नवी दिल्ली : मध्य अमेरिकन देश होंडुरासमधील महिला तुरुंगात दंगल उसळली. या दंगलीत ४१ महिला कैद्यांचा मृत्यू झाला आहे. बेकायदेशीर कारवायांवरून दोन टोळ्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात त्यांचा जाळून मृत्यू झाला. तसेच गोळीबार आणि चाकूने जखमी झालेल्या सुमारे ७ महिला कैद्यांवर उपचार सुरू आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान या तुरुगांत सुमारे ८०० हून अधिक कैदी आहेत. जे त्याच्या क्षमतेच्या दुप्पट आहेत.
होंडुरासच्या राष्ट्रीय पोलीस तपास संस्थेचे प्रवक्ते युरी मोरा यांनी या संपूर्ण घटनेबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, बहुतेक महिला जळाल्या आहेत. तर काहींना गोळ्याही लागल्या आहेत.ही घटना होंडुरासची राजधानी तेगुसीगाल्पाच्या वायव्येस सुमारे ३० मैल (५० किलोमीटर) तमारा तुरुगांच घडली. गंभीर जखमी झालेल्या महिला कैद्यांवर तेगुसीगाल्पा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देशाच्या तुरुंग यंत्रणेच्या प्रमुख जुलिसा विलानुएवा यांनी या संपूर्ण घटनेवर दुःख व्यक्त केले असून दंगलीत सहभागी असलेल्या संघटित टोळीवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. कारागृहातील बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी कठोर प्रयत्न सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळेच ही दंगल घडली.
तसेच होंडुरासमधील तुरुंगाची अवस्था अत्यंत वाईट आहे. येथे कैद्यांची गर्दी असते. स्वच्छता ही आणखी एक समस्या आहे. अनेकदा येथील तुरुंगातून मारामारी झाल्याच्या बातम्या येत असतात. २०१९ मध्ये ही अशाच प्रकारची टोळीने हिंसाचार घडून आणला होता.त्यामुळे ३७ कैद्यांचा मृत्यू झाला होता.