आपत्ती व्यवस्थापनाचा ‘गुजरात पॅटर्न’

    19-Jun-2023   
Total Views |
Disaster Management In Gujrat

‘बिपरजॉय’ने अपेक्षेप्रमाणेच गुजरातच्या किनारपट्टीच्या भागात तांडवनृत्य केलेच. आता हे वादळ पुढे राजस्थानकडे सरकले आहे. मात्र, या चक्रीवादळाचा अतिशय यशस्वीपणे सामना करून गुजरात सरकार आणि केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापनातील नवा अध्याय नक्कीच रचला आहे. त्यामुळे गुजरात सरकारने केंद्र सरकारच्या सहकार्याने हे कसे साध्य केले, ते समजून घेणे गरजेचे आहे.

आपत्तीचे व्यवस्थापन करणे, हे कोणत्याही सरकार पुढील सर्वांत मोठे आव्हान. मग ती आपत्ती नैसर्गिक असो की मानवनिर्मित. प्रामुख्याने नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वीच त्याचा अभ्यास करून वेगवान हालचाली केल्यास जीवित आणि वित्तहानी टाळता येते.
‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने गुजरातच्या किनारपट्टीस गत आठवड्यात झोडपून काढले. या चक्रीवादळाची तीव्रता एवढी होती की, त्यामुळे गुजरातच्या किनारपट्टीच्या भागामध्ये अभूतपूर्व जीवित आणि वित्तहानी होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. ‘बिपरजॉय’चे वृत्त दि. ६ जून रोजी आल्याबरोबर ताबडतोब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र आणि राज्य सरकारांच्या सर्व संस्थांचा या वादळाचा सामना करण्याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला होता.

संपूर्ण प्रणाली तत्पर राहण्यासाठी आणि सर्व विभाग योग्य प्रकारे कार्यरत असण्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी स्वतः रात्री १ वाजेपर्यंत सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले होते. या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी विविध स्तरांवर अनेक बैठका झाल्या आणि सर्व संस्थांमध्ये माहितीचे आदानप्रदान करण्यात आले. ज्याचा परिणाम तसेच लोकांची जागरूकता आणि सहकार्यामुळे आपल्याला या आपत्तीतून कमीत कमी नुकसान होण्यात झाली. या चक्रीवादळामुळे केवळ ४७ जण नाममात्र जखमी झाले आणि २३४ जनावरे मृत्युमुखी पडली. राज्यातील ३ हजार, ४०० गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला, यापैकी १ हजार, ६०० गावांमध्ये २४ तासांच्या आत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, तर इतर सर्व गावांमध्ये आज संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे.

या चक्रीवादळामुळे भूस्खलन होण्याचा धोका होत्या. त्यामुळे प्रशासनाने १ हजार, २०६ गरोदर महिलांना सुरक्षित स्थळी हलविले होते. यादरम्यान ७०७ महिलांची यशस्वी प्रसूती झाली. याशिवाय १ लाख, ८ हजार, २०८ नागरिक आणि ७३ हजार जनावरांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. वादळात वाहणार्‍या जोरदार वार्‍यांमुळे वृक्ष उन्मळून पडू नयेत म्हणून याकाळात ३ लाख, २७ हजार, ८९० वृक्षांची छाटणी करण्यात आली आली. सर्व जिल्ह्यात एकूण ४ हजार, ३१७ मोठे फलकदेखील वेळेवर हटवण्यात आले. सुमारे २१ हजार,५८५ बोटी वेळेवर बंदरात नांगरण्यात आल्या, तसेच एक लाखांहून अधिक मच्छीमारांना किनार्‍यावर सुखरूप परत आणून त्यांना वाचवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ’एनडीआरएफ’च्या १९ बटालियन, ’एसडीआरएफ’च्या १३ बटालियन आणि दोन राखीव बटालियन यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवण्याचे काम केले. लष्कर, नौदल, वायुसेना, तटरक्षक दल, बीएसएफ, राज्य राखीव पोलीस आणि राज्य पोलिसांनी ‘एनडीआरएफ’ आणि ‘एसडीआरएफ’ यांच्याशी संपूर्ण समन्वयाने काम केले.

या वादळाशी लढताना गुजरात सरकारने नियोजनाचे उत्तम उदाहरण दाखविले आहे. सरकारचे सर्व विभाग, सर्व यंत्रणा, जिल्ह्यांचे प्रभारी मंत्री आणि खुद्द मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पूर्ण ताकदीने काम केले. त्याचा परिणाम असा झाला की, एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीतही गुजरातमध्ये मोठी हानी होऊ शकली नाही. चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ गुजरातच्या दिशेने कूच करत असताना मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी रविवार, दि. ११ जून रोजी तातडीची बैठक बोलावून राज्याच्या वरिष्ठ मंत्र्यांकडे किनारी जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली. चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व मंत्र्यांना वाटप झालेल्या जिल्ह्यांमध्ये तातडीने पोहोचण्याच्या सूचनाही दिल्या. या सर्व मंत्र्यांनी तातडीने आपापल्या जिल्ह्यांत पोहोचून कामाला सुरुवात केली. चक्रीवादळ त्या जिल्ह्यांतून जाईपर्यंत ते तिथेच राहिले. गृहराज्यमंत्री हर्ष संघवी सतत लोकांमध्ये होते. ते सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते आणि अधिकार्‍यांच्या संपर्कात होते. यादरम्यान, चक्रीवादळ आले तेव्हाही जोरदार वारा आणि पावसात काम करताना दिसले.

चक्रीवादळाचा तडाखा बसण्यापूर्वी राज्यातील संभाव्य बाधित भागात एकूण एक हजार, पाच वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली होती. बाधितांसाठी २०२ रुग्णवाहिका आणि ३०२ शासकीय रुग्णवाहिका अशा एकूण ५०४ रुग्णवाहिका वाटप करण्यात आल्या. संभाव्य बाधित भागात ३ हजार, ८५१ गंभीर बेडची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या भागात एकूण १९७ डीजी संचांचे वाटप करण्यात आले. आपत्तीपूर्वी केवळ मानवांचीच काळजी घेतली गेली असे नाही, तर गीरचे सिंह आणि अभयारण्यातील इतर प्राण्यांना इजा होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली. यासाठी, आशियाई सिंहांच्या परिसरात जलद बचाव कार्य आणि पडलेली झाडे हटवण्यासाठी एकूण १८४ पथके तैनात करण्यात आली होती. १३ ऑपरेशनल पथके आणि सहा विशेष वन्यजीव बचाव पथकेदेखील कच्छ अभयारण्य परिसरात आवश्यक उपकरणांसह तैनात करण्यात आली होती. रस्ते आणि इमारत विभागाने संभाव्य बाधित भागात ३२८ जेसीबी मशीन, २७६ डंपर, २०४ ट्रॅक्टर, ६० लोडर आणि २३४ इतर उपकरणांसह १३२ पथके आवश्यक उपकरणांसह सज्ज ठेवली आहेत.

या आपत्तीच्या काळात धर्मादाय संस्था आणि हिंदू मंदिरेही पुढे आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनाही लोकांच्या सेवेत व्यस्त होत्या. ’स्वामी नारायण संस्था’ आणि इतर संघटनाही मागे हटल्या नाहीत. विस्थापितांसाठी अन्न-पाण्याची व्यवस्था असो किंवा आगाऊ तयारी असो, सर्वांनी एकत्र येऊन काम केले, तर सर्व काही साध्य होते आणि ते गुजरातमध्ये पाहायला मिळाले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.