पर्यावरण-अध्यात्माची सांगड घालणारे पुणेकर

    13-Jul-2023
Total Views |
article on Dr. Sachin Punekar
 
पर्यावरण आणि अध्यात्माची सांगड घालून जैवविविधता, वनस्पती वर्गीकरणशास्त्र, परागीभवन शास्त्र, औषधी वनस्पती यांच्याविषयी ‘बायोस्फियर्स संस्थे’मार्फत काम करणारे डॉ. सचिन पुणेकर यांच्याविषयी...

सचिन यांचा जन्म शेतकरी कुटुंबातला. लहानपणापासूनच त्यांचे निसर्ग आणि पर्यावरणावर प्रेम जडले. पुण्याच्या स. प. महाविद्यालयामधून ‘बीएससी’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वनस्पती शास्त्रातील ’एमएससी’ तसेच कर्नाटकमधील ‘दांडेली-अनशी राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती’ या विषयावर ‘डॉक्टरेट’ मिळवली. भारतीय वनस्पती सर्वेक्षण, पुणे , आघारकर संशोधन संस्था, पुणे , नसरोजी गोदरेज सेंटर फॉर प्लांट रिसर्च अशा विविध संस्थांमधून त्यांनी सखोल संशोधन केले आहे. सिक्कीम हिमालय परिमंडळ, भारतीय वनस्पती सर्वेक्षण, गंगटोक येथे भारत सरकारच्या वने व पर्यावरण मंत्रालयात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणूनदेखील काही काळ त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे.

संपूर्ण भारतभर त्यांनी प्रवास केल्यामुळे समाजाकडे आणि पर्यावरणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक बनला. जैवविविधता, वनस्पती वर्गीकरणशास्त्र, परागीभवन शास्त्र, औषधी वनस्पती हे त्यांच्या अभ्यास व संशोधनाचे विषय आहेत. ’बायोस्फियर्स संस्थे’मार्फत अनेक वर्षांपासून ते सातत्याने कार्यरत आहेत. अध्यात्म आणि विज्ञान याची सुरेख सांगड ते घालतात. आपल्या रुढी, परंपरा, चालीरिती यामागे दडलेले विज्ञान आणि त्यांचा समाजाला पूरक असलेला विचार यांबाबत तळागाळातील माणसांपर्यंत ते माहिती पोहोचवत असतात.

पश्चिम घाटातील देवराईचे महत्त्व आणि संवर्धन, भारतातील कंदील पुष्प (शिरोपेजिया) बाबतचे संशोधन, पश्चिम घाटातील संवेदनशील अधिवासामधील जीवसृष्टीचे मूलभूत संशोधन, देववृक्ष-ज्ञानवृक्ष म्हणजेच अजानवृक्षाचा प्रचार आणि प्रसार, परदेशी उपद्रवी तणांची तन होळी, माऊली हरित अभियान, माबी, जैविक आक्रमणाविरोधी लोक चळवळ, पर्यावरण चावडी, जैवविविधता महोत्सव, गडकोट स्वच्छता अभियान मोहिमा, पूजापत्री, साक्षरता अभियान, नंदी संवर्धन आणि संशोधन अभियान, शिवसुमन-शिवरायांच्या नावाचे फूल, टपाल विभागामार्फत प्रकाशित केलेली अनेक विशेष आवरणे, सचित्र पोस्ट कार्ड इत्यादी अनेक गोष्टी त्यांच्या कार्याची प्रचिती देतात. जैवविविधतेचे महत्त्व आणि संवर्धनासाठी त्यांनी टिपलेल्या अनेक छोट्या-मोठ्या घटना, निरीक्षणे, सखोल अभ्यास याची नोंद भारतासोबतच जगभरातील वैज्ञानिकांनी घेतली आहे.

निसर्ग अभ्यासताना तो एककल्ली किंवा एकसुरी न होता सर्वसमावेशक असावा, असा त्यांचा कायम दृष्टिकोन असतो. वनस्पती वर्गीकरण, त्यांची ओळख, त्याबरोबर परागीभवनशास्त्र, वनस्पती-प्राणी परस्पर संबंध, परिस्थितीकी शास्त्र हे त्यांचे विशेष जिव्हाळ्याचे विषय आहेत. दृष्टीआड असलेली अनेक निसर्गसूत्र ते सहजपणे उलगडून सांगतात आणि दाखवतात. निसर्गाकडे बघण्याची एक नवी दृष्टी ते हमखास देतात. सर्वांना निसर्ग साक्षर करून सोडण्याचे कसब डॉ. पुणेकर यांच्यामध्ये आहे.ते स्वतः एक उत्तम छायाचित्रकार आहेत. जंगलातील भटकंती दरम्यान टिपलेल्या अनेक दुर्मीळ वन्य जाती-प्रजाती, वनस्पती यांच्या छायाचित्रांचे उत्तम संकलन त्यांच्याकडे आहे.

सह्याद्री घाटमाथ्यावरील, अनशी राष्ट्रीय उद्यान आणि परिसरातील वन, वनस्पती, प्राणी यावर लिहिलेलं पुस्तक अनेक संशोधक व अभ्यासकांना मार्गदर्शक ठरतं. समाजाशी घट्ट नाळ जोडला गेलेला एक मनस्वी भटक्या असे त्यांचे वर्णन अनेकजण करतात. दख्खनचे पठार, सह्याद्रीचा घाटमाथा, हिमालयातील शिखरे, समृद्ध समुद्रकिनारे अशा अनेक ठिकाणी त्यांचे अविरत भटकंती सुरू असते. जैवविविधता अध्ययन करायला अनेक जण त्यांच्यासोबत ढोरवाटा, जंगलवाटा तुडवत असतात. त्यांनी पर्यावरण, गडकोट, विज्ञान यांबाबत सातत्याने लिखाण केलेले आहे. व्याख्याने, स्लाईड शो, परिसंवाद, चर्चासत्रे, लघुपट, राष्ट्रीय सिद्धांत, राष्ट्रीय परिषदा या माध्यमातून त्यांनी सातत्याने संवाद साधलेला आहे. त्यांनी आजवर ६० पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंध लिहिले आहेत. तसेच, नामांकित संशोधन नियतकालिकांमध्ये लेखन प्रकाशित झालेले आहे.

’मुव्हमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकल इन व्हिजन’ (माबी) सारखी संकल्पना पुण्यातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून आता देशभरात नेताना त्यांनी खूप धडपड केली. उपद्रवी आगंतुक तणांविरोधात समाजात जागर सुरू केला आहे. ‘माऊली हरित अभियानां’ंतर्गत अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत केलेले दुर्मीळ वृक्षांचे संवर्धन असो वा संत महात्म्यांनी सांगितलेले विज्ञाननिष्ठ विचार असोत, हरित वारीच्या माध्यमातून ते सर्वदूर नेण्याचे लोकोपयोगी काम ते सातत्याने करीत आहेत. ‘शिवसुमन’ अर्थात शिवरायांच्या नावाचे फूल घोषित करण्यामध्येदेखील त्यांचा मोलाचा वाटा आहे.

टपाल खात्यामार्फत प्रकाशित केलेली शिवयोग, रायरेश्वर, हिंदवी स्वराज्य भूमी अशी अनेक विशेष आवरणे आणि ‘जुन्नरची रत्ने’ ही जुन्नर परिसरातील ऐतिहासिक जैविक आध्यात्मिक वारसा सांगणारी सचित्र पोस्ट कार्ड संच हे त्यांच्या कल्पकतेची उत्तम उदाहरणे आहेत. डॉ. पुणेकर यांच्या कार्यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांची त्यांना उत्तम साथ लाभली. त्यांचे आईवडील, पत्नी, बंधू आणि कुटुंबातील अन्य सदस्य कायमच त्यांच्या पाठीशी उभे असतात. त्यामुळेच ते निसर्ग आणि समाजसेवेमध्ये सतत काम करीत आहेत. त्यांच्या पर्यावरणविषयक कामासाठी आणि समाजसेवेसाठी दै. ’मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!



-लक्ष्मण मोरे