मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या एका कथित व्हिडीओवरून विरोधी पक्षातर्फे धुमाकूळ घातला जात आहे. मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनातही या घटनेचे पडसाद उमटले असून विरोधकांनी या प्रकरणी आरोपांची राळ उठवली आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून 'त्या' कथित व्हिडीओ प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीने सोमैय्या यांचा एक कथित व्हिडीओ बाहेर काढला असून या व्हिडिओमुळे सोमेय्यांवर आरोप केले जात आहेत. या विषयावर विधान परिषदेत देखील गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. उबाठा गटाचे आमदार अनिल परब आणि इतर नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर या प्रकरणाची चर्चा झाली. अखेरीस फडणवीसांनी यावर अधिकृतपणे बाजू मांडत दोषी असलेल्या कुणालाही सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, '' सदरील प्रकरणात विरोधी पक्षाकडे जर कुठली तक्रार असेल तर त्यांनी ती आमच्याकडे द्यावी. या संदर्भात काहीही महत्त्वाची अन ठोस माहिती / पुरावे कुणाकडेही असतील तर ते त्यांनी द्यावेत, त्याची निष्पक्षपणे कुणालाही न सोडता चौकशी केली जाईल.' असे आश्वासन फडणवीसांनी यावेळी सभागृहाला दिले आहे.
सोमैय्यांनी केली चौकशीची मागणी
दरम्यान, व्हिडीओ प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या यांनी स्वतः पुढे येऊन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोमैय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहण्याची अन चौकशी करण्याची मागणी केली.