नवी दिल्ली : देशातील जनतेचा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) आणि त्याच्या विकासाच्या राजकारणावर पूर्ण विश्वास आहे. त्याचवेळी विरोधी पक्षांची आघाडी कशासाठी आहे, हेदेखील जनता जाणून आहे. त्यामुळे २०२४ साली जनतेच्या विश्वासामुळे सलग तिसऱ्यांदा ‘रालोआ’ सत्तेत येईलच, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
भाजपप्रणित ‘रालोआ’चे २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यमान मित्र पक्ष आणि नव्या साथीदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यास पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. ते म्हणाले, ‘रालोआ’ अर्थात ‘एनडीए’ म्हणजे ‘न्यू इंडिया, डेव्हलप्ड नेशन आणि एस्पिरेशन ऑफ पीपल अँड रिजन’. ‘रालोआ’ सरकारने देशातील गरिब, वंचित, दलित, वनवासी, महिला, युवक यांच् सर्वांगीण विकासासाठी काम केले आहे. देशाचा विकास हेच ‘रालोआ’चे ध्येय आहे. ‘रालोआ’ने देशात मतपेढीच्या राजकारणास संपवून विकासाचे राजकारण सुरू केले आहे. त्याद्वारे येत्या २५ वर्षात विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्याचा मजबूत पाया गेल्या ९ वर्षांत रचला आहे. त्यामुळे २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनताजनार्दन ‘रालोआ’ सरकारला सलग तिसऱ्यांदा सत्तेत आणणार आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याचे कारण जनतेला ठाऊक आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, स्वार्थासाठी मूल्यांशी तडजोड करणारे हे पक्ष आहेत. केरळमध्ये डावे आणि काँग्रेसचे वितुष्ट आहे, बंगालमध्ये डावे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेस हल्ले करते, बिहारमध्ये राजद आणि जदयु, काश्मीरमध्ये पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स हे एकमेकांशी कसे वागतात, परस्परांवर कशी टिका करतात हे जनता पाहत आहे. बंगळुरूमध्ये मात्र हेच पक्ष एकत्र आल्याचे सांगत आहेत. एकीकडे ‘रालोआ’ लोकांना जोडण्याचे काम करते, तर त्यांची आघाडी लोकांना तोडण्याचे काम करते. त्याचप्रमाणे देशातील सरकारला पाडण्यासाठी परदेशी शक्तींची मदत घेण्याचा प्रयत्न जनतेला माहिती आहे. त्यामुळे जनता आता या नूरा कुस्तीला कंटाळली असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष (पशुपति कुमार पारस), अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम, अपना दल (सोनेलाल), पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी, ऑल झारखंड स्टुडंट युनियन, सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा, मिझो नॅशनल फ्रंट, इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा, नागा पीपल्स फ्रंट, नागालँड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), आसाम गण परिषद, पट्टाली मक्कल काची, तमिळ मानिला काँग्रेस, युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल, सुहेलदेव भारतीय समाज पक्ष, शिरोमणी अकाली दल (संयुक्त), महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, जननायक जनता पार्टी, प्रहार जनशक्ती पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, जन सुराज्य शक्ती पार्टी, कुकी पीपल्स अलायन्स, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (मेघालय), हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, निषाद पक्ष, ऑल इंडिया एनआर काँग्रेस, हिंदुस्थानी अवाम मोर्चा, जनता सेना पक्ष, हरियाणा लोकहित पार्टी, भारत धर्म जन सेना, केरळ कामराज काँग्रेस, पुथिया तमिळगाम, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) आणि गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट या पक्षांचा समावेश होता.