दि. १८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून भारताला २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प जाहीर केला. तसेच क्षयरोगमुक्तीचे हे लक्ष्य जरी मोठे असले, तरी देशातील जनतेच्या आणि युवापिढीच्या सहकार्याने आपण हे ध्येय नक्कीच गाठू शकतो, असा विश्वासदेखील मोदींनी व्यक्त केला. त्या पार्श्वभूमीवर क्षयरोगमुक्तीसाठी सरकारची ध्येय-धोरणे आणि सामान्य नागरिकांची भूमिका याचा आढावा घेणारा हा लेख...
क्षयरोग हा सूक्ष्म जंतूंमुळे होणारा आजार. ‘मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस’ या जीवाणूंद्वारे होत असल्याने या आजाराला इंग्रजीत ‘टीबी’ असे म्हणतात. हा जीवाणू हवेद्वारे एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे संक्रमित होतो आणि सामान्यतः फुफ्फुसाला हानी पोहोचवतो. मात्र, क्षयरोग शरीराच्या इतर भागांमध्ये सुद्धा होऊ शकतो. जसे की, आतडी, मणके, त्वचा, मेंदू, सांधे यांसारख्या अवयवही क्षयरोगग्रस्त होऊ शकतात. अशा या क्षयरोगाचे जगभरात प्रमाण आजही खूप जास्त आहे.
इसवी सन १८८२ साली डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला. याविषयीचा प्रबंध त्यांनी जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दि. २४ मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. कोच यांनी लावलेल्या शोधामुळे क्षयरोगाची ओळख आणि उपचारांचा मार्गही मोकळा झाला. त्यांच्या या क्रांतिकारी शोधासाठी डॉ. रॉबर्ट कोच यांना १९०५ साली ‘नोबेल’ पारितोषिकानेही सन्मानित करण्यात आले. पण, दुर्देवाने आजही क्षयरोगामुळे जगभरात, विशेषकरुन विकसनशील देशांमध्ये दरवर्षी सुमारे १.५ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. या वस्तुस्थितीची जाणीव ठेवून या आजाराविषयीची, त्याच्या उपचारांसंबंधीची जागरूकता वाढवणे, हे आजही नितांत गरजेचे आहे. तत्पूर्वी या क्षयरोगाची लक्षणे आणि उपचार पद्धती याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
क्षयरोगाची लक्षणे
१)तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला
२)कफावाटे रक्त पडणे
३) ताप
४)वजन कमी होणे)
५) भूक न लागणे
६)श्वास घेण्यास त्रास होणे
७)थकवा येणे
क्षयरोगावरील उपचार
क्षयरोगाची लक्षणे आढळलेल्या व्यक्तीने त्वरित डॉक्टरांकडे जावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे अगदी नियमितपणे घ्यायला हवी. क्षयरोग पूर्णपणे बरा होण्यासाठी जवळपास सहा महिने उपचार घ्यावे लागतात. क्षयरोगाचे प्रमाण जास्त असल्यास काही रुग्णांना ठीक होण्यासाठी एक वर्षदेखील लागू शकते. त्यामुळे नियमित आणि योग्य तो औषधोपचार न केल्यास क्षयरोग जीवघेणा ठरू शकतो. सध्या अनेक चाचण्यांद्वारे क्षयरोगावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. जसे, वारंवार रक्त तपासणी करून क्षयरोगाचे प्रमाण निश्चित करणे, एक्स-रेद्वारे आजाराने किती गंभीर स्वरूप धारण केले आहे, हे तपासणे, वेळोवेळी औषधे घेणे आणि आजार पूर्णपणे बरा होईपर्यंत डॉक्टरांच्या संपर्कात राहणे, या सगळ्याद्वारे क्षयरोगावर वेळीच नियंत्रण मिळवता येऊ शकते.
भारताने क्षयरोगाच्या बाबतीत समाधानकारक प्रगती केली असली तरी अजूनही ही समस्या कायम आहे. सरकारी आकडेवारीनुसार देशात दररोज ८०० पेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू क्षयरोगाने होतो. क्षयरोगामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने १९६२ पासून देशात ‘राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम’ राबविण्यात आला. मात्र, या कार्यक्रमांतर्गत केवळ ३० ते ४० टक्के रुग्णांना बरे करण्याइतके मर्यादित यश मिळाले. त्यामुळे केंद्र शासनाने सन १९९३ पासून काही निवडक ठिकाणी पथदर्शी तत्त्वावर प्रत्यक्ष निरीक्षणाखाली अल्पमुदतीच्या सुधारित ‘राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण’ कार्यक्रमाचीही सुरुवात केली.
पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर १९९८पासून केंद्र शासनाने सुधारित ‘राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण’ कार्यक्रमाचा प्रसार करण्याचे ठरविले. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सुधारित ‘राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण’ कार्यक्रम देशामध्ये १९९८-९९ पासून टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात हा कार्यक्रम राबविण्यासाठी ‘राज्य क्षयरोग नियंत्रण सोसायटी’ व ७९ ‘जिल्हा/शहर क्षयरोग नियंत्रण सोसायटीं’ची स्थापनादेखील करण्यात आली आहे. सुधारित ‘राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण’ कार्यक्रमाअंतर्गत सध्या महाराष्ट्रात प्रत्यक्ष निरीक्षणाखालील औषधोपचार उपलब्ध आहेत. आजघडीस महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांत आणि २३ महानगरपालिकांमध्ये सुधारित ‘राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण’ कार्यक्रम राबविला जात आहे.
क्षयरोग ही भारतातील एक प्रमुख आरोग्य समस्या असून त्यामुळे दरवर्षी सुमारे २ लाख, २० हजार मृत्यू होतात. २०२० मध्ये भारत सरकारने आपल्या ‘राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन’ कार्यक्रमाद्वारे २०२५ पर्यंत देशाला क्षयरोगमुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या कार्यक्रमातील उद्दिष्टांमध्ये आरोग्य सेवेत मोठी गुंतवणूक, ‘निक्षय पोषण योजने’द्वारे पूरक पोषण प्रदान करणे, क्षयरोगासाठी राष्ट्रीय महामारी सर्वेक्षणाचे आयोजन करणे आणि क्षयरोग दूर करण्याच्या उद्दिष्टांसाठी भारत सरकार आणि खासगी आरोग्य पायाभूत सुविधांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रीय मोहीम आयोजित करणे यांसारख्या अभियान-कार्यक्रमांचा समावेश आहे. ‘निक्षय पोषण योजना’ ही भारतातील एक सरकारी योजना आहे, जी क्षयरुग्णांना अन्न खरेदी करण्यासाठी दरमहा ५०० रुपये अर्थसाह्य करते.
यानंतर दि. ९ सप्टेंबर २०२२ रोजी देशात ‘प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान’ सुरू करण्यात आले. क्षयरोग उपचारांबाबत जनजागृती करण्यावरही सरकारने भर दिलेला दिसतो. यासाठी भारत सरकारकडून वेळोवेळी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ‘टीबी’विषयी जनजागृतीसाठी स्पर्धा आयोजित केल्या जातात. उदाहरणार्थ, चित्रकला, लेखी स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, भित्तिचित्रे इत्यादीद्वारे ‘टीबी’ जनजागृतीचा संदेश दिला जातो. याशिवाय विविध नाटके, जाहिराती, होर्डिंग्ज आदींद्वारे सर्वसामान्यांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती केली जाते. याद्वारे भारत सरकार क्षयरोग निर्मुलनासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. लवकरच ‘पोलिओमुक्त भारता’सारखेच आपण ‘क्षयरोगमुक्त भारत’ही दिसून येईल, अशी आशा. परंतु, ही सामूहिक जबाबदारी आहे. सरकार आपल्या पातळीवर प्रयत्नशील आहेच, पण नागरिकांनीही याबाबतीत कुठलाही हलगर्जीपणा न करता सरकारतर्फे दिल्या जाणार्या उपचारांचा लाभ घ्यावा आणि सरकारच्या अभियानाला बळकटी द्यावी, तरच क्षयरोगमुक्तीचे लक्ष्य सर्वार्थाने साध्य होईल.
श्रेयश खरात