पुणे पोलिसांनी पकडले २ फरार दहशतवादी

पहाटे गस्तीदरम्यान सतर्कता : ‘आयसीस’पासून प्रेरित ’सुफा’ संघटनेचे सदस्य आहेत आरोपी

    19-Jul-2023
Total Views |
 Arrested Two Terrorist escaped
 
पुणे : पोलिसांच्या दोन कर्मचार्‍यांनी गस्तीवर असताना वाहनचोरीच्या संशयावरून सतर्कता दाखवीत तीन दहशतवाद्यांना पकडले. यातील एक जण पसार होण्यात यशस्वी झाला. मात्र, दोन जणांना मात्र ताब्यात घेण्यात आले. या दहशतवाद्यांवर राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे. राजस्थानमधील एका गुन्ह्यात ते फरार आहेत. मागील गेल्या दीड वर्षांपासून ते पुण्यात लपल्याचे समोर आले आहे. हे दोघेही ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेपासून प्रेरित झालेल्या ’सुफा’ या संघटनेचे सदस्य आहेत.

इमरान खान आणि मोहम्मद युनूस साकी अशी या दोन संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी माहिती दिली. कोथरुड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल प्रदीप चव्हाण आणि अमोल नझन हे , दि. 18जुलै रोजी पहाटे गस्त घालत होते. पहाटे २.४५ वाजता त्यांना तीन जण एकाच दुचाकीवरून जात असताना दिसले. वाहन चोर असल्याच्या संशयातून या तिघांना चव्हाण आणि नझन यांनी पकडले. त्यांना ताब्यात घेऊन ते राहात असलेल्या कोंढवा येथील घरात झडती घेण्यात आली. त्यावेळी एकजण पसार झाला. पोलिसांनी उर्वरित दोघांना पकडून ठेवले. कोंढव्यातील घरात एक जीवंत काडतुस, चार मोबाईल आणि लॅपटॉप आढळून आला. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले आहे.

कोथरूड पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. लॅपटॉपच्या तपासणीत हे दोघेही माहिती देताना बनाव रचत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. दहशतवाद विरोधी पथकाला माहिती देण्यात आली. ‘एटीएस’ने त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. त्यानंतर या दोघांना गुन्हे शाखेत आणून तपास सुरू करण्यात आला. पोलीस आयुक्त रितेशकुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी या दोघांकडे सखोल चौकशी सुरू केली. या चौकशीत हे दोघेही मध्य प्रदेशातील रतलामचे असल्याचे समोर आले. राजस्थानमधील चितोढगड या ठिकाणी सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी ‘एनआयए’ने कारवाई केली होती. या गुन्ह्यात हे दोघे संशयित आहेत. ‘एनआयए’ने त्यांना फरार घोषित केलेले आहे. त्यांना पकडणार्‍यास प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले होते.

पोलीस कर्मचार्‍यांना गस्तीदरम्यान वाहनचोर असल्याचा संशय आला. त्यांना ताब्यात घेऊन घरझडती घेण्यात आली. जप्त केलेल्या लॅपटॉपमधून हे दोघे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. राजस्थानमधून पळून आलेले हे दोघे पुण्यात कोंढवा परिसरात मागील १६महिन्यांपासून राहात होते. त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेले दोघे मध्य प्रदेशमधील रतलामचे असून त्यांच्यावर राजस्थानमध्ये स्फोटके बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. -रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121