मलेरिया आणि मूत्रपिंड विकारांबाबतची सावधानता

    10-Jul-2023
Total Views |
Precautions for malaria and kidney disorders

मलेरिया हा जगभरात सर्वाधिक आढळणार्‍या संक्रामक आजारांपैकी एक आहे आणि बहुतेक विकसनशील देशांच्या सार्वजनिक आरोग्यव्यवस्थांपुढील सर्वांत लक्षणीय आव्हानांपैकी हे एक आव्हान आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने (डब्ल्यूएचओ) अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट’मधील आकडेवारीनुसार, २०२० मधील २४५ दशलक्ष (२४ कोटी, ५० लाख) एवढी असलेली मलेरियाची रुग्णसंख्या, २०२१ मध्ये २४७ दशलक्ष (२४ कोटी, ७० लाख) झाली आहे.रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ केवळ त्रासदायक नव्हे, तर चिंताजनकही आहे. यापैकी काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळतात, तर काही रुग्णांचा मलेरियामुळे मृत्यूही होऊ शकतो. २०२१ मध्ये मलेरियामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा अंदाजे ६ लाख, १९ हजार होता, असेही याच अभ्यासातून समोर आले आहे.

मलेरियाच्या रुग्णाची अवस्था गंभीर झाल्यास, अनेक महत्त्वाच्या इंद्रियांच्या कार्यामध्ये बिघाड होऊ शकतो. रुग्णाला कोणत्याही प्रकारचा मलेरिया झाला, तरीही या आजारामुळे एकंदर शरीरात व फुप्फुसे, मूत्रपिंडे व मेंदू यांसारख्या इंद्रियांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. ‘अ‍ॅक्युट किडनी इंज्युरी’ (एकेआय) ही जटिलता मलेरियाच्या रुग्णांमध्ये निर्माण होण्याचे प्रमाण बरेच अधिक आहे. मलेरियाने तीव्र स्वरूप धारण केलेल्या रुग्णांपैकी सुमारे ४० टक्के रुग्णांमध्ये ही अवस्था निर्माण होऊ शकते. मलेरियामुळे झालेल्या ‘एकेआय’मध्ये मूत्रपिंडाचे नुकसान होते. त्यातून रोगप्रतिकारयंत्रणेची व्यवस्था बिघडते आणि त्यानंतर सूज येते. त्यामुळे रुग्णाला मोठ्या प्रमाणात शारीरिक व मानसिक त्रास होतो.

मलेरियाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ‘एकेआय’ ही जटिलता कशामुळे निर्माण होते? पहिला मुद्दा म्हणजे, मलेरियाची तीव्र स्वरूपाची लागण झालेल्या रुग्णामध्ये ‘अ‍ॅक्युट ट्युब्युलर नेक्रोसिस’ हा आजार होऊ शकतो. यामुळे ‘सीरम क्रिएटिनिन’चा स्तर वाढतो किंवा शरीरातून होणारे मूत्रविसर्जन कमी होते. यातूनच पुढे ‘एकेआय’ हा विकार होतो. तीव्र स्वरूपाचा मलेरिया झालेल्या प्रौढ रुग्णांमध्ये ‘एकेआय’होण्याचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत आहे. मात्र, तीव्र स्वरूपाचा मलेरिया झालेल्यांमध्ये हे प्रमाण सुमारे दहा टक्के असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे.\
 
सुरुवातीला लक्षणे सौम्य असतात. हिमोग्लोबिनचा स्तर खालावणे, श्वेतपेशींचे (डब्ल्यूबीसी) प्रमाण वाढणे, प्लेटलेट्स कमी होणे, ईएसआर वाढणे, एकूण व थेट बिलिरुबिन वाढणे, एएसटी, एएलपी वाढणे, सीरम सोडियम कमी होणे अशी लक्षणे सुरुवातीला जाणवतात आणि नंतर ती लक्षणे तीव्र होत जातात. रक्तक्षय (अ‍ॅनिमिया), अतिसार (डायरिया), कावीळ व मूत्रपिंडांच्या कार्यात गंभीर स्वरूपाचा बिघाड अशी लक्षणे नंतर जाणवू लागतात. दुसरा मुद्दा म्हणजे, अवस्थेची तीव्रता जशी व्यक्तीनुरूप वेगवेगळी असते, तशीच लक्षणेही वेगवेगळी असतात. तज्ज्ञांकडून वैद्यकीय मदत घेणे आणि चाचण्या करवून घेणे यांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यात व कमी करण्यात मदत होऊ शकते आणि व्यक्तीचे आरोग्य पूर्वपदावर आणले जाऊ शकते.

मलेरियाचे व त्याचा परिणाम मूत्रपिंडांवर होण्याचे वाढते प्रचलन बघता, अशा परिस्थितीत, तज्ज्ञ नेफ्रोलॉजिस्टना (मूत्रपिंड विकार तज्ज्ञ) दाखवणे ही सर्वांत महत्त्वपूर्ण पायरी आहे. कारण, ही परिस्थिती अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असते. मलेरियामुळे मूत्रपिंडांचे कार्य मंदावू शकते आणि त्यामुळे द्रवपदार्थ साचून राहतात किंवा शरीराला नको असलेले घटक बाहेर टाकले जात नाहीत किंवा ‘इलेक्ट्रोलाईट’ समस्या निर्माण होतात आणि रुग्णाला ‘हेमोडायलिसिस’ची गरज भासते. मूत्रपिंडांच्या विकाराने ग्रस्त असलेल्या तसेच मलेरिया झालेल्या व्यक्ती प्लीहा फुटण्याच्या (स्प्लीन रप्चर) जटिलतेलाही प्रवण होतात. त्यातून पुढे अ‍ॅनिमिया होऊ शकतो.

भारतात आरोग्य साक्षरतेमध्ये खूप मोठी तफावत आहे आणि ती भरून काढण्याची गरज आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, मलेरियामुळे होणार्‍या ‘एकेआय’बाबतही जागरूकता निर्माण झाली पाहिजे. मलेरिया हा सामान्य आजार असला, तरी त्यातून निर्माण झालेल्या जटिलता सामान्य नसतात. या जटिलता काही रुग्णांमध्ये प्राणघातक ठरू शकतात आणि म्हणूनच त्यांच्याकडे लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे. असुरक्षित लोकसंख्येमध्ये मलेरियाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यावर झाले व नियमित तपासण्या झाल्यास या जटिलता टाळल्या जाऊ शकतात. सध्याच्या वेगवान जगात जगत असताना, बारीकशा अनियमितता (असतील तर) तपासण्यासाठी व त्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी, नियमित तपासण्या करून आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. गंभीर आजारांकडे घेऊन जाणार्‍या जटिलता या तपासण्यांमधून लक्षात येऊ शकतात.

मूत्रपिंड विकारांमुळे समाजावर मोठा बोजा येतो आणि प्रौढ लोकसंख्येपैकी अंदाजे दहा टक्क्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा मूत्रपिंड विकार असावा, असा अंदाज आहे. दोन लाख जणांना दरवर्षी तीव्र स्वरूपाचे (अखेरच्या टप्प्यातील) मूत्रपिंड विकार होतात आणि दुर्दैवाने त्यातील ९० टक्क्यांहून अधिक जणांचा, डायलिसिस किंवा प्रत्यारोपण या स्वरूपांतील ‘रेनल रिप्लेसमेंट’ उपचार उपलब्ध नसल्यामुळे किंवा परवडण्याजोगे नसल्यामुळे दुर्दैवाने मृत्यू होतो. या धक्कादायक आकडेवारीमुळे आपण दररोज सामना करत असलेल्या मोठ्या समस्यांकडे लक्ष वेधले गेले पाहिजे आणि या समस्यांची परिणती मूत्रपिंड विकारांच्या जागतिक साथीत होण्यापूर्वी त्यावर उपाय केला गेला पाहिजे.
 
 डॉ. एम. एम. बहादूर
(लेखक नेफ्रोप्लस येथे कन्स्लटंट नेफ्रोलॉजिस्ट (मूत्रपिंड विकारतज्ज्ञ) आहेत.)