निमित्तमात्र नको योग, जुळू दे कायमचा मैत्र‘योग’...

    20-Jun-2023
Total Views |
Article On International Yoga Day Occasion

दरवर्षी आपल्याला भेटतो तो ‘योगा डे’. तो या सार्‍या शासकीय समारंभांमध्ये रुबाबाने मिरवतो. आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल पिक्सवर अभिमानाने विराजमान होतो. माझा काही त्या ‘योगा डे’ ला विरोध नाही. पण, या झगमगाटापासून लांब निघून गेलेल्या स्वतःतच रमलेल्या त्या प्राचीन योगशास्त्राला भेटता आलं तर भेटावं. तुमचीही त्याच्याशी गाठ घालून द्यावी आणि जुळलं तुमचं त्याच्याशी सहज मैत्र तर जुळू द्यावं. हा या लेखनप्रपंचाचा उद्देश!

२००२ मध्ये ’योगगुरु बाबा रामदेव’ नावाची एक लाट आली. घराघरातल्या टीव्ही-टीव्हीवर श्वास घेतले आणि सोडले जाऊ लागले. ’योग’ अचानक ‘फॅशन’मध्ये आला. आम्ही ’योग’ करतो, हे सांगणं प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जाऊ लागलं. पूर्वी फक्त सचिन ’मारायचा’ आणि दुसर्‍या दिवशी घराघरातून ’किती मारले?’च्या चर्चा व्हायच्या. पण, आता रोज सकाळी ‘आज किती मारले?’ असं एक काका आपल्या बाल्कनीतून दुसर्‍या बाल्कनीतल्या काकांना विचारू लागले. त्यावर उत्तरंही, “सचिनला लाजवतील अशी १३६... या!”

“१३६ फक्त? मी २३०!” अशी उत्तरं कानावर यायला लागली. ‘कपालभाती’ अशी बाल्कनी बाल्कनीतून मिरविली जाऊ लागली.
आता वेगवेगळ्या रंगाचे ’योगा मॅट’ प्रत्येक सुपर मार्केटमध्ये दिसायला लागले. तिथून दिमाखात ते याच्या-त्याच्या घरात आणि मग कालांतराने माळ्यावर, कपाटात वगैरे ठिकाणी रवाना झाले. बाबा रामदेव मात्र टीव्हीवर योग करतच राहिले. काकूंना काही स्वयंपाकातून वेळ मिळेना. त्यामुळे त्यांनी योग करण्यापेक्षा ’पतंजली आटा’ आणून आपली रामदेव बाबांप्रति असलेली श्रद्धा जपायचं ठरवलं. मुलांना वेळ होताच कधी? त्यांचे डोळे पुरते उघडायच्या आतच ती त्यांच्या त्यांच्या स्कूल बसमध्ये बसलेली असतात आणि डोळे पूर्ण मिटेपर्यंत या ना त्या क्लासला जातच असतात. काका मात्र जमेल तसं सोयीने, सवडीने, ‘कपालभाती’चे ‘स्ट्रोक्स’ मारतच राहिले. चहाबरोबर पतंजली बिस्किटं खात राहिले. पाहुण्यांनाही आग्रहाने खायला घालत राहिले.

हळूहळू सोशल मीडियाचा सुळसुळाट वाढला. बाबा रामदेव मग टीव्हीवरून मोबाईलवर आले. त्यांच्याबरोबरच २१ दिवसांचं चॅलेंज, सात दिवसांचं चॅलेंज घेऊन अनेक ’योगा टीचर’ युट्यूबवर अवतरले. आकर्षक (की मादक) कपडे घातलेल्या स्त्री सेलिब्रिटीजचे एक मिनिटांचे ‘योगा रील्स’ ‘व्हायरल’ होऊ लागले. भारत देशात ’योग’ अशा रीतीने प्रसिद्धी पावत असतानाच २०१५ मध्ये अशी बातमी आली की, संयुक्त राष्ट्राने (युनायटेड नेशन्स) दि. २१ जून हा दिवस ’इंटरनॅशनल योगा डे’ म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. भारताचे पंतप्रधान मोदी यांनीच संयुक्त राष्ट्रासमोर हा प्रस्ताव ठेवला आणि तो ६९/ १३१ मतांनी मान्य झाला. भारतीय ’योगशास्त्र’ एकदम एका रात्रीत ’जागतिक’ वगैरे झालं. मग ऐट काय विचारता?

मोदींनी सुंदरसा सदरा घालून सुबकसं एक भाषण, ’प्यारे देशवासीयों’साठी केलं. ते आवडलं सगळ्यांनाच. आठवणीत मात्र कुणाच्याच राहीलं नाही. मोठमोठे शासकीय कार्यक्रम झाले. शाळाशाळांमध्ये ट्रॅक सूट घालून योगा मॅट घेऊन मुलांनी, शिक्षकांनी योगासनं केली. पालकांनी कौतुकाने मुलांचे, वेगवेगळी आसनं करतानाचे फोटो काढून फेसबुकवर टाकले. व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस ठेवले. दिल्ली एअरपोर्टवरची चित्रविचित्र शिल्पं लोप पावली व त्या जागी सूर्यनमस्कारांची १२ आसने दाखवणारी शिल्पं आली. भारतीय ’योगशास्त्र’ असं एकाएकी झकपक झालं. पण शांत, संयमी, समाधानी, स्वतःतच रमणार्‍या, गर्दी, गोंधळ, प्रसिद्धी यांचं मुळातच वावडं असणार्‍या कुणालातरी अचानक झगझगीत प्रसिद्धीमध्ये आणलं तर ती व्यक्ती कशी बुजून जाईल? गोंधळून-बिचकून जाईल? तसंच या योगशास्त्राचं झालं. अगदी कसनुसं होऊन ते हळूच निसटलं आणि या झगमगटापासून लांब कुठेतरी एकांतात निघून गेलं.

गेलं ते गेलंच! दरवर्षी आपल्याला भेटतो तो ’योगा डे’. तो या सार्‍या शासकीय समारंभांमध्ये रुबाबाने मिरवतो. आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल पिक्सवर अभिमानाने विराजमान होतो. माझा काही त्या ’योगा डे’ ला विरोध नाही. पण, या झगमगाटापासून लांब निघून गेलेल्या स्वतःतच रमलेल्या त्या प्राचीन योगशास्त्राला भेटता आलं तर भेटावं. तुमचीही त्याच्याशी गाठ घालून द्यावी आणि जुळलं तुमचं त्याच्याशी सहज मैत्र तर जुळू द्यावं. हा या लेखनप्रपंचाचा उद्देश! तर गोष्ट तशी बरीच जुनी. नक्की किती जुनी कसं सांगणार? कारण, विद्वानांचेही त्याबाबतीत मतभेद आहेत. साधारण दोन हजार वर्षांपूर्वी असं म्हणूया. ’पतंजली मुनी’ (ज्यांचा रामदेव बाबांच्या पतंजलीशी काहीही संबंध नाही!) त्यांनी ’योग सूत्रे’ लिहिली. १९५ योगासूत्रे. गंमत अशी की, या १९५ पैकी एकाही सूत्रामध्ये आपण आज जी वेगवेगळी आसने करतो त्याचे वर्णन नाही. असो. तर त्यांनी योग सूत्रे लिहिली. पण, त्यांनी फक्त लिहिली. त्यापूर्वीही अनेक वर्षं ती भारतीय योगींच्या आचरणात होतीच. पतंजली मुनींनी ती लिखित स्वरूपात जगाच्या समोर ठेवली. तेच हे ‘योग शास्त्र’!

आपल्या इंद्रियांचा, मनाचा, बाह्य जगाशी असलेला संबंध कमी कमी करत जाऊन तो आपल्या ’स्व’शी जोडायचा आणि त्यायोगे समाधान, शांती, आनंद, आरोग्य मिळवायचे आणि अंतिम ध्येय- मोक्षप्राप्तीकडे, डोळसपणे वाटचाल करायची. हा या शास्त्राचा मुख्य उद्देश. मग बाह्य झगमगाटापासून मनाला परावृत्त करून आतल्या प्रकाशाकडे घेऊन जाणारं हे शास्त्र, मोठमोठ्या स्टेजवर, टीव्ही मोबाईलच्या स्क्रिनवर, व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर आणि इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर कसं बरं रमेल? महत्त्वाचा मुद्दा हा की, या शास्त्राचा मुख्य विषय ’मानवी शरीर’ नसून ’मानवी मन’ आहे. हे शास्त्र शरीराला वळवून-वाकवून जितक्या वेगवेगळ्या कोनातून वेडंवाकडं करायला शिकवतं, तितकंच किंबहुना त्याही आधी, हे शास्त्र मनाला सूतासारखं सरळ करायला शिकवतं. तोच या शास्त्राचा मूळ उद्देश!

या योगशास्त्राची आठ अंगे आहेत. आठ पायर्‍या असंच म्हणूया १) यम २) नियम ३) आसन ४) प्राणायाम ५) प्रत्याहार ६) धारणा ७) ध्यान ८) समाधी यातील आपल्या परिचयाचे ते ‘आसन’ (योगासन) आणि ‘प्राणायाम.’ या दोहोंचाही शरीर स्वास्थ्य टिकवून ठेवण्यात किती मोलाचा वाटा आहे, हे आतापर्यंत आपल्याला पटलं आहे. पण, हे दोन्ही, ’यम’ आणि ’नियम’ याच्यानंतर येतात, याचा मात्र आपल्याला पत्ताच नाहीये आणि समजा चुकूनमाकून हे कानावरून गेलं असलंच तरी हे सगळं आचरणात वगैरे आणण्याचा प्रकार आहे, यावर आपला मुळीच विश्वास नाहीये!

हे यम पाच आहेत. १) अहिंसा २) सत्य ३) ब्रह्मचर्य ४) अस्तेय ५) अपरिग्रह.
अहिंसा : काया-वाचा-मनाने अहिंसा. प्रत्यक्ष कुणाशी हातापायी, मारामारी करायची नाही. ही झाली ‘कायिक अहिंसा.’ कुणीही दुखावलं जाईल, असे शब्द तोंडून बाहेर पडू द्यायचे नाहीत ही ‘वाचिक अहिंसा.’(यात व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, ट्विटरवर सांभाळण्यातली ‘लेखी अहिंसा’ ही आहेच.) आणि कुणीही दुखावलं जावो, अशी इच्छा मनातही येऊ द्यायची नाही, ही ‘मानसिक अहिंसा.’ चराचरातल्या प्राणिमात्रांबद्दल अशी सद्भावना निर्माण झाली की, आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा असा काही प्रभाव पडतो की तो प्राण्यांनाही जाणवायला लागतो. टिळकांच्या खांद्यावर चिमण्या येऊन बसायच्या किंवा बाबा आमटे वाघाशी खेळायचे, त्यांना कुरवाळायचे ते याच योग साधनेने.

सत्य : कथा-पुराणांमध्ये आपण अशा ऋषीमुनींबद्दल ऐकलं आहे, जे रागाच्या भरात शाप देऊन जायचे आणि मग म्हणायचे, ’माझ्या तोंडून निघून गेलेला शब्द आता मागे घेता येणार नाही. तो खरा ठरणारच.’ या अशा ऋषीमुनींच्या कथा आपण कीर्तनात तरी ऐकल्या आहेत, नाहीतर ‘रामानंद सागर’च्या टीव्ही मालिकांमध्ये तरी! पण, यांचा वास्तविक जीवनाशी काही संबंध असू शकतो, असा विचारही कधी आपल्या मनाला शिवत नाही. जेव्हा केवळ आणि केवळ सत्यच, वाणीने उच्चारण्याचे व्रत, मनुष्य अनेक वर्षे आचरतो, तेव्हा त्याच्या वाणीला अशी काही शक्ती प्राप्त होते की त्याने उच्चारलेला प्रत्येक शब्द खरा ठरावा. या चराचरातील सृष्टी जणू त्याचा शब्द खरा ठरवण्यासाठी कार्यरत होते. (‘ओम शांती ओम’मधल्या शाहरुख खानवर जर आपण विश्वास ठेवू शकतो, तर पतंजली मुनींवर ठेवायला काय हरकत आहे?)

ब्रह्मचर्य : परस्त्रीशी असंग व स्वस्त्रीशी संयमित संग एवढाच ब्रह्मचर्याचा अर्थ नसून सर्वच इंद्रियांवर संयम असा अर्थ आहे. वाढत जाणारे ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म यामुळे काय बघावं, किती बघावं, कधी बघावं, यावरचा सुटत चाललेला संयम... चायनीज, मेक्सिकन, थाई इत्यादी इत्यादी मुळे किती खावे, काय खावे, यावरचा सुटत चाललेला संयम... हे आपल्या ब्रह्मचर्याचे नाशक!

अस्तेय : नैतिक नियमांनी जे आपलं नाही ते हवंसं वाटणं म्हणजे स्तेय(चोरी). अशा सर्व प्रकारच्या चोर्‍यांपासून मन निवृत्त होणं म्हणजे अस्तेय.

अपरिग्रह : सर्व भौतिक सुखांकडे पाठ फिरवणं, भौतिक सुखांचा स्वीकार न करणे म्हणजेच अपरिग्रह.
अशा पाच ’यमांनंतर’ येतात ते पाच नियम-

 शौच : शरीराबरोबरच मनाची आत्यंतिक शुद्धी म्हणजेच शौच! ’पायाला माती लागू नये म्हणून जसे जपतोस तसेच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप बरें का शाम’ असे श्यामची आई श्यामला सांगते, तोसुद्धा एक योगशास्त्राचाच उपदेश असे म्हणायला हरकत नाही.

संतोष : ’हव्या हव्याची हाव निवू दे’... असे विंदा करंदीकर म्हणतात, त्याप्रमाणे सतत पैसा, प्रसिद्धी, यश यापैकी काहीतरी हवंहवंसं असणं संपलं म्हणजेच बाहेरून अंतर्मनाकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. हव्यास संपला की मागे राहतो तो संतोष, समाधान, शांती!

तप : पूर्वी अक्राळविक्राळ दिसणारे राक्षस कुठल्याशा देवाचा तप करायचे आणि त्याच्याकडून वरदान मिळवून मग उन्मत्तपणे वागायचे, हे आपल्याला ऐकून माहिती आहे. ते ’तप’ म्हणजे अमुकच एका पद्धतीने वागण्याचा नियम! आजच्या काळात आपण त्याला ‘तप’ न म्हणता ’व्रत’ म्हटलं तरी चालेल. हे व्रत कोणत्याही देवाला प्रसन्न करण्यासाठी नसून इंद्रिय, मन यांना शिस्त लावण्यासाठी असतं. असं कोणतंतरी व्रत अंगीकारणं आणि कोणत्याही परिस्थितीत ते पाळणं याने मनाची शक्ती वाढते.

स्वाध्याय : कोणत्यातरी इष्ट देवतेचा मंत्र स्वीकारून त्याचं सतत उच्चारण म्हणजेच स्वाध्याय.

ईश्वर प्रणिधान : आपण करीत असलेल्या प्रत्येक कर्माचं खरं कर्तृत्व देवाकडेच आहे, असं मानून ते देवाला समर्पित करणं म्हणजे ईश्वर प्रणिधान.

योगशास्त्र हे एक आस्तिक शास्त्र आहे. त्यामुळे योगसाधकाने नास्तिक असून चालणार नाही. मूर्त किंवा अमूर्त अशा कोणत्यातरी शक्तीचं अस्तित्व मान्य करणं योगशास्त्राच्या अभ्यासासाठी अपरिहार्य आहे. ’यम’ आणि ’नियम’ यांची सवय मनाला लावून झाली की मग पुढचा टप्पा म्हणजे ’आसन’ आणि ’प्राणायाम’! शरीर आणि श्वासोच्छश्वास यांना लावण्याची सवय किंवा या संदर्भातले पाळावयाचे नियम. आणि याही पुढे प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधी! या वर्षभरात यम, नियम, आसन आणि प्राणायाम याबाबत थोडीफार प्रगती तुम्ही आणि मी, दोघांनीही साधलीच तर पुढच्यावर्षी उरलेल्या चार अंगांबद्दल नक्की लिहीन. तोपर्यंत आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या शुभेच्छा!

वैद्य गौरी प्रभू
७७९८१३२२३३