नवी दिल्ली : फ्रान्समध्ये लहान मुलांवर अज्ञातांकडून चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोर हा सीरियाचा निर्वासित असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना फ्रान्सच्या फ्रेंच आल्प्समधील अॅनेसी शहराची आहे. या हल्ल्यात ज्या मुलांना लक्ष्य करण्यात आले ते एका उद्यानात खेळत होते. दरम्यान मुलांवर उपचार सुरू आहेत. तसेच हल्लेखोराला ही अटक करण्यात आली आहे.
या हल्ल्यात एका प्रौढ व्यक्तीसह आठ जण जखमी झाले आहेत. यातील चार मुल गंभीर जखमी झाले आहेत. दि. ८ जून रोजी हा हल्ला करण्यात आला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ट्विट केले आहे की,या भ्याड हल्ल्याने आपला देश खूप दुखावला आहे.
दि. ८ जून रोजी सकाळी ९ च्या सुमारास चाकू घेऊन हल्लेखोर लहान मुले खेळत असलेल्या उद्यानात घुसला. या हल्ल्यात जखमी झालेली मुलं सुमारे तीन वर्षांची आहेत. ऍनेसी हे तलाव आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डरमानिन यांनी हल्लेखोराच्या अटकेला दुजोरा दिला आहे. मात्र त्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही. मिररने सूत्रांच्या हवाल्याने हल्लेखोराची ओळख अब्देल मसीह एच असल्याचे सांगण्यात येत आहे.
३२ वर्षीय हल्लेखोराकडे सीरियन ओळखपत्रे सापडली आहेत. BFMTV नुसार त्याला निर्वासित दर्जा होता. प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, सुरुवातीला त्यांना वाटले की हे लहान मुलांना घाबरवण्याचे नाटक आहे. मात्र मुलांच्या किंचाळण्याचा आवाज येऊ लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला, मात्र नंतर पोलिसांनी त्याला पकडले.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर अनेक दिवसांपासून तलावाच्या परिसरात भटकत होता. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर मुलांवर वार करण्यापूर्वी इंग्रजीत बोलत होता. एका महिलेने स्थानिक रेडिओ स्टेशनला सांगितले की, हल्लेखोराने उद्यानात प्रवेश करण्यासाठी कुंपणावरून उडी मारली आणि एका लहान मुलीवर आणि एका मुलावर वार केले.