सिंगापूरमधील ‘ते’ सिक्रेट!

    06-Jun-2023   
Total Views |
Shangri-La Dialogue Singapore

शांग्रीला डायलॉग’ ही ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज’ या एका स्वतंत्र ‘थिंक टँक’द्वारे सिंगापूरमध्ये आयोजित ’ट्रॅक वन’ आंतर-सरकारी सुरक्षा परिषद आहे. ही परिषद दरवर्षी आयोजित केली जाते. या सुरक्षा परिषदेत सामान्यतः संरक्षणमंत्री, मंत्रालयांचे स्थायी प्रमुख आणि आशिया-पॅसिफिक देशांचे लष्करप्रमुख आदी मंडळी उपस्थित असतात. यावर्षी तीन दिवसांचा हा शांग्रीला संवाद दि. २ ते ४ जून या कालावधीत सिंगापूर येथे पार पडला. विशेषत: अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावाचे प्रमाण कमी करण्याच्या संदर्भातील संघर्षावर संवाद महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

’शांग्रीला डायलॉग’ या परिषदेमध्ये भाग घेणार्‍या देशांद्वारे संरक्षण मुत्सद्देगिरी वाढविण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. यावर्षी झालेल्या ’शांग्रीला डायलॉग’ परिषदेत ऑस्ट्रेलिया, भारत, अमेरिका, चीन, ब्रिटन, जपान, कॅनडा, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियासह ४० हून अधिक देश आणि या देशांतील ६०० हून अधिक अधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान या देशांच्या गुप्तचर प्रमुखांची गुप्त बैठकही झाली. यात भारत, अमेरिका आणि चीनचा यांचा समावेश असून जगातील सर्व शक्तिशाली देशांचे गुप्तचर प्रमुख सहभागी झाले होते. ‘शांग्रीला डायलॉग’नंतर लगेचच गुप्तचर विभागाच्या प्रमुखांची बैठक झाल्याचे एका वृत्तसंस्थेने सांगितले.

देशाच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येणे, ही सामान्यतः मोठी गोष्ट वाटत नसली तरी त्यांच्या बैठकीत नेमकं काय घडतं? त्यात कोणत्या गोष्टींवर विशेष चर्चा होतात? याबाबतची माहिती आश्चर्यचकित करणारी असते. गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या या बैठकीची बातमी यापूर्वी कधीच समोर आली नाही. गुप्तचर समुदायाच्या मोठ्या बैठका दुर्मीळ असतात आणि त्या जवळजवळ कधीच प्रसिद्ध केल्या जात नाहीत. मात्र, यंदा संपूर्ण जगाला या परिषदेबाबत ज्ञात जरी झाले असले, तरी बैठकीचा अजेंडा आणि बाबी अद्याप कोणालाच ठाऊक नाही. एक मात्र नक्की की, या बैठकीचा उद्देश परस्पर देशांमधील सखोल समज निर्माण करणे आणि बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात एकमेकांना प्रोत्साहन देणे हाच असावा, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. गुप्तचर संस्थांमधील वरिष्ठ अधिकार्‍यांसह सहभागींना ‘शांग्रीला डायलॉग’ परिषदेत सहभागी होताना त्यांच्या समकक्षांना भेटण्याची संधी मिळते. सिंगापूरचे संरक्षण मंत्रालय यापैकी काही द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय बैठकांची सोय करते. गुप्तचर बैठकीतील सहभागींनी अशा बैठका फायदेशीर ठरत असल्याचे म्हटले जाते.

सिंगापूर सरकारतर्फे अशा बैठकांचे आयोजन दरवर्षी केले जाते. या बैठकीची गुप्तता इतकी बाळगली जाते की, बैठकीची ठिकाणही गुप्त ठेवण्यात येते. अमेरिका आणि चीनमध्ये अनेक मुद्द्यांवरून प्रचंड तणाव असला तरी या दोन्ही देशांचे गुप्तचर प्रमुख बैठकीला उपस्थित होते. भारताची विदेशी गुप्तचर संस्था ’रिसर्च अ‍ॅण्ड एनालिसिस विंग’ म्हणजेच ’रॉ’चे प्रमुख सामंत गोएल हेसुद्धा याठिकाणी उपस्थित होते. याचबरोबर ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे गुप्तचर प्रमुखही येथे उपस्थित असल्याचे कळते. जपान, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियाला विशेष निमंत्रण देण्यात आले होते. रशिया मात्र यावेळी दिसून आला नाही. कारण, ‘शांग्रीला डायलॉग’ परिषदेत रशियाचे अधिकारी जरी उपस्थित असले तरी गुप्तचर प्रमुखांच्या बैठकीत रशियाचे प्रतिनिधित्व करणारा एकही अधिकारी त्यावेळी उपस्थित नव्हता.

बैठकीत सहभाग घेतलेल्या प्रत्येक देशाच्या गुप्तचर प्रमुखाने दुसर्‍या देशाच्या गुप्तचर प्रमुखांची स्वतंत्रपणे भेट घेत चर्चा केली. ‘शांग्रीला डायलॉग’साठी अधिकृत युएस प्रतिनिधींमध्ये हेन्स यांचा समावेश असून झालेल्या मुख्य सभेत ‘सायबर’ सुरक्षेच्या दृष्टीने झालेल्या चर्चेत देशांमधील सहकार्य किती आवश्यक असते, याबाबत सखोल विश्लेषण केले. बैठकीतील विषय अत्यंत गोपनीय असले तरी जगाला कोणत्याही मोठ्या धोक्यापासून वाचवण्यासाठी या बैठकीतून ‘सायबर’ सुरक्षेवर अधिक भर दिला जात असल्याचे म्हटले जाते. सिंगापूरमधील खुद्द अमेरिकन दूतावासाने या बैठकीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. यावरून ‘शांग्रीला डायलॉग’ परिषदेदरम्यान झालेली गुप्तचर बैठक किती संवेदनशील असेल, याचा अंदाज नक्कीच घेता येऊ शकतो.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक