तळपे भवानी देवीची तलवार...

    23-Jun-2023   
Total Views |
Article On Indian fencer Bhavani Devi

वेळ पडली तेव्हा आईचे दागिने गहाण ठेवले. काठीने सराव केला. तिने तलवारबाजी हा खेळ घरोघरी पोहोचवला. जाणून घेऊया भारताची पहिली आंतरराष्ट्रीय तलवारपटू भवानी देवीविषयी...

नुकत्याच पार पडलेल्या आशियाई तलवारबाजी स्पर्धेत भारताच्या भवानी देवीने इतिहास रचला. आशियाई स्पर्धेत तलवारबाजीमध्ये कांस्यपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत एकाही महिला खेळाडूला पदक जिंकता आले नव्हते. पण, ही कसर आता भवानी देवीने भरून काढली. ‘वर्ल्ड चॅम्पियन’ आणि क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मिसाकी एमुराचा ‘१५-१०’ असा पराभव करून भवानीने उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्य फेरीत तिला पराभव पाहावा लागला असला तरीही तिने आपले कांस्यपदक मात्र निश्चित केले होते. विशेष म्हणजे, भवानी देवी ही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारतातील पहिली तलवारपटू. २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरत तिने पहिल्याच सामन्यात विजयी पताका फडकावली होती. परंतु, नंतर तिला पराभव पत्करावा लागला. असे असले तरीही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरत तिने भारताचे नाव उंचावले होते.

दि. २७ ऑगस्ट, १९९३ रोजी चेन्नईत जन्मलेल्या भवानी देवीचे पूर्ण नाव चदलवदा आनंदा सुंदररामन भवानी देवी असे आहे. वडील सी आनंदा सुंदररामन एक पुजारी असून आई सीए रमाणी गृहिणी आहेत. भवानीने तिचे शालेय शिक्षण मुरुगा धनुष्कोडी मुलींचे उच्च माध्यमिक चेन्नई येथून पूर्ण केले. त्यानंतर सेंट जोसेफ इंजिनिअरिंग कॉलेज, चेन्नई आणि सरकारी ब्रेनन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. ‘बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’मध्येही भवानीने शिक्षण पूर्ण केले.

२००४ मध्ये शालेय स्तरावर तलवारबाजीची तिची ओळख झाली. दहावीनंतर ती केरळमधील थलासेरी येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात रुजू झाली. वयाच्या १४व्या वर्षी तिने तुर्कीमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत म्हणजेच ‘ज्युनियर वर्ल्ड फेंसिंग चॅम्पियनशिप’मध्ये भाग घेतला. ही तिची पहिली स्पर्धा होती. याठिकाणी तिला तीन मिनिटे उशीर झाल्यामुळे ‘ब्लॅक कार्ड’ मिळाले. २००९ मध्ये मलेशियातील ‘कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप’मधील कांस्य पदकापासून तिने आपला विजयरथ सुरू केला. पुढे थायलंडमध्ये २०१० इंटरनॅशनल ओपनमध्ये कांस्यपदक, २०१० मध्ये फिलीपिन्समधील कॅडेट आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य, फिलीपिन्स येथे २०१२ साली झालेल्या ‘कॉमन वेल्थ चॅम्पियनशिप’मध्ये रौप्य आणि कांस्यपदक तर २०१४ मध्ये फिलीपिन्समध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये २३ वर्षांखालील गटात तिने रौप्य पदक मिळवले, अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली. तिने उलानबाटार मंगोलिया येथे २०१५ मध्ये ‘अंडर-२३ आशियाई चॅम्पियनशिप’ आणि २०१५ बेल्जियम येथे झालेल्या ‘फ्लेमिश ओपन’मध्येही कांस्यपदक जिंकले.

‘फ्लेमिश ओपन’मध्ये आश्चर्यकारक कामगिरी केल्याबद्दल, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी भवानीला तीन लाख रुपयांची पर्स देऊन सन्मानित केले होते. २०१५ मध्ये ‘राहुल द्रविड अ‍ॅथलीट मेंटॉरशिप प्रोग्राम’साठी ‘गोस्पोर्ट्स फाऊंडेशन’ निवडलेल्या १५ खेळाडूंपैकी ती एक होती. २०१७ मध्ये आईसलॅण्डमधील रेकजाविक येथे झालेल्या स्पर्धेत वैयक्तिक सेबरमध्ये विजय मिळवून विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय तलवारबाज ठरली. २०१९ मध्ये तिने बेल्जियम आणि आईसलॅण्ड येथे झालेल्या ‘टूर्नोई सॅटेलाईट फेंसिंग’ स्पर्धेत महिलांच्या ‘सेबर’ वैयक्तिक प्रकारात रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. भवानीचा प्रवास सोपा नव्हता. मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने परिस्थितीही जेमतेम होती. खेळाच्या तयारीसाठी तिच्या आईने दागिनेही गहाण ठेवले आणि लोकांकडून कर्ज घेतल्याचे तिने अनेक मुलाखतींत सांगितले.

भवानी देवीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. विशेष म्हणजे, भवानी देवीचा तलवारबाजीमध्ये प्रवेश नाईलाजाने झाला. तिच्या शाळेत सहा खेळ होते. तिला यापैकी एका खेळाची निवड करायची होती. परंतु, निवड करण्यापूर्वीच अन्य खेळांतील जागा पूर्ण झाल्या. त्यामुळे तिने तलवारबाजीची निवड केली. पुढे तिला या खेळाची गोडी लागली आणि तिने सराव सुरू ठेवला. तलवारबाजी शिकण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकदा खोटं बोलावं लागल्याची कबुलीही भवानीने दिली आहे. तिला वडिलांचे वार्षिक उत्पन्न विचारण्यात आले होते. कारण, तलवारबाजी हा खेळ तसा खूप महाग आहे. परंतु, खेळासाठी तिने खोटं बोलत वडिलांचे उत्पन्न जास्त सांगितले.

सुरुवातीच्या काळात तिने बांबूच्या काठीने सराव सुरू केला. दररोजचा सराव काठीनेच केला जात असे. फक्त स्पर्धेदरम्यान तलवारीचा वापर केला जाई. कारण, तलवार खूप महाग असल्याने ती तुटली तर तिचा खर्च भवानीला परवडणारा नव्हता. स्पर्धेसाठीची तलवार सहजासहजी भारतामध्ये मिळत नव्हती. भवानी देवीला भारताच्या क्रीडा मंत्रालयाकडून ‘अर्जुन पुरस्काराने’देखील सन्मानित करण्यात आले. भवानी देवीने आपली तलवार तळपवत भारतात ‘तलवारबाजी’ या खेळाला घरोघरी पोहोचवले. भवानी आता जुलै २०२४ मध्ये होणार्‍या पुढील ऑलिम्पिकसाठी अथक मेहनत घेत आहे. तिच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...

७०५८५८९७६७

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.