संत-महापुरुषांच्या ५००हून मूर्ती घडविणारे, वाहतूकबेटांना शिल्पांनी सुशोभीत करणारे, वास्तववादी अन् संकल्पना शिल्पकलेला वेगळी उंची देणारे आधुनिक शिल्पकार यतिन पंडित यांचा कलाप्रवास.
यतिन श्रीकांत पंडित मूळचे जळगावचे. त्यांचे वडील बँकेत नोकरीला, तर आई शिक्षिका. वडिलांच्या नोकरी आणि व्यवसायानिमित्त ते नाशिककर झाले. कलेचा वारसा नसलेल्या, परंतु विलक्षण आध्यात्मिक वातावरण असलेल्या घराण्यात यतिन पंडित हे पहिलेच शिल्पकार. यतिन यांचे आध्यात्मिक गुरू भक्तराज महाराज यांनी त्यांना ’‘तू कला क्षेत्रातच कारकिर्द घडव, त्यातच तुझे उज्ज्वल भवितव्य आहे,” असे आशीर्वचन दिले.
मूळचा आध्यात्मिक पिंड असलेल्या यतिन यांंनी गुरूंची आज्ञा शिरोधार्य मानून शिल्पकलेतच करिअर करायचे ठरवले. नाशिकच्या केटीएचएम येथील फाईन आर्ट महाविद्यालय आणि पुढे मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफमधून शिल्पकारिता विषय घेऊन ’बीएफए’पूर्ण केले. १९९५ मध्ये यतिन पंडित यांना साक्षात आपले गुरू भक्तराज महाराज यांची पूर्णाकृती मूर्ती करण्याचे काम मिळाले. गुरूंचीच मूर्ती तयार करण्याचे काम म्हणजे साक्षात गुरूंचा कृपाप्रसाद, असे समजून यतिन यांनी गुरू भक्तराज महाराजांची अप्रतिम हुबेहूब मूर्ती संगमरवरात तयार केली. त्यानंतर त्यांच्या कलेला सर्वार्थाने ‘गुरूस्पर्श’ लाभला. एकापेक्षा एक सुरेख मूर्तींना अध्यात्माचा स्पर्श मिळत गेला. गजानन महाराज, साईबाबा, गणेश महाराज, भक्तराज महाराज, देवनाथ महाराज यासारख्या संत, गुरू महाराजांच्या ‘वास्तवादी’ हुबेहूब मूर्तींनी त्यांची कला सर्वदूर पसरली. स्वामी समर्थांच्या १५०हून अधिक मूर्ती तयार करण्याचा मान त्यांच्याच नावावर आहे.
प्रत्येक मूर्ती जीवंत भासावी म्हणून त्यांच्या डोळ्यांवर ते अधिकाधिक वास्तववादी रुप देण्याचा प्रयत्न करतात. तिच त्यांची ओळख झाली. ’अतिवास्तवादी’ आणि ’संकल्प’ (कंपोझिशन) शिल्पांचे सुरेख संगम साधत त्यांनी आजवर अनेक मूर्ती, शिल्प तयार केले. संतश्रेष्ठांच्या मूर्ती फायबर आणि संगमरवरात तर संकल्प शिल्पे ‘स्कॅ्रप मटेरिल’ माध्यमातून साकारत त्यांनी वास्तववाद आणि संकल्पशिल्पांना उंची दिली. हॉटेल, फार्महाऊस, शहरातील वाहतूक बेटातील शिल्प, महापालिकेची ‘कर्मशियल’कामे अशी एकूण हजारांहून अधिक शिल्पे, मूर्ती त्यांच्या नावावर आहेत. नाशिकसह नंदूरबार, धुळे, शिरपूर, जळगाव येथील वाहतूक बेटांवरील त्यांची शिल्प सर्जनशीलेतीच साक्ष देतात. विशाखापट्टणम, बंगळुरु, दिल्ली, चेन्नई या आणि अशा अनेक शहरात त्यांची शिल्प तसेच संकल्पशिल्पे दिमाखात उभी आहेत. पुण्यातील किशोर व्यास यांच्यासाठी यतिन यांनी ज्ञानेश्वरांच्या २१ मूर्ती तयार केल्या. त्या सर्वच सर्व मूर्ती जगातील विविध देशात विराजमान झाल्या आहेत.
चित्रपट आणि नाटक, मालिकांचे सेट्स, नेपथ्य यासाठी त्यांनी काम केले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणत्या राजा’ महानाट्यासाठीही त्यांनी साहाय्यक कलादिग्दर्शक म्हणून काम केले. बंगळुरु आणि हैदराबाद येथील ‘रामोजी फिल्म सिटी’तही अनेक चित्रपटांसाठी त्यांनी साहाय्यक म्हणून आपल्या कलेची चुणूक दाखवली. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई, अजित दांडेकर यांच्या समवेतही कलादिग्दर्शक करण्याचा त्यांना अनुभव आहे. नागपूर येथील आठ फुटी निद्रावस्थेतील स्वामी समर्थांची त्यांनी तयार केलेल्या मूर्तीचे खूप कौतुक झाले. पुण्यातील नारायणगाव जवळील कांदळी येथील भक्तराज महारांची संगमरवराची मूर्ती, मूर्तीजापूर, कारंजा येथील नरसिंह सरस्वती, वासुदेवानंद सरस्वती आणि ब्रह्मानंद सरस्वती यांच्या तीन मूर्ती असे अनेक सुरेख कामे त्यांनी साकारले.
हुबेहूब मूर्ती, गोखले शिक्षण संस्थेमधील ज्ञानेश्वर वाचनालयातील ज्ञानेश्वर अशी अनेक शिल्प, मूर्ती कामे त्यांनी केली. “विश्वकर्माला चार हात असतात तो ईश्वरच! परंतु, शिल्पकार दोनच हातातून नवनिर्मिती करतो. आधुनिक शिल्पकरांना विश्वकर्म्याचा दैवी अंश, शक्ती, सर्जनशीलता कृपाप्रसाद असतोच. म्हणूनच शिल्पकार अथवा चित्रकार कलेच्या जोडीला आध्यात्मिक आधिष्ठान हवे,” असे यतिन सांगतात. नाशिक येथील पायोनियर सर्कल येथील त्यांचा ‘मेक इन इंडिया’चा सिंह लक्षवेधी ठरला आहे. डीजीपीनगर येथील हुतात्मा निनाद मांडवगणे यांच्या कार्याला सलाम म्हणून उभारलेले ‘स्मारक शिल्प’ही पंडित यांनी तयार केले. नाशिक रोड येथील आंबेडकर चौकात वारकर्याचे तसेच नंदूरबार येथील बिरसा मुंडा यांची संगमरवरी मूर्तीही त्यांनी तयार केली आहे.
पंडित गेली १५ वर्षं ‘नाशिक आर्टिलरी सेंटर’साठी काम करत आहेत. दिल्ली येथील ‘मे. जनरल माणिक शाह सेंटर’ येथेही ‘आर्टिलरी सेंटर’साठी त्यांनी शिल्पकाम केले आहे. पंजाब जवळील लोंगेवाला येथेही त्यांनी वस्तुसंग्रहालयातही क्रिशक विमानाच्या प्रतिकृतीच्या पुनर्बांधणी आणि तसेच नवीन विमान तयार करण्याची त्यांना संधी मिळाली. या कामाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे. ‘स्टेट आर्ट’मध्ये त्यांच्या ‘बंदीशिल्पा’ला प्रथम पुरस्कार मिळाला. यासह चातक प्रदर्शनात त्यांच्या वास्तववादी शिल्पकृतींना ‘कॅमलिन’चा पुरस्कारही मिळाला. यासह अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. जगातील सर्वोत्तम शिल्पकृती तयार करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. आज राज्यात चार पिढ्यांपासून कलेचा वारसा चालवणार्या शिल्पकारांमध्ये यतिन पंडित यांचेही नाव आदराने घेतले जाते. जागतिक स्तरावरील शिल्पनिर्मिती करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांच्या या स्वप्नासाठी यतिन पंडित यांना शुभेच्छा!
निल कुलकर्णी
९३२५१२०२८४