पुणे : भोळ्याभाबड्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून सोंग घेणार्यांपासून वेळीच सावध राहावे, भोवतालच्या गोष्टींबाबत जागरूक राहून, कुटुंबव्यवस्था मजूबत करावी, असा सूर भारतीय संस्कृतीमधील संयुक्त कुटुंबपद्धती अर्थात अमृत परिवाराच्यावतीने आयोजित चर्चासत्रात रविवार, दि. २५जून रोजी उमटला.
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे औचित्य साधून विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, पुणे यांच्यावतीने समर्थ रामदासांच्या विचारांचे प्रसारक, लेखक सुनील चिंचोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारातील कुंदनमल फिरोदिया सभागृहात झालेल्या या सत्रामध्ये शैक्षणिक सल्लागार प्रा. शिरीष आपटे, प्रेम नव्हे, तर एक रचलेले षड्यंत्रच दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी, विवेकानंद केंद्र प्रांताच्या अमृत परिवाराचे प्रमुख श्रीराम जोशी यांनी सहभाग घेतला. अॅड. अंजली भाडळे यांनी संचालन केले. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे पुणे नगर संचालक जयंत कुलकर्णी, किरण कीर्तने, वसुधा करंदीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांच्या प्रश्नांचे निरसण करण्यात आले.
शिरीष आपटे म्हणाले, “सर्व आंतरधर्मीय विवाहात फसवणूक नसते. मात्र, ‘लव्ह जिहाद’मध्ये स्वतःच्या धर्माला लपवले जाते, ओळख लपवली जाते. पैशाचे आमिष दाखवून ‘लव्ह जिहाद’कडे नेले जाते. पाच ते सहा मुलींमध्ये एक तरी फातिमा असते. ती ओळखने गरजेचे,” असल्याचे सांगून या विळख्यातून कसे बाहेर पडावे याचे उपाय आणि काही मुद्दे त्यांनी उलगडले. तसेच, पालकांनाही जागृत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
तर श्रीराम जोशी यांनी, “आदर्श कुटुंब कसे असावे, कुटुंबासाठी पालकांना काय कारायला हवे, हे सोप्या भाषेत सांगितले. घरात स्नेह, संरक्षण, स्वातंत्र्य, सन्मान, सेवापूर्वी मिळत होते. ते पूर्ववत केले पाहिजे. मुलांशी संवाद ठेवला पाहिजे. भवितव्याबाबत त्यांना आश्वस्त केले पाहिजे. संस्कृती, श्रद्धेशी त्यांना जोडून ठेवले पाहिजे. सर्वार्थाने समृद्ध होत राहिले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
प्रेम नसून पूर्वनियोजित कट
“सध्या प्रेमाच्या नावाखाली मुलींना, महिलांना जाळ्यात ओढून वाम मार्गाला लावणे, फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहेत. ते प्रेम नसून पूर्वनियोजित कटकारस्थान आहे. या जाळ्यात मुली फसू नयेत, याची काळजी घेतली पाहिजे. पालकांनी जबाबदारी ओळखली पाहिजे. कायदेशीर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत,” असे सांगून ‘लव्ह जिहाद’च्या घटना आणि त्या पीडित मुलींवर होणारे जुलूम याची काही उदाहरणे उपसंपादिका योगिता साळवी यांनी उपस्थिताना दिली.