नेमेचि होता मुंबईची तुंबई...

    11-Jul-2023   
Total Views |
Heavy rain Waterlogging Mumbai City BMC

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे मुंबईकर ‘नेमेचि होते मुंबईची तुंबई’ असे म्हणत कसेबसे पावसाळ्यांत अक्षरश: ‘जीवाची मुंबई’ करतात. पालिकेचेही दरवर्षीप्रमाणे १०० टक्के नालेसफाईचे दावे पहिल्या पावसात धुवून निघतात. यंदाही मुंबईची परिस्थिती काही वेगळी नाहीच. त्याचाच या लेखातून घेतलेला हा आढावा...

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये, मुंबईत पूरस्थिती उद्धवू नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने नाले वा पर्जन्यजलवाहिन्या अगदी १०० टक्के साफ केल्याचा दरवर्षीप्रमाणे दावा केला. पालिकेच्या नोंदीप्रमाणे ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचे मुख्य कारण म्हणजे, नागरिकांकडून या नाल्यात वा जलवाहिन्यांमध्ये कचरा वा घाण फेकल्यामुळे चिखल वा गाळ साचून पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. वाहिन्यांची खोलीदेखील गाळ भरून कमी झालेली दिसते. म्हणजेच, हे नाले चिखलाने भरलेले राहतात व अनेक ठिकाणी ते घाणीने भरून जाऊन (clog) त्यांची जलवहनाची क्षमता कमी झालेली असते. म्हणूनच हे नाले साफ (desilting) करावेच लागतात. म्हणूनच पालिकेकडून नाल्यातील चिखल व तळातला गाळ पावसाळ्यापूर्वी दरवर्षी उपसण्याचे सोपस्कार केले जातात.

मुंबईमध्ये ब्रिटिशकाळापासून पर्जन्य जलवाहिन्यांचे विशेषत: शहर क्षेत्रामध्ये काही ठिकाणे वगळता उपनगरातही नाल्यांचे जाळे उभारले आहे. उपनगरात उघडे नाले होते, ते आता ‘बॉक्स टाईप’ नाल्यांत रुपांतरित होत आहेत. शिवाय मोठे व छोटे नाले पाणी पर्जन्य जल समुद्रात वाहून नेण्यासाठी बांधलेले आहेत. या नाल्यांमधून हे पाणी सहजपणे न तुंबता वाहण्यासाठी गुरुत्वाच्या मदतीने खाड्यांमधून वा नद्यांमधून समुद्रापर्यंत पुढे जात राहायला हवे. या पर्जन्य जलवाहिनींची एकूण लांबी रस्त्याच्या लांबीएवढी दोन हजार किमी आहे. शहर क्षेत्रात ४४० किमी भूमिगत नाले, २०० किमी मोठे नाले व ८७ किमी छोटे नाले असे एकूण २ हजार, ७०० किमी लांबीचे नाले व वाहिन्या रस्त्याला समांतर असे बांधलेले आहेत. हे नाले साफ करताना नेहमी दि. २६ जुलै, २००५च्या जीवघेण्या पूरघटनेची आठवण सतत मनात असते. कारण, तेव्हा सुमारे ५०० जण या महापुरात मृत्युमुखी पडले होते.

या वर्षीच्या पालिकेच्या अर्थसंकल्पात नालेसफाईच्या कामासाठी रु. २२६ कोटी खर्च येईल, म्हणून ही रक्कम राखीव ठेवलेली आहे. गेल्यावर्षी ही रक्कम रु. १६२ कोटी होती. या वर्षीची नालेसफाईची कामे लवकर सुरू करून पालिकेकडून १०० टक्के नालेसफाईचा दावाही केला गेला. दि. ३१ मेपर्यंत शहरातील १०४ टक्के, पूर्व उपनगरातील १०६ टक्के व पश्चिम उपनगरातील १०७ टक्के व छोट्या नाल्यांमधून १११ टक्के गाळ उपसला गेला, असा दावा पालिकेने केला. एकूण या नाल्यांमधून ९.८४ लाख मेट्रिक टन गाळ उपसला गेला, असे पालिकेचे म्हणणे.

मुंबईतील नाल्यांपैकी रफिकनगरचा नाला हा एक मोठा नाला मानला जातो. हा नाला मुंबईतील अधिक घनतेच्या लोकसंख्येच्या भागातून म्हणजे घाटकोपर, चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्द या झोपडपट्ट्यांच्या दाटीवाटीच्या क्षेत्रातून जातो व शेवटी वाशीच्या खाडीत या नाल्याचे पाणी सोडले जाते. बर्‍याच जणांना हा नालाच दृष्टिपथात न आल्याने नाला वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे हा नाला नेहमीच कचर्‍याने (landfill) भरलेला असतो. या नाल्यावरच दशकापूर्वीपासून अतिक्रमण करून झोपड्या उभारल्या गेल्या. खरं तर नाल्यापासून सहा मीटर अंतरापर्यंत कोणी घरे बांधू नये, असा पालिकेने नियम केला असूनही, येथे बेकायदा घरे वा झोपड्या सर्रास उभ्या राहिलेल्या दिसतात. अशाच प्रकारे मुंबईत इतर नाल्यांचे मुंबईतील नाल्यांचे चित्र दिसत आहे.

मुंबईतील दुसरा एक कायमस्वरुपी तुंबणारा नाला म्हणजे अंधेरीचा मोगरा नाला. पाणी तुंबते म्हणून या नाल्याचे रुंदीकरण करण्याची योजना होती. परंतु, आता गोखले पुलाच्या कामामुळे ती योजना लांबणीवर पडली आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबण्याकरिता कुप्रसिद्ध अंधेरी सब-वे नजीकच्या नाल्यावर झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. पण, या अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करुन नाल्यावर अतिक्रमण हटविण्याची आज नितांत आवश्यकता आहे. अंधेरी सब-वे तुंबू नये म्हणून पालिकेने तेथे सहा मोठे उपसा पंपही आणून ठेवले. प्रत्येक पंप तासाला तीन हजार घनमीटर पाणी उपसून टाकू शकतो. असेच ४८० हून अधिक उपसा पंप मुंबईतील इतर पाणी तुंबण्याच्या ठिकाणी सज्ज ठेवले आहेत. मोगरा पम्पिंग स्टेशनचे काम ‘ब्रिम्स्टोवॅड’ प्रकल्पाच्या कामात समावेश असूनही, गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ भूखंड मिळत नाही म्हणून रखडले आहे. हे काम लवकरात लवकर मार्गी लागावे म्हणून एक सल्लागार नेमला आहे.

जी स्थिती मुंबईच्या पश्चिम उपनगरात, तशीच काहीशी स्थिती मुंबईच्या पूर्व उपनगरात. कुर्ला पूर्व व पश्चिम, टिळक नगर रेल्वे स्थानक, साकीनाका मेट्रो स्थानक, वडाळा इत्यादी अनेक भागांत पालिकेने काही कामे (उच्च क्षमतेचे उपसा पंप बसविणे) केल्यामुळे यावर्षी पाणी साचणार नाही, असा दावा पालिकेने केला होता. पण, तरीही यापैकी बहुतांश भागात पहिल्या पावसात पाणी साचल्याचे दिसून आले. दि. १५ जूनपर्यंत नालेसफाईशी संबंधित मुंबईतून पालिकेकडे १०२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८९ तक्रारींचे निवारण झाले आहे. मुंबईसाठी खास ‘वूमन पॉवर’ म्हणून १८ महिला अभियंत्यांचे पथक या पर्जन्य जलवाहिनीच्या कामाकरिता नेमले आहे. पावसाळ्यात भरतीच्या काळात उदंचन केंद्रावर सेवा बजावण्यापासून ते गाळ काढण्याच्या कामापर्यंत पोहोचून ही पथके ही कामे बजावत आहेत. हिंदमाता परिसर व इतर सखल भागाकरिता ते भाग जलमुक्त ठेवण्यासाठीसुद्धा ही महिला पथके प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कामाला सुयश मिळो, हीच मुंबईकरांची इच्छा.

माटुंगा ते शीवदरम्यान पाणी साचू नये म्हणून मुंबईकरांना मात्र पुढील वर्षाची वाट बघावी लागणार आहे. कारण, नियोजित मिनी पम्पिंग स्टेशनचे काम पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे. निम्म्याहून अधिक काळ जून महिना कोरडा गेल्यानंतर अखेर दि. २४ जूनपासून व १ जुलैपासून पावसाने जोरदार हजेरी लावली व मुंबई पालिकेचे नालेसफाईसंबंधी दावे पाण्यात गेले. कारण, मुंबई, नवी मुंबई, ठाणे भागात जोरदार पावसामुळे वाहतूक मंदावली. मुंबईत बर्‍याच ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले व पहिल्याच पावसात मुंबई तुंबली होती. अशा या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दैना उडवली व अनेक भाग जलमय झाले.

परंतु, सर्व नाले १०० टक्क्यांहून जास्त गाळमुक्त झाले असे पालिकेचे म्हणणे असले तरी, मिठी नदी अद्याप प्लास्टिकच्या गाळाने तुडूंब ओसंडून वाहते आहे, ही बाब मुंबईकरांच्या नजरेतून सुटलेली नाही. दुसरीकडे सागरी किनारा मार्ग प्रकल्पात १११ हेक्टर जमीन भराव घालून तयार केली जाणार आहे. २५ टक्के भागात रस्त्याचे बांधकाम, तर ७५ टक्के भागात म्हणजेच ७५ लाख, ३१ हजार, ५२५ चौ.फू. क्षेत्रात परिसराचा उपयोग हा लँडस्केपिंगसह विविध नागरी सुविधांसाठी वापरले जाणार आहे. सागरी किनारा मार्गावर १६ ठिकाणी पर्जन्य जलवाहिनींवर पूरप्रतिबंधक दरवाजे बसविले जाणार आहेत. पालिकेने ही पूर प्रतिबंधक कामे केली. पण, निसर्गाच्या कधी तरी रौद्ररुप धारण करणार्‍या समुद्रलाटांपुढे या कामांचा टिकाव लागणेही तितकेच आवश्यक. म्हणजे एकूणच काय, पालिकेकडून नालेसफाई व पाणी तुंबू नये म्हणून उपाययोजना केल्या जातात. परंतु, कोट्यवधींची कामे होऊनसुद्धा मुंबईची तुंबई होतेच आणि मुंबईकरांचा पावसाळ्यातील त्रास मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही.

पावसाळ्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना

मुंबईच्या समुद्रकिनारी अनेक दुर्घटना घडत असल्याने सुरक्षेसाठी देखील विविध उपाययोजना पालिकेकडून राबविण्यात येणार आहेत. समुद्रात पोहताना बुडून होणार्‍या मृत्यूच्या घटना टाळण्यासाठी गिरगाव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, आक्सा या समुद्र किनार्‍यांवर अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान, पोलीस पेट्रोलिंग वाहने, लष्कराच्या पाच तुकड्या तैनात ठेवल्या जाणार आहेत. त्यांच्याकडे बोटी, ओबीएम, लाईफ जॅकेट उपलब्ध राहणार आहेत. काही विशिष्ट पूरप्रवण क्षेत्रात नौदलाची पाच पूरबचाव पथके व पाणबुडी पथके कार्यरत असतील. तसेच रेल्वे सुरक्षा दलातील १४ प्रशिक्षित कर्मचार्‍यांची पूरबचाव पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. हेलिकॉप्टर मदतीसाठी तत्पर ठेवले जाणार आहेत. समुद्रात भरतीच्या काही विशिष्ट दिवशी ४.५ मीटरहून जास्त उंचीच्या मोठ्या लाटा उसळतात. त्यादिवशी तसेच शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी १५ जीवरक्षक तैनात ठेवले जाणार आहेत.

पालिकेकडून स्वतंत्र आपत्कालीन नियंत्रण कक्षदेखील सज्ज राहणार आहे. त्यांना आधुनिक ‘आयफ्लोज’ तंत्रज्ञानाच्या प्रणालीच्या साहाय्याने पुराची माहिती आधी ६ ते ७२ तास मिळू शकते. आपत्कालीन व्यवस्थापन विभाग व राष्ट्रीय समुद्रतट संशोधन केंद्र यांच्यामार्फत पुराची आगाऊ सूचना देणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. हवामान अंदाज व पर्जन्यवृष्टीचे निरीक्षण करून संभाव्य परिस्थितीची आगाऊ सूचना देता येणे शक्य होते. पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा, त्यासाठी पाणी उपसा पंप बसविणे, साठवण टाक्यांचा उपयोग इत्यादी कामांमुळेही पूरनियंत्रण शक्य आहे.

तेव्हा, सध्या मुंबई महानगरपालिका अस्ताव्यस्त पसरलेल्या मुंबईसारख्या शहराचे पूर नियंत्रणाचे आव्हानात्मक काम करीत आहे. परंतु, मुंबईची अफाट लोकसंख्या व काँक्रिटच्या अनेक इमल्यांपुढे पाणी निचरा करण्याचे कामही तितकेच आव्हानात्मक, ज्यापुढे मग पालिका अधिकारी व कमचारी हतबल झालेले दिसतात. म्हणूनच मुंबई महानगरपालिकेने दरवर्षी पूरनियंत्रणासाठी केवळ मलमपट्टीचे विचार न करता, कायमस्वरुपी उपाययोजना करुन ही समस्या मार्गी लावली तरच मुंबईची तुंबई होणार नाही.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.