वयवारीची वहिवाट...

    29-Jun-2023   
Total Views |
International norms of measuring age In South Korea

जसं नावात काय आहे म्हणतात, अगदी तसंच वय हा तर केवळ एक आकडा आहे, असंही वयोमानापरत्वे उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांच्या बाबतीत कौतुकाने म्हंटलं जातं. पण, क्षणभर विचार करा की, व्यक्ती एकच, पण त्याची दोन वयं. म्हणजे आजही असे बरेच लोकं देशविदेशात आढळतात की, त्यांना त्यांची जन्मतारीखच ठाऊक नसते. मग अशावेळी सरसकट नवीन वर्षातील पहिला दिवस हाच काय तो आपला जन्मदिन मानण्याची प्रथा ही जगभरात दिसते.

परंतु, जन्म दिनांक, जन्म वर्ष असं सगळं-सगळं माहिती असूनही पारंपरिक पद्धतीने वयाचे मोजमाप करण्याची एक अजब प्रथा काही देशांमध्ये कायम होती. द. कोरिया हा त्यापैकीच एक देश. पण, नुकताच पारंपरिक वय मोजण्याऐवजी आंतरराष्ट्रीय नियमांनुसारच वय निर्धारित करण्याविषयीचा कायदा द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल यांनी मंजूर केला. त्यामुळे द. कोरियन नागरिकांचे वयोमान हे आता चक्क एक किंवा दोन वर्षांनी कमी होणार आहे, हे विशेष!

द. कोरिया हा सर्वार्थाने आधुनिक देश असला, तरी तितकाच संस्कृतीप्रिय. इतका की, एका पद्धतीनुसार बाळ आईच्या पोटात असल्यापासूनच त्याच्या वयाची गणती सुरू होते. म्हणजेच जेव्हा बाळ जन्माला येते, तेव्हा ते एक वर्षांचे आहे, असे मानण्याची ही प्रथा. त्यामुळे आपसुकच कोरियन व्यक्तीचे वय एका वर्षाने वाढते. अशीच आणखीन एक कोरियन पद्धत म्हणजे दि. १ जानेवारीला जन्मतारीख कुठलीही असली, तरी वयात एका वर्षाची भर पडते. म्हणजे बघा, एखाद्या बाळाचा जन्म जर ३१ डिसेंबर रोजी झाला, तर ते बाळ आधीच एक वर्षाचे मानले जाईल. तसेच, वरील नियमानुसार १ जानेवारी रोजी अधिक एक वर्षाची भर पडल्यामुळे ते बाळ लगेच जन्मल्यानंतर दुसर्‍याच दिवशी दोन वर्षांचे होईल. म्हणजेच काय तर हाडामासाने व्यक्ती एकच असली, तरी त्याचे वय मात्र भिन्न. यामुळे शाळेतील दाखल्यापासून ते वाहन परवाना ते अगदी लग्नाचे वय, अशा सर्वच बाबतीत ही कोरियन वयवारी अडचणीची ठरत होती.

यामुळे नाहक गोंधळ आणि वादविवाद हे द. कोरियामध्ये नित्याचेच. विमा कंपन्या, विम्याचे दावे वगैरे संमत करतानाही वयाचे आकडे ही सर्वस्वी डोकेदुखी. तसेच, एखाद्या कोरियन व्यक्तीला विशेषकरून परदेशात नोकरीसाठी वा अन्य कारणांसाठी वास्तव्य करायचे असल्यास, या सगळ्या प्रकारांमुळे कित्येक अडचणींना तोंड द्यावे लागायचे. म्हणूनच गेल्या कित्येक दशकांपासून ही कोरियन वयमापन पद्धती बदलण्याची मागणी सातत्याने केली जात होती. एका सर्वेक्षणानुसार, चार पैकी तीन कोरियन नागरिक ही पद्धती बदलावी, याच मताचे. ही बाब लक्षात घेता, अखेरीस द. कोरियाने यासंबंधी कायदा मंजूर केला आणि आता तो तिथे लागूही झाला आहे. त्यामुळे साहजिकच द. कोरियन नागरिकांची दोन वयांच्या आकडेमोडीच्या या कटकटीतून सुटका होईल, हे निश्चित. परंतु, तरीही तेथील वधू-वर सूचक मंडळांनी मात्र लगेचच ही पद्धत स्वीकारणार नसल्याचे म्हंटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लगेचच जन्मतारखेवर आधारित वयमापनाची पद्धत स्वीकारली, तर गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणूनच पुढील वर्षीपासून द. कोरियातील पर्यटन कंपन्या आणि वधू-वर सूचक मंडळं या पद्धतीचा अवलंब करतील, असे दिसते.

आता याप्रकारे वयाला विविध संस्कृती-परंपरांच्या मोजपट्टीवर मोजण्याचे निकष आग्नेय आशियातील देशांमध्ये रूढ होते. परंतु, बहुतांशी देशांनी त्या पद्धतींना फाटा देत जागतिक पद्धत स्वीकारली. जपाननेसुद्धा त्यांची परंपरागत वयमापन पद्धती १९५० साली रद्दबातल ठरविली, तर उ. कोरियाने १९८० साली यासंदर्भातील वैश्विक नियम अंगीकारले. परंतु तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, फॅशन याबाबतीत अगदी अग्रेसर असलेल्या द. कोरियाला हे बदल करायला मात्र २०२३ हे साल उजाडावे लागले, असो. म्हणतात ना, देर आए दुरुस्त आए, हेच खरे!

मथितार्थ हाच की, आपापल्या देशातील संस्कृती, परंपरा, वारसा यांचा अभिमान हा बाळगायलाच हवा. त्यांचे संरक्षण आणि संवर्धनही मग ओघाने आलेच. परंतु, कुठे तरी हा पुरातन आणि आधुनिक यांचा ताळमेळ, संतुलनही तितकेच आवश्यक. म्हणूनच द. कोरियाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करुया आणि कधी नव्हे, ते वाढत्या वयाला (आकडा हा असेना!) असे कमी करण्याची ही अनोखी किमया साधणारी वयवारीची ही वहिवाट कोरियन नागरिकांसाठी नवीन पहाट ठरो, याच शुभेच्छा!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची