मणिपूर भारताचा अंतर्गत प्रश्न – युरोपीय महासंघास भारताने सुनावले
13-Jul-2023
Total Views |
नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचाराचा सामना करत असलेल्या मणिपूरबाबत युरोपियन युनियनच्या ब्रसेल्सस्थित संसदेत दि. १२ जुलै रोजी एक ठराव मांडण्यात आला, तो भारत सरकारने फेटाळला आहे. मणिपूरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून मणिपूर हिंसाचारावर भारताने आपली भूमिका स्पष्ट करूनही युरोपियन संसदेत ठरावावर चर्चा सुरू असल्याचे भारताचे म्हणणे आहे.
भारताने युरोपीय महासंघाचा हा प्रस्ताव साफ फेटाळला आहे. दिल्लीत परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा म्हणाले की, भारत सरकारने मणिपूरमधील परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि या संदर्भात युरोपीयन संसद सदस्यांशीही चर्चा केली आहे, तरीही हा प्रस्ताव युरोपीय महासंघाच्या संसदेत मांडण्यात आला आहे.
ही पूर्णपणे भारताची अंतर्गत बाब आहे. युरोपियन संसदेतील घडामोडींची आम्हाला जाणीव आहे. या संदर्भात आम्ही युरोपिय महासंघाच्या संसदेच्या सदस्यांशीही संपर्क साधला आहे. ही पूर्णपणे भारताची अंतर्गत बाब असल्याचे आम्ही स्पष्ट केले आहे, असेही क्वात्रा यांनी यावेळी म्हटले आहे.
युरोपियन संसदेत १२ जुलै रोजी सहा संसदीय पक्षांनी मणिपूरमधील हिंसाचार न थांबवल्याबद्दल मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर टीका करणारा ठराव मांडला. ठरावात हिंसाचाराचा निषेध करून युरोपीय महासंघाच्या उच्च अधिकाऱ्यांना परिस्थिती सुधारण्यासाठी भारताशी चर्चा करण्याचे निर्देश देण्यात आले होते.