मुंबई (विशेष प्रतिनिधी): सिंधुदुर्गातील मालवणमध्ये दक्षिण आफ्रिकेत रिंग बसवलेला एक समुद्री पक्षी आढळुन आला आहे. पांढरी शेपटी असलेला हा पक्षी उष्णकटीबंधीय प्रदेशातील समुद्री पक्षी (White Tailed Tropical Seabird) आहे. मालवणमध्ये सापडल्यानंतर त्याच्या पायाला रिंग असल्याचे लक्षात आले. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव Phaethon lepturus असे आहे.
पायातील रिंगवर 5H67529 हा क्रमांक लिहिला असुन त्यावर केप टाऊन, साऊथ आफ्रिका असेही लिहिलेले आहे. यावरुनच हा पक्षी समुद्री मार्गाने स्थलांतर करत सिंधुदुर्गात येऊन पोहोचल्याची शक्यता आहे. पूर्व आफ्रिकेतील सयचलिस (Seychelles) या देशामध्ये मार्क ब्राऊन या शास्त्रज्ञाने या पक्ष्याचे रिंगिंग केल्याचे समजले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या साफरिंग (SAFRING) या प्रकल्पांतर्गत या पक्ष्याला सन 2022 मध्ये रिंग बसविण्यात आली होती. साधारणतः हिवाळ्यात स्थलांतर करणारा या पक्ष्याने हिंद महासागरातून अरबी समुद्रात प्रवास केल्याची शक्यता आहे.
स्थानिक पक्षी निरीक्षकांना हा पक्षी दिसल्यानंतर त्यांनी पक्ष्यांचा बचाव करणार्या प्रा. हसन खान यांना कळवले. त्यांनंतर हा स्थलांतरित पक्षी असल्याचे समजताच वन विभागालाही कळवले गेले. सद्यःस्थितीत हा पक्षी आजारी असून तो वन विभागाकडे आहे. हा पक्षी बरा होताच त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, अशी माहिती हसन यांनी दिली.
“सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी भेट देतात आणि अनेक वेळा जखमी झाल्याचे कॉलही येतात. जिल्ह्यात समृद्ध जैवविविधता असून, शासनामार्फत विशेषतः किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये वन्यजीव उपचार केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. वन्यजीवांची संपूर्ण शास्त्रीय माहिती असणार्या यंत्रणेची नेमणूक अशा केंद्रांवर केली जावी, जेणेकरून त्यांच्यावर योग्य उपचार केले जातील."
- प्रा. हसन खान,
कॉलेज रेस्क्यु टीम,
स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय