पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीला विरोध हे या १९ पक्षांचे समान धोरण आहे. व्यक्ती विरोध असायला काही हरकत नाही, संसदीय लोकशाहीच्या मूल्यांत ही गोष्ट बसते. परंतु, जी संसद देशाची सार्वभौम संस्था आहे, त्या संस्थेच्या उद्घाटनाला विरोध कशाला?
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दि. २८ मे रोजी अत्यंत गंभीर, भावपूर्ण आणि भारतीय संस्कृतीचे अनुपम दर्शन घडविणार्या वातावरणात झाला. अशा या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केंद्र सरकारने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाच्यायशस्वीतेसाठी अगोदरपासूनच खूप प्रयत्न केले. या सर्वांचे खूप खूप अभिनंदन!
लोकशाहीत ‘संसद’ ही देशाची सार्वभौम संस्था असते. लोकशाहीत सार्वभौमत्व लोकांकडे असते. लोक आपले प्रतिनिधी संसदेत निवडून देतात, हे प्रतिनिधी जनतेच्या सार्वभौमत्वाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा कालखंड अमर्याद नसतो. दर पाच वर्षांनी त्यांना निवडून यावे लागते. ‘संसद’ ही सार्वभौम संस्था असल्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीने ती केवळ सर्वोच्च संस्था नसून पवित्र संस्था आहे, अशा या पवित्र कार्यक्रमात दि. २८ मे रोजी सर्व देश सहभागी झाला होता. सार्वभौम जनतेने आपल्या घरातील दूरचित्रवाणी सेटजवळ बसून सर्व कार्यक्रम पाहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणही ऐकले. या नव्या वास्तूबद्दल सार्वभौम जनतेला परमादर आहे.
दुर्दैवाने या देशातील १९ विरोधीपक्ष या कार्यक्रमापासूनदूर राहिले. त्यांनी बहिष्कार घातला. काँग्रेसने बहिष्कार घातला आणि काँग्रेस बरोबर घरोबा असणार्या अन्य पक्षांनीदेखील बहिष्कार घातला. उद्धव ठाकरे सेनेनेदेखील बहिष्कार घातला. कारण ती काँग्रेस बरोबर गेलेली आहे.
हा बहिष्कार टाकून विरोधी पक्षांनी काय मिळविले? हा एक लाखमोलाचा प्रश्न आहे. त्यांनी काय मिळविले याचा विचार नंतर करता येईल, काय गमावले, याचा विचार अगोदर करू. या विरोधी पक्षांनी जनतेची सहानुभूती गमावली. नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीला विरोध हे या १९ पक्षांचे समान धोरण आहे. व्यक्ती विरोध असायला काही हरकत नाही, संसदीय लोकशाहीच्या मूल्यांत ही गोष्ट बसते. परंतु, जी संसद देशाची सार्वभौम संस्था आहे, त्या संस्थेच्या उद्घाटनाला विरोध कशाला?
विरोधाचे जे कारण त्यांनी शोधले ते बुद्धीला न पटणारे कारण आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन व्हायला पाहिजे होते, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. असा कोणताही संसदीय संकेत नाही. राज्यघटनेचे ‘कलम ७९’ हे सांगते की, ‘संघराज्याकरिता एक संसद असेल आणि राष्ट्रपती व अनुक्रमे राज्यसभा व लोकसभा म्हणून ओळखली जाणारी अशी दोन सभागृहे मिळून ती बनलेली असेल. संसदेचे अधिवेशन बोलविण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा असतो. संसदेपुढे राष्ट्रपतींचे अभिभाषण होते, या सर्व घटनात्मक तरतुदी आहेत.’ आपली घटना असे अजिबात सांगत नाही की, अमूकअमूक शासकीय इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्तेच झाले पाहिजे. तो ठरविण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाचा आहे. म्हणजे मंत्रिमंडळाचा आहे.
राष्ट्रपतींना ‘पद्म’ पुरस्कार देण्याचा मान आहे. सर्व ‘पद्म’ पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात. त्यावेळी राष्ट्रपती उच्चासनावर बसलेले असतात आणि समोरच्या खुर्चीत पंतप्रधान बसलेले असतात. ‘पद्मश्री’ पुरस्कार स्वीकारताना याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. हे पुरस्कार पंतप्रधानांच्या हातून दिले जात नाहीत. या आपल्या मोदी विरोधाच्या वादात विरोधकांनी देशाचे सर्वोच्चपद म्हणजे राष्ट्रपतीपद यालादेखील खेचले. ही त्यांची कृती त्यांच्या अपरिपक्वतेचे निदर्शक आहे. राष्ट्रपतीपद हे सर्वोच्च सांविधानिकपद आहे त्याची गरिमा राखली पाहिजे. पक्षीय राजकारणात या पदाला खेचू नये. ही गोष्ट खरी आहे की, राष्ट्रपतीपदावर तिच व्यक्ती बसते जी सत्ताधारी पक्षाला मान्य असेल. परंतु, एकदा राष्ट्रपतीपदाचा कार्यभार घेतल्यानंतर त्या व्यक्तीला पक्षातीत भूमिका घ्याव्या लागतात. ही परंपरा एखाद दुसरा राष्ट्रपती वगळल्यास सर्वांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. राजकीय पक्षांनी गोंधळ घालणारे वाटेल ते राजकारण करावे, पण त्यात राष्ट्रपतींना खेचण्याचे कारण काय?
संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी देशाच्या ७५ वर्षांच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदूधर्माचार्य, जैन, शीख, बौद्ध धर्मप्रमुख आणि अन्य सर्व धर्माचे प्रमुख सन्मानाने उपस्थित केले गेले. पंतप्रधान मोदी यांचे त्यांच्यासोबतचे फोटो सर्वत्र झळकले. धर्मदंड किंवा राजदंड संसदेत स्थापित करण्यात आला. आपल्या देशाची परंपरा अशी आहे की, राजाचा राज्याभिषेक होत असताना तो म्हणे की, मी कोणाकडूनही शासित नाही. तेव्हा राजगुरू त्याच्या डोक्यावर धर्मदंड ठेवून म्हणत असे की, तू धर्माने शासित आहे. धर्माने शासित आहे, म्हणजे उपासना धर्म नव्हे, कुराण, बायबल, मनुस्मृतीने शासित नव्हे, तर राजधर्म म्हणून एक धर्म आहे, जो सत्य, न्याय, नीती आणि प्रजापालनावर अवलंबून आहे. आपल्या संविधानाने हा धर्म सांगितलेला आहे.
हा धर्म सांगण्याचे काम आपल्या देशात उपनिषदांनी केले आहे, गीतेने केले आहे, धम्मपदांनी केलेले आहे, गुरूवाणीने केलेले आहे आणि तामिळ संत तिरुवल्लुवर यांच्या कुरलने केलेले आहे. हा धर्मदंड आमच्या सनातन राष्ट्रजीवनाचे प्रतीक आहे. पंडित नेहरू पंतप्रधान झाल्यानंतरच या देशाचा जन्म झाला, अशी मानणारी एक जमात आहे, त्यांच्या डोक्यात हे विचार शिरणे कठीण आहे. विकृत विचारांच्या ढेकणांनी आणि झुरळांनी ज्यांच्या मेंदूत वस्ती केली आहे, ते भारताचा सनातन धर्म समजू शकत नाहीत आणि आपणही त्यांना समजविण्याच्या भानगडीत न पडलेले बरे! सर्वग्रही काळच त्यांना त्यांची योग्य जागा दाखविल.
१९ विरोधी पक्ष २०२४ची निवडणूक लढविणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या संसदेच्या सभागृहात निवडून आलेले जाणार आहेत. या १९ पक्षांपैकी किती पक्षांना जनता जीवदान देईल हे २०२४ साली आपल्याला समजेल, पण आपण असे मानूया की, हे १९ पक्षांचे प्रतिनिधी जातील, तेव्हा ते काय करतील? ते असे म्हणणार आहेत का, मोदींनी उद्घाटन केलेल्या संसदेत आम्ही बसणार नाही, आम्ही आमचे अधिवेशन शाहीन बागमध्ये भरवू. यापैकी ते काहीही करू शकणार नाहीत, हे जरी खरे असले तरी, उद्घाटनावर बहिष्कार टाकून आपण आपली स्थिती कशी हास्यास्पद करून घेतली आहे, याचे भान त्यांना येणे आवश्यक आहे.
शेवटी, विरोध करा, मोदींचा विरोध करा. मोदींचा विरोध हेच तुमचे राजकीयदृष्ट्या जगण्याचे आणि अस्तित्व टिकविण्याचे टॉनिक आहे. परंतु, औषधशास्त्र असे सांगते की, टॉनिक तेव्हाच लाभदायक होते, जेव्हा ते प्रमाणात घेतले जाते, त्याचा अतिरेक झाला की, त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात, एवढी गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा म्हणजे पुरे!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.