सत्याचा आवाज मोठा करावा लागेल!

    29-Jun-2023   
Total Views |
PM Narendra Modi Leadership Growth India

मोदी यांच्यामुळे एक हजार वर्षे राजकीय झोप काढणारा भारत आता कुठे जागा व्हायला लागला आहे. तो आपली मूळे शोधायला लागलेला आहे. आपले दर्शन तो इतिहासात पाहू लागलेला आहे. त्याला पुन्हा मुघल काळात किंवा इंग्रज काळात जाऊन चालणार नाही. यासाठी या धर्मयुद्धात आपल्या प्रत्येकाला सक्रिय व्हावेच लागेल आणि कर्तव्यधर्माचे पालन करावे लागेल.

आणीबाणीच्या वर्धापनदिनाच्या आसपास पाटणा येथे कोणी म्हणतात १५, कोणी म्हणतात १६, कोणी म्हणतात १७ पक्षनेत्यांची बैठक झाली. बैठकीचा विषय होता २०२४ची निवडणूक. प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक लढवायची असते. मग त्यासाठी पाटणा येथे बैठक घेण्याचे कारण काय? त्याचे कारण एकच होते, २०२४च्या निवडणुकीत सर्वांनी मिळून मोदी यांचा पराभव करायचा आहे. पराभव करण्यासाठी सर्वांनी काय काय करायला पाहिजे, याचा विचारविनिमय करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आणीबाणी वर्धापन दिनाच्या पूर्वसंस्थेला ही बैठक बोलावली होती.
 
लोकशाहीचा गळा घोटणार्‍या आणीबाणीची घोषणा दि. २५ जून १९७५ साली झाली. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. त्यांचे नातू राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे आज सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून आणीबाणीविरूद्ध लढणारे नितीशकुमार, लालू प्रसाद एकत्र बसले होते. आणि सर्वांनी एक राग आळवला. देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे, नरेंद्र मोदी आणि भाजप तिला जबाबदार आहे. रा. स्व. संघाचे नाव अन्य कोणी घेतले नाही; पण राहुल गांधी यांनी घेतले. राजकारण म्हणजे विसंगतीचा महासागर असतो. त्याचे दर्शन पाटण्यामध्ये देशाला घडले.

आपल्या देशात एक परिवार, एक पक्ष असे काही राजकीय पक्ष आहेत. अब्दुलांची नॅशनल कॉन्फरन्स, पवरांची राष्ट्रवादी, लालूंचे राष्ट्रीय जनता दल, अखिलेश यादव यांची समाजवादी पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष असे सगळे पक्ष घराणेशाहीवर चालणारे पक्ष आहेत. लोकशाहीला सर्वाधिक धोका आणि भयानक धोका घराणेशाहींपासून असतो. या घराणेशाहीच्या जाचातून मुक्त होण्यासाठी १७७६ साली अमेरिकन राज्यक्रांती झाली. त्यांनी लोकशाही राज्यपद्धतीची जगातील पहिली लिखित घटना निर्माण केली आणि प्रत्येक अध्यक्षाने एका संकेताचे काटेकोर पालन केले की, आपला राष्ट्राध्यक्ष घराणेशाहीतून निर्माण होणार नाही. अमेरिकेत फक्त दोनदा राष्ट्राध्यक्ष होता येते आणि तिसर्‍यांदा घरी बसावं लागतं.

घराणेशाही पक्षाने आपल्या देशात, तर वारशांची रांग लावली आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इकडे महाराष्ट्रात बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य. चौथा अजून जन्माला यायचा आहे, अशी प्रत्येक घराणेशाही पक्षाची स्थिती. लोकशाही म्हणजे, लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य. घराणेशाहीत लोकांना सभेला यायची अनुमती असते, मोर्चात सहभागी होण्याची अनुमती असते, तोडफोड करायला अनुमती असते. मात्र, सर्वोच्च पदावर जाण्याचे सर्व रस्ते बंद असतात. अशी मंडळी जेव्हा म्हणतात की, नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे, तेव्हा या वाचाळांना गचाळ कसे करून टाकावे, याचा विचार आपण कधी करणार? हा प्रश्न मनात निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.

पाटण्यातील बैठक नरेेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान होऊ नयेत, हे ठरविण्यासाठी झाली. आतापुढील महिन्यात कृष्णजन्माष्टमी येईल. कृष्णाचा जन्म होऊ नये, म्हणून कंसाने देवकीची सातही मुले मारली, आठव्याला त्याला काही मारता आले नाही. तो गोकुळात यशोदेचा कान्हा बनून राहिला. त्याला तिथे नाहिसा करण्यासाठी कंसाने जंग जंग पछाडले; पण शेवटी हा कन्हैयाच कंसाच्या उरावर बसला. पाटण्यात असे १६-१७ कंस एकत्र झाले आणि त्यांनी योजना केली की, नरेंद्रला पंतप्रधानपदावरून खाली खेचण्याची; पण भारताचा एक सनातन नियम आहे, देशात कधी अधर्माचा जय होत नाही. अधर्मी कितीही संघटित झाले, तरीही शेवटी विजय धर्माचाच होतो. कारण, धर्म सत्य सांगतो, धर्म नीती सांगतो, धर्म न्याय देतो.

नरेंद्र मोदी यांनी गेली नऊ वर्षे देशामध्ये धर्म-न्याय-नीतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. रोजचे १८ तास काम, ३६५ दिवस काम, देशाला जगद्गुरू कसा करता येईल, याचा ध्यास. वैश्विक स्तरावर भारताची वाढलेली शान, देशांतर्गत रस्ते, रेल्वे, उद्योग, व्यापार, शेतकरी, महिला, मागासवर्गीय अनुसूचित जाती यासर्वांच्या विकासाची अहर्निश चिंता, या सर्वाचे नाव नरेंद्र मोदी असे आहे. द्वापारयुगात एकच कंस होता आणि कलियुगात १७ कंस एकत्र झाले आहेत.

राहुल गांधी आणि त्यांचे वैचारिक बंधू ओमर अब्दुल्ला म्हणाले की, “ही वैचारिक लढाई आहे.” खरोखरच ही वैचारिक लढाई आहे. एका बाजूला देशाच्या संविधानाचा आत्मा खुंटीला टांगून ठेवणारी विचारधारा आहे आणि दुसर्‍या बाजूला संविधानाच्या आत्म्याचं देशांतर्गत आणि वैश्विक प्रगटीकरण करणारी विचारधारा आहे. या १७ जणांनी एक सूर आळवला की, संविधान वाचविले पाहिजे, त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की, संविधान वाचविण्यापूर्वी ते वाचले पाहिजे. या वाचाळ नेत्यांपैकी किती जणांनी संविधान वाचले असेल? त्याचा तत्त्वविचार, मूल्यविचार, ध्येय विचार, राज्याचे राष्ट्र बनविण्याचा आखून दिलेला मार्ग किती जणांना समजला असेल? हे सांगणे फार अवघड आहे. असं म्हणतात की, कोणाच्या ज्ञानावर शंका घेऊ नये; पण शंका घ्यावी, अशी मते जर तुम्ही व्यक्त करू लागला, तर शंकेला पर्याय नाही. संविधान एकात्म आणि एकरस भारताची घोषणा करतं. तुकड्या तुकड्यात विभागलेला भारत संविधान स्वीकारीत नाही. संविधान सांगतं की, आपआपले उपासना, पंथ आपल्या जवळ ठेवा आणि संविधानाच्या कायद्याचे पालन करा. सर्व देशासाठी एकच कायदा असला पाहिजे, हा संविधानाचा आदेश आहे. संविधान सांगतं की, जातीचे राजकारण करू नका. पगडी-पागोटे, मागास-दलित किंवा जातींची आद्याक्षरे घेऊन अजगर, मजगर, माधव असली शब्दावली करू नका, फक्त नरेंद्र मोदी ती करीत नाहीत. म्हणून जातवादी, उच्छेदवादी एकत्र आले आहेत.

त्यांच्या शक्तीला कमी लेखू नका. पाटणा बैठकीवर अमित शाह, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस इत्यादी ज्येष्ठ भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यांच्या विरोधातील ही बैठक असल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत तिखट असणे, अगदी स्वाभाविक आहेत. राजकारण हा साधू-संतांचा खेळ नसतो. राजकारणात कोणी वीट मारली, तर त्याला दगडाने उत्तर द्यावे लागते. या सर्वांच्या प्रतिक्रिया त्यांच्या त्यांच्या स्थानाच्या दृष्टीने योग्य आहेत; पण या प्रतिक्रियांतून बूथस्थरापर्यंतच्या कार्यकर्त्यांपर्यंत गाफिलपणा निर्माण होऊन चालणार नाही. संघर्षाच्या काळात जो शिथिल झाला, तो संपला. म्हणून कोणत्याही प्रकारची आत्मसंतुष्टता, शिथिलता ही संकटे निर्माण करणारी ठरेल.

विरोधकांच्या शक्तीला कमी लेखू नका. अनेक कथा हे सांगतात की, शत्रू जरी लहान असेल, तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरते. दृष्टांतातून आपल्या पूर्वजांनी हे सांगितले की, आगीची एक ठिणगी वेळीच विझवली नाही, तर अग्निप्रलय करू शकते. रोग जेव्हा प्राथमिक अवस्थेत असेल, तेव्हाच त्याच्यावर इलाज केला पाहिजे. नंतर जर तो पसरला, तर त्याला रोखणे कठीण जाते. खोटे विषय पसरविण्याची विरोधकांची शक्ती फार मोठी आहे. इसाप एक गोष्ट सांगतो. वाळवंटातून एक प्रवासी चालला होता. त्याला एक स्त्री भेटते. ती अतिशय ग्लान झालेली असते. तो तिला विचारतो, “तू कोण आहेस?” ती म्हणते, “माझे नाव सत्य आहे. प्रवासी विचारतो, शहर सोडून तू वाळवंटात एकटीस राहिला का आलीस? ती म्हणते, पूर्वीच्या काळी असत्य काही-काही लोकांकडेच असे; पण आता सर्वच माणसं असत्याची पाठराखण करीत आहेत. मला निवासाला शहरात जागा नाही.

मोदी शासन सत्तेवर आल्यापासून गेल्या नऊ वर्षांत किती खोटी कारणे यांनी रचली आणि ती चालविली हे वाचकांच्या स्मरणात नक्कीच असेल. सर्वसामान्य माणसाला एकच खोटी गोष्ट २५ वेळा सांगितली, तर त्यावर विश्वास ठेवायला लागतो. असत्याचा आवाज नेहमीच फार मोठा असतो. सत्याचा आवाज मोठा करावा लागतो.

ही लढाई ‘नरेंद्र मोदी विरूद्ध १७ नेते’ अशी आहे. परंतु, ही लढाई व्यक्तिगत नाही. मोदी ही व्यक्ती नाही, मोदी हा विचार आहे. नितीशकुमार, लालू प्रसाद, ममता बॅनर्जी, केजरीवाल, शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे या व्यक्ती नाहीत, हे विचार आहेत. आपापसात ते एकमेकांशी टक्कर देणारे असले, तरी अधर्माच्या युद्धात ते संघटित होणारच. मोदी यांच्यामुळे एक हजार वर्षे राजकीय झोप काढणारा भारत आता कुठे जागा व्हायला लागला आहे. तो आपली मूळे शोधायला लागलेला आहे. आपले दर्शन तो इतिहासात पाहू लागलेला आहे. त्याला पुन्हा मुघल काळात किंवा इंग्रज काळात जाऊन चालणार नाही. यासाठी या धर्मयुद्धात आपल्या प्रत्येकाला सक्रिय व्हावेच लागेल आणि कर्तव्यधर्माचे पालन करावे लागेल. मोदी लोकप्रिय आहेत, म्हणून विजय मिळेल हे पूर्णसत्य नाही. पूर्णसत्य मोदींसोबत आपण किती पावले चालणार आहोत, हे आहे.

९८६९२०६१०१

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.