पाकला उष्णतेचा तडाखा...

    07-Jun-2023   
Total Views |
Pakistan HeatWave Amnesty International

अंतर्गत संघर्षासह चहूबाजूंनी कोंडीत सापडलेला, आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानवर आता इराण आणि अफगाणिस्तानबरोबर चक्क वस्तूंची देवाणघेवाण करून व्यापार करायची परिस्थिती ओढवली. त्यातच भारताला धडा शिकविण्याच्या गावगप्पा मारणार्‍या पाकिस्तानचे होणारे हाल आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर उष्णतेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तसा इशाराच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात ‘अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल’ने दिला आहे.

सध्या उच्च तापमान आणि उष्णतेच्या लाटांनी पाकिस्तानी नागरिक हैराण झाले आहेत. परंतु, याहीपेक्षा भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. अतिउष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी पाकिस्तानी नागरिक सध्या तयार नाहीत. तसेच, त्यांची तशी मनस्थितीही नाही. उच्च तापमान आणि उष्णतेच्या लाटेसमोर पाकिस्तानी नागरिक असाहाय्य झाले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. दक्षिण आशियातील विशेषत: पाकिस्तानमधील नागरिकांना उच्च तापमानाचा मोठा फटका बसत आहे. उष्णतेच्या झळांचा सामना करता येईल, अशा कोणत्याही सुविधा वा साधने त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत.

पाकिस्तानमध्ये पूर्वीपेक्षा लोकांना आता उष्माघात, श्वास घेण्यास त्रास होणे आणि बेशुद्ध होण्याचा त्रास अधिक जाणवत असून, रुग्णालयांमध्ये अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. वातावरणीय बदलांमुळे अशा घटनांमध्ये वाढ होण्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्यावर्षी पाकिस्तानात कडक उष्मा होता. गेल्या वर्षी मे महिन्यात जैकबाबादमध्ये तर ५१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पाकिस्तानला केवळ उष्णतेचा नव्हे, तर वातावरणीय बदलांचाही मोठ फटका बसला आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे देशाचा तब्बल एक तृतीयांश भाग जलमय झाला होता. त्यावेळी लाखो पाकिस्तानी नागरिकांना स्थलांतर करावे लागले. त्याचप्रमाणे पशुधन आणि शेतजमीनालाही या महापुराचा मोठा फटका बसला होता. आधीच आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानला या विनाशकारी महापुराने आणखी संकटांच्या खाईत नेले. या महापुरामुळे पाकिस्तानच्या कृषी क्षेत्राचे तब्बल ३० अब्ज रुपयांचे नुकसान झाले. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, सप्टेंबर ते डिसेंबर २०२२ दरम्यान, ८.५ दशलक्षाहून अधिक लोकांना दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागला.

‘अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल’च्या अहवालानुसार, ज्या पाकिस्तानी नागरिकांचे उत्पन्न कमी आहे, त्यांना या उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे. कारण, दररोज काम केले तरच पोटात अन्नाचा कण जाईल. त्यामुळे उच्च तापमान आणि उष्णतेच्या झळा सहन करत या लोकांना भर उन्हातही काम करावे लागते. वातावरणीय बदलांपासून आपले संरक्षण करण्यासाठी हे लोकं तितकेसे सक्षम नाहीत. महत्त्वाचे म्हणजे, पाकिस्तानमधील चार कोटींहून अधिक लोकांपर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही. विजेपासून वंचित असल्याने या लोकांकडे उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एअर कंडिशनर किंवा साधे पंखेदेखील नाहीत. विशेष म्हणजे, ‘अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल’ने पाकिस्तान सरकारला शहरातील गरिबांना अतिउष्णतेपासून वाचविण्यासाठी एक कृती योजना तयार करण्याचे आवाहन केले आहे.

मानवाधिकार संघटनेनेही श्रीमंत देशांना कार्बन वायूंचे उत्सर्जन कमी करण्याची आणि पाकिस्तानला जलवायू परिवर्तनापासून वाचवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, हरितगृह वायू उत्सर्जनाच्या बाबतीत पाकिस्तान खूप मागे आहे. परंतु, हवामान बदलांचे तडाखे सहन करणार्‍या प्रभावी देशांच्या यादीत पाक अग्रेसर आहे. एकूणच काय तर पाक राजकीय आणि आर्थिक संकटात फसलेला तर आहेच, पण बदलत्या वातावरणामुळे भविष्यात त्याला उष्णतेचाही सामना करावा लागू शकतो. पाककडे आधुनिक सोडा, नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करता येईल, अशीही यंत्रणा नाहीत. त्यामुळे आधीच कंगाल, त्यात उष्णतेची मार सहन करणार्‍या पाकिस्तानची वाटचाल ही आगामी काळात अधिक धोकादायक होणार आहे, यात शंका नाही.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.