मुंबई : “चित्रपट हा ऐतिहासिक दस्तऐवज असू शकत नाही. परंतु 'शिवराज अष्टक' या श्रृंखलेमार्फत येणाऱ्या भावी पिढीला आपला इतिहास समजावा हा माझा अट्टहास आहे”, असे मत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना मांडले. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटानंतर याच श्रृंखलेतील पाचवे पुष्प असणारा 'सुभेदार' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारित असणार आहे. दरम्यान, या चित्रपटाची प्रदर्शनाच्या तारखेत आला बदल करण्यात आला आहे.
'सुभेदार' हा चित्रपट आधी २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, लोकांच्या आग्रहाखातर आता हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. 'सुभेदार' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर याने इन्स्टाग्रामवरुन चित्रपटातील 'मावळं जागं झालं रं' या पहिल्या गाण्याची झलक शेअर केली होती. यावेळीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख व्हिडिओद्वारे जाहीर करण्यात आली.
नव्या पिढीसाठी केला अट्टहास
दिग्पाल लांजेकर यांनी ‘मुंबई तरुण भारत’शी बातचीत करताना 'सुभेदार' हा चित्रपट अधिकाधिक संशोधनाच्या माध्यमातून उभारला असल्याचे सांगितले. दिग्पाल म्हणाले, “सुभेदार चित्रपट करताना मी अनेक पुरावे गोळा केले त्याच अनुशंगाने या चित्रपटाची कथा बांधण्यात आली”. मुळात चित्रपट हा ऐतिहासिक दस्तऐवज नसू शकतो असे मत मांडत पुढच्या पिढिला आपला इतिहास समजावा आणि त्यांना इतिहासाची माहिती मिळावी म्हणून खरं तर 'शिवराज अष्टक' या श्रृंखलेच्या मार्फत नव्या पिढीला इतिहासाकडे वळवण्याचा एक प्रयत्न असल्याचेही दिग्पाल लांजेकर म्हणाले.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' या चित्रपटात अभिनेते अजय पुरकार तानाजी मालूसरेंची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. तर त्यांच्या पत्नीची सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी साकारली आहे. सूर्याजी मालुसरेंच्या दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, त्यांच्या पत्नीची म्हणजे यशोदाबाईंची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे. तर सुभेदारांचा मुलगा रायबाच्या भूमिकेत अर्णव पेंढारकर दिसणार आहे.