मुंबई : मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ आणि दैनंदिन जीवनशैली तंदुरुस्त रहावी यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनी म्हणजे बुधवार दिनांक २१ जून रोजी मुंबई महानगरातील २४ प्रभागातील शिव योगा केंद्रांमध्ये योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पुढील सहा महिन्यात ‘फिट मुंबई’ चळवळ अंतर्गत विविध स्पर्धा, विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सन २०२२ मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विभाग स्तरावर मोफत शिव योगा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागात एकूण १३१ शिव योग केंद्र कार्यरत असून, सध्या ६१६३ लाभार्थी योग प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. तसेच जून २०२२ पासून ते आजपर्यंत एकूण १५ हजार ७७ लाभार्थ्यांनी योग प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून यंदा योग दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यंदाच्या वर्षीच्या आंतराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना "मानवतेसाठी योग" ही आहे. विभाग स्तरावरील शिव योग केंद्रांमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये योग विषयी माहिती व निरोगी आयुष्याबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता सर्व विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी योग प्रशिक्षण संस्थांसोबत समन्वय साधून आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहेत.
असा आहे ‘फिट मुंबई’ उपक्रम
जे नागरिक चालत नाही त्यांना चालण्यासाठी, जे चालतात त्यांना धावण्यासाठी आणि धावणाऱ्यांना अधिक वेगाने धावण्यासाठी प्रोत्साहित करुन जागरूकता निर्माण करणे हे ‘फिट मुंबई’ उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच नागरिकांना फक्त धावण्याची सवय लावणे नव्हे तर नियमितपणे ३० ते ४० मिनिटे काही शारीरिक व्यायाम करण्याची सवय लावणे असा या उपक्रमाचा उद्देश आहे.
डिसेंबरमध्ये होणार हाफ मॅरेथॉन
‘फिट मुंबई’ या अभियानाचा एक भाग म्हणून डिसेंबर २०२३ मध्ये ‘फिट मुंबई बीएमसी हाफ मॅरेथॉन’ उपक्रम घेण्याचे पालिकेचे नियोजन आहे. तसेच मुंबईकरांसाठी माहिती (Information), शिक्षण (Education) आणि संवाद (Communication) उपक्रमही राबविण्यात येणार आहे. तसेच कार्यरत असलेल्या शिव योग केंद्रांच्या माध्यमातून सुदृढ शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग, ध्यान, प्राणायाम शिकविण्यात येणार आहे. याशिवाय वॉकेथॉन, प्लॉगॅथॉन, श्रमदान आदींच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान आणि विविध स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.