मतपेट्या नाल्यात फेकल्या! मोठा हिंसाचार! राहुल गांधींना बंगालचं राजकारण मान्य आहे का?

    10-Jul-2023
Total Views |
smriti Irani question to Rahul Gandhi on Bengal panchayat violence
कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान हिंसाचाराच्या भीषण घटना घडल्या. मात्र, त्यानंतरही लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींसोबत युती करण्यास काँग्रेस उत्सुक असल्याचे दिसत आहे. याबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत मृत्यूचा खेळ का स्वीकारतात, असा सवाल केला आहे. त्याचवेळी हिंसक घटनांबाबत भाजपने निवडणूक आयोगाच्या कार्यालयासह राज्यातील अनेक ठिकाणी निदर्शने केली. मतपेटी छेडछाड आणि बूथ कॅप्चरिंगच्या आरोपांमध्ये मुर्शिदाबादमध्ये मतपेट्या नाल्यात पडलेल्या आढळल्या.
 
स्मृती इराणी म्हणाल्या, “पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीत लोकशाहीची हत्या सर्वजण पाहत आहेत. जिथे लोकशाही मूल्यांसाठी आणि हक्क सांगण्यासाठी लोकांची हत्या केली जात आहे. गांधी परिवार त्याच टीएमसीसोबत युती करत आहे. माझा गांधी घराण्याला एक विशेष प्रश्न आहे की जे पश्चिम बंगालमध्ये कहर करतात आणि फक्त मतदान करायचे म्हणून लोकांची हत्या करतात. काँग्रेस अशा लोकांशी हातमिळवणी करत आहे. प्रश्न पडतो की हा मृत्यूचा खेळ राहुल गांधींना का मान्य आहे?
 
मुर्शिदाबादमध्ये नाल्यात सापडल्या मतपेट्या

 
पंचायत निवडणुकीच्या मतदानादरम्यान बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या. याच मुर्शिदाबादमध्ये ३ मतपेट्या नाल्यात पडलेल्या आढळल्या. यावरून बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कमकुवत असल्याचा अंदाज लावता येतो. पंचायतीसारख्या छोट्या निवडणुकांमध्ये अशा घटना समोर येत असतील तर २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर हिंसक घटना घडू शकतात.


 
बंगालची परिस्थिती अशी झाली आहे की लोक घराबाहेर पडायला तयार नाहीत. मीडियाशी बोलताना मुर्शिदाबादमधील एका स्थानिक व्यक्तीने सांगितले की, “निवडणुकीनंतर येथील परिस्थिती चांगली नाही. भीतीमुळे सर्वसामान्य जनता बाहेर पडत नाही. लोक दहशतीत आहेत. जे बाहेर येतात त्यांना टीएमसी कार्यकर्ते धमकावतात.

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या दिवशी झालेल्या प्रचंड हिंसाचारामुळे बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दि. १० जुलै रोजी पुन्हा मतदान होत आहे. ५ जिल्ह्यांतील सुमारे ६९७ मतदान केंद्रावर मतदान होत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. यादरम्यान मतदान केंद्रावर सुरक्षेसाठी केंद्रीय फौजफाटाही तेथे तैनात करण्यात आला आहे.
 
पंचायत निवडणुकीत दि. १० जुलै रोजी मुर्शिदाबादमधील १७५ आणि मालदामधील ११२ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. त्याचप्रमाणे नादियातील ८९ बूथवर, उत्तर २४ परगणामधील ४६ बूथवर फेरमतदान घेण्यात येत आहे. याशिवाय दक्षिण २४ परगणामध्ये ३६, पूर्व मेदिनीपूरमध्ये ३१, हुगळीत २९, दक्षिण दिनाजपूरमध्ये १८, जलपाईगुडीमध्ये १४, बीरभूममध्ये १४, पश्चिम मेदिनीपूरमध्ये १०, बांकुरामध्ये ८, हावडामध्ये ८, पश्चिम वर्धमानमध्ये ६, पुरुलियामध्ये ६, पूर्व वर्धमानमध्ये ३ आणि अलीपुरद्वारमध्ये १ बूथवर पुन्हा मतदान होत आहे.

दरम्यान बंगालमध्ये ८ जुलै रोजी पंचायत निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रचंड हिंसाचार झाला होता. कुठे बॉम्ब फेकले गेले तर कुठे मतदान केंद्रे जाळण्यात आली. मतपेटी आणि मतपत्रिका फोडून लोक पळून गेल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत राज्यात निवडणूक आयोगाला मोठा विरोध झाला आणि त्यानंतर त्यांनी या सर्व बाबींची दखल घेतली.