मुंबई : मालिका अथवा चित्रपट यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही की ती बंद करण्याखेरीज दिग्दर्शक अथवा निर्मात्यांकडे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध राहात नाही. अशीच काहीशी वेळ झी मराठी वाहिनीवरील 'लोकमान्य' या मालिकेवर आली आहे. ही मालिका लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित असून लवकरच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर त्याच्या जागी नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेत अभिनेता क्षितिष दाते याने लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री स्पृहा जोशीने लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली आहे. परंतु आता ही मालिका बंद होणार असल्याचं समोर आलं आहे.
लोकमान्य मालिका गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मालिकेत स्पृहा जोशी आणि क्षितिश दाते यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. नुकतेच या मालिकेने १०० भागांचा टप्पा पार केलेला पाहायला मिळाला होता. त्यानंतर या मालिकेने बऱ्याच वर्षांचा लीप घेतलेला दिसून येतो. या लीपमुळे मालिकेत अनेक नवीन पात्रांची एन्ट्री करण्यात आलेली आहे. मात्र आता प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून ही मालिका आटोपती घेण्यावर भर दिला जात असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, याबद्दल रोष व्यक्त करत नितीन वैद्य यांनी मालिकेचे उत्तम सादरीकरण आणि मालिकेचा दर्जा राखून ठेवला असला तरी आता वाहिनीने मालिका बंद करण्यास सांगितले आहे. त्यामुळे इथून पुढे आता कोणतेही ऐतिहासिक मालिका करायची असेल तर ठराविक भागांपूर्तीच ती मर्यादित ठेवण्यात येईल असा निर्णय घ्यावा लागेल. तेवढ्या भागांपुरताच वाहिनीशी करार करू असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान लोकमान्य मालिका वास्तवाला धरून असावी यावर आम्ही खूप मेहनत घेतली होती. पण पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे वेळेअगोदरच मालिकेला निरोप घ्यावा लागत आहे. यामुळे नितीन वैद्य यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या मालिकेच्या जागी कोणती मालिका येणार याचीही चर्चा जोर धरु लागली आहे.