मुंबई : उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु असताना सभा होण्यापूर्वी खासदार नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालण्यास सुरुवात झाली. शिवाय, ठाकरेंच्या सभा स्थळावर राणा यांचे कार्यकर्ते हनुमान चालीसा पठण करणार आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते दाखल झालेत. या सर्वांवरुन खासदार संजय राऊतांनी नवनीत राणांवर टीका केली आहे.
राऊत म्हणाले, "हनुमान चालीसाचं पठण त्यांनी राष्ट्रावादीच्या फुटलेल्या गटासमोर करावं. बॅनर फाडल्याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. अमरावतीत परत त्यांना निवडणुका लढायच्या आहेत. पण १०० टक्के सांगतो या बाई परत लोकसभेत जातील याची खात्री नाही, अजिबात जाणार नाहीत त्या लोकसभेत. कारण त्यांना बजरंगबली आणि हनुमानच धडा शिकवणार आहे. कर्नाटकात त्यांना चांगलाच धडा मिळाला आता महाराष्ट्रात त्यांना धडा मिळणार आहे,"
अजितदादांसह ९ जण बिनखात्याचे मंत्री अाहेत, असं सांगताना राऊत म्हणाले, "विद्यमान चार आमदारांना, मंत्र्यांना काढून नवीन मंत्री घ्यावेत अशी त्यांची भूमिका आहे. मुळात महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अजित पवार यांच्याबरोबर ८ मंत्र्यांनी शपथ घेतली असून अद्यापही खाते वाटप होऊ शकले नाही. खरंतर शपथ घेतल्यानंतर पुन्हा २४ तासात खातेवाटप करण्याची परंपरा आहे. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे असे टोलेजंग भाजपमध्ये घेऊन सुद्धा हे आठ आठ दिवस बिन खात्याचे मंत्री म्हणून खाते वाटपाशिवाय बसले आहेत. कोणत्या प्रकारचा गोंधळ आहे हे समजत आहे." असं राऊत म्हणाले.