाश आपल्या डोळ्यांना दिसल्याने आकाश निळे भासते. पूर्वी असे मानले जाई की, आकाशाच्या निळ्या रंगाच्या परावर्तनामुळे समुद्राचे पाणी निळे दिसते. पाण्याला रंग नाही, असे आपण म्हणतो. विविध प्रक्रियेमुळे समुद्राचे पाणी निळेशार दिसते. परंतु, ते जर आता काही ठिकाणी हिरवे दिसत असल्यास, तर ही एक नक्कीच धोक्याची घंटा आहे.