आधुनिक परिभाषेत सूर्यनमस्कारांची महती

    24-Jun-2023
Total Views |
Indian Culture Yoga and Suryanamaskar

भारताने जगाला दिलेली अमूल्य भेट म्हणजे योग. फक्त शरीराच्याच नव्हे, तर मनाच्याही स्वास्थ्याचा विचार करणार्‍या योगाबद्दलचे आकर्षण जगभर कसे वाढत आहे, याची दि. २१ जून रोजी साजर्‍या झालेल्या ‘जागतिक योगदिना’मुळे सर्वांना पुन्हा एकदा प्रचिती आली. भारताबाहेर ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून योग प्रभावी ठरत आहेच; पण भारतातही अनेकांना पारंपरिक योगप्रकार नव्याने माहीत होत आहेत. यातूनच अनेकजण आवर्जून वळत आहेत, सूर्यनमस्कारांकडे. या सूर्यनमस्कारांची आधुनिक परिभाषेत, आजच्या काळाला साजेशी ओळख करून देणारे आणि त्यामागचे शास्त्र उलगडणारे पुस्तक म्हणजे निखिल कुलकर्णी लिखित ‘सूर्योपासना.’ संपूर्ण शरीराला व्यायाम घडवणारा व्यायामप्रकार म्हणजे सूर्यनमस्कार हे अनेकांना माहीत आहेच; पण हा फक्त व्यायामप्रकार नाही, तर आपल्याला जीवन देणार्‍या सूर्याची ही उपासना आहे, याची जाणीव करून देणारे हे पुस्तक आहे. ज्याच्यामुळे आपले अस्तित्व आहे, त्या सूर्याप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याचे साधन म्हणजे सूर्यनमस्कार. हा यामधला विचार मनाला भावणारा आहे.

गंमत म्हणजे, अनेक जण समजतात तसा सूर्यनमस्कार हा योगसाधनेचा प्रकार नाही, तर सूर्यनमस्कार एक उपासना आहे आणि योग ही एक साधना आहे, हे लेखक सुरुवातीलाच सांगतो आणि दोहोंमधला फरकही थोडक्यात उलगडून सांगतो. तिथपासूनच पुस्तकाच्या सहजसोप्या तरीही अर्थगर्भ मांडणीची प्रचिती येऊ लागते. पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेला सूर्यनमस्कारांचा इतिहास रंजक आहे. आपल्याकडे पूर्वीपासून सूर्याकडे सृष्टीचा निर्माता म्हणून अत्यंत आदराने बघितले आहे. वेद आणि उपनिषदांमध्ये सूर्योपासनेचे उल्लेख आहेत. १७व्या शतकात समर्थ रामदासांनी आपल्या लेखनातून आणि आचरणातूनही सूर्यनमस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. सदाशिवरावभाऊ पेशवेदेखील पट्टीचे सूर्यनमस्कारपटू होते. आज आपण ज्या स्वरूपात दहा किंवा १२ आसनांमध्ये सूर्यनमस्कार घालतो, त्याचे श्रेय औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांना जाते. त्यांनी याचा खूप प्रसार केला, प्रोत्साहन दिले. ते स्वतः आणि त्यांची पत्नी सूर्यनमस्कारांमुळे वयाची ८० वर्षें पार केली, तरी तेजस्वी आणि तरुण दिसायचे. त्यांना भेटायला आलेल्या लुईस मॉर्गन नावाच्या महिला पत्रकाराने त्यांच्या चिरतारूण्याने प्रभावित होऊन त्यांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीचे पुस्तक इंग्लंडमध्ये जाऊन प्रकाशित केले आणि सूर्यनमस्कारांचे उत्तम दस्तावेजीकरण झाले.

पुस्तकात सूर्यनमस्कारासंबंधी अनेक अंगांची माहिती दिली आहे. सूर्यनमस्कारासाठी योग्य स्थळ आणि काळ, सूर्यनमस्कारांमागे असलेला श्वासविचार, सूर्यनमस्कारांमधली आसने/स्थिती यांच्या आकृत्या असे अनेक पैलू दाखवले आहेत. मानवी मन एका वेळी चारच गोष्टी लक्षात ठेवू शकते. जितके जास्त विचार, तितके आपले मन भिरभिरते. लेखकाने पुस्तकात सूर्यनमस्काराचा ‘मेडिटेटिव्ह फॉर्म’ दिला आहे. यामध्ये सूर्यनमस्कातील प्रत्येक आसनाचे नाव, कुंडलिनी चक्राचे नाव-स्थान-रंग दिले आहेत, शिवाय प्रत्येक नमस्काराशी संबंधित सूर्याच्या नावासह बीजमंत्र हे सर्व लक्षात ठेवून, श्वास-उच्छवासाचा पॅटर्न आठवून नमस्कार घातल्यास चारही कप्पे याच गोष्टींनी भरतात आणि आपले मन इतर कुठे धावतच नाही. विचार थकवणारे असतात, म्हणून निर्विचार-निर्विकार, शांत आणि एकाग्र मन ही उत्तम स्वास्थ्याची गुरुकिल्ली आहे. विचार करत बसलेल्या मनामुळे श्वासाची गती बदलते. त्यामुळे श्वसन उथळ होत जाते. श्वासाकडे लक्षपूर्वक पाहिल्याने त्याची गती संथ लयीमध्ये चालू होते. त्यामुळे मनाचा कोलाहलही बंद होणार होतो आणि हे साध्य करण्यासाठी सूर्यनमस्कार महत्त्वाची भूमिका पार पाडतात. लेखक याची तुलना पतंजली मुनींच्या ‘संप्रज्ञात समाधी’शी करतो.

वैज्ञानिक संशोधन आणि सूर्यनमस्काराचे फायदे यांची सांगड घालून एक नवीनच दृष्टी देण्याचे काम लेखकाने केले आहे. उदाहरणार्थ - एखाद्या गोष्टीविषयी/व्यक्तीविषयी कृतज्ञता दाखवल्यामुळे मनावर होणारा सकारात्मक परिणाम या विषयावर काही शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे, त्याचे दाखले पुस्तकात दिले अहेत. त्यापाठोपाठ सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता, हे नमूद करून या दोन गोष्टींची लेखक सांगड घालतो आणि सूर्यनमस्कार घालत असताना दाखवलेल्या कृतज्ञतेमुळे शरीराचा, मनाचा कसा फायदा होतो, विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही लक्षात येते.

लेखकाची भाषा अनौपचारिक आहे. ‘मी म्हणतो, म्हणून करा’ असा त्याचा अभिनिवेश नाही. उलट अनुभव घेऊन मगच सूर्यनमस्कार आत्मसात करावेत, असा तो आग्रह धरतो. विशेष म्हणजे, नमस्कारांची संख्या महत्त्वाची नाही, असे प्रतिपादन लेखक करतो. तो म्हणतो सूर्यनमस्कार हे साधन आहे, साध्य नाही, हे लक्षात घ्यायला हवे. अमुक इतके नमस्कार घालावेत, हे ध्येय असू शकत नाही. थोडक्यात आपण हे का करतोय हे कळणे, महत्त्वाचे आहे. पुस्तक आजच्या काळात लिहिल्याने त्यात इंग्रजीचा वापरही वर्ज्य नाही. यामुळे आपण काहीतरी अतिगंभीर, गहन वाचत आहोत, असे दडपण येत नाही. उलट आवश्यक तिथे आजच्या आधुनिक विज्ञानातील संकल्पना वापरून मुद्दा स्पष्ट केला आहे. विज्ञानात ’Entropy ’ नावाची संकल्पना सांगताना तो म्हणतो''Entropy means degree of disorder/chaos in a closed system.'' सूर्यनमस्काराने मनाची ’Entropy ’ कशी कमी होते, स्थळ/काळपरत्वे बदलणारी सभोवतालची ’Entropy ’ आपल्या सूर्यनमस्कारांसाठी कशी पूरक किंवा मारक ठरते, याबद्दलचे पुस्तकातले विवेचन एका पारंपरिक उपासना प्रकाराला आधुनिक परिभाषेशी अगदी अलगद जोडून देते.

काळानुसार अद्ययावत केलेले सूर्यनमस्काराचे प्रकार उदा. मेडिटेटिव्ह फॉर्म, एरोबिक फॉर्म, संगीताच्या तालावरचा फॉर्म हेही पुस्तकात वाचणे रंजक आहे. आपण स्वतः चौतालामध्ये नमस्कार घालत असल्याचे लेखक नमूद करतो. या पुस्तकातला प्रत्येक शब्द अनुभवसिद्ध आहे. लेखक अनेक वर्षें ’सूर्यनमस्कार अलायन्स’ या संस्थेच्या मध्यमातून अमेरिकेत सूर्यनमस्कार प्रशिक्षणाचे कार्य करत आहे. शास्त्रज्ञ, संस्था यांनी केलेल्या शास्त्रीय संशोधनाचा उपयोग करून या संस्थेमध्ये सूर्यनमस्काराच्या शरीर आणि मनावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास केला जातो. सूर्यनमस्कार घालणार्‍या लोकांच्या बाबतीतल्या चमत्कार वाटाव्या, अशा गोष्टी अनुभवाला आल्या आहेत. अनेकांची व्यसनं सुटली, मानसिक स्थैर्य आले, एवढेच नव्हे, तर अल्झायमरसारख्या गंभीर आजारातही सुधारणा दिसली आहे.

वसुंधरा काशीकर यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, ‘’हे पुस्तक म्हणजे खरोखरच अध्यात्म आणि विज्ञानाचा सुरेख संगम आहे. ते आपल्याला आपल्या पारंपरिक ज्ञानाकडे पाहण्याची नवी दृष्टी देते. विशेषतः तरुण पिढीने, तर हे पुस्तक आवर्जून वाचायलाच हवे.
 
पुस्तकाचे नाव : ‘सूर्योपासना’
लेखक : निखिल कुलकर्णी
प्रकाशक : ‘विवेकानंद केंद्र’ मराठी प्रकाशन विभाग
पृष्ठसंख्या : १०५
किंमत : १५० रू.

प्रसाद फाटक