आज आषाढ शु.1 अर्थात महाकवी कालिदास दिन. तसेच, बुधवार, दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस, असे हे दोन्ही दिवस लागोपाठ येत आहेत. त्यानिमित्ताने कालिदासाच्या साहित्यातील योगशास्त्र शब्दबद्ध करणारा हा माहितीपूर्ण लेख...
योग ही भारतीय तत्त्वज्ञानातील प्राचीन, तरीही सर्वमान्य अशी बौद्धिक संपत्ती आहे, जी वेदातीत आहे. याच्या साधनेने अनेक आत्मे सदेह सिद्ध होऊन भवसागर पार करून गेले. योग हा सर्वसंमत मोक्षोपाय आहे. भारतीयांच्या दैनंदिन जीवनात, नैमित्तिक कर्मांत यम, नियम, आसन, प्राणायामादी योगाची अंगे अनुस्यूत आहेत. साहित्यक्षेत्रात पाहता एकमेवाद्वितीय असा प्रतिभासंपन्न महाकवी कालिदास आपल्या वैदर्भी शैलीने भुरळ घालतो, त्याचप्रमाणे अर्थगांभीर्याने समीक्षकांना तृप्त करतो. त्याची काव्ये रसपूर्ण आहेत, नाटके संवादसौंदर्याने परिपूर्ण आहेत, प्रसंगोपात्त अनेकविध शास्त्रचर्चा त्याच्या कृतींत आढळते, त्यांत योगविचारही वैपुल्याने आढळतो.
योगशास्त्र हे साध्य व साधन या दोन्ही अंगांनी कालिदासाने वर्णन केले आहे. कुमारसंभवातील पार्वतीचे कठोर तपाचरण, पतंजलीने क्रियायोगाचे अंग म्हणून जे तप सांगितले आहे, (समाधिभावनार्थः क्लेशतनूकरणार्थश्च। अर्थ - तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान ही क्रियायोगाची तीन अंगे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे पाच क्लेश कमी करण्याची साधने आहेत 2.2) त्याच्याशी मिळतेजुळते आहे. उमेला तिच्या लावण्याचा अभिमान होता. परंतु, त्याच्या बळावर शिवाला वश करण्याचे तिचे प्रयत्न व्यर्थ ठरले. तिचा अभिनिवेश हा क्लेश होता, त्याचे निरसन आवश्यक होते. अष्टांगयोगाचे दुसरे अंग, नियम (शौचः संतोष तपः स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमाः। अर्थ-बाह्याभ्यंतर शुचिता, अनायास मिळालेल्या गोष्टींत संतोष, शीतोष्णादी द्वंद्वे सहन करण्याचे शारीरिक मानसिक बळ, तत्त्वज्ञानाचा स्वाध्याय आणि ईश्वरार्पणवृत्ती 2.32) हा पार्वतीच्या तपाचा अविभाज्य घटक होता.
किसलयाहून कोमल जिची कांती, ती उमा जाडीभरडी वल्कले लेवून निबिड वनात राहू लागली, मऊ बिछाना सोडून शिळेवर झोपू लागली, आपोआप गळून पडलेली पाने खाऊन उदरभरण करू लागली, एवढेच नव्हे, तर अत्यंत कठीण असे पंचाग्निसाधन तिने केले. अखेर तिच्या तपाने तिने शिवाला जिंकले. योगिराज महेश्वराच्या समाधी अवस्थेचे प्रत्ययकारी वर्णन कुमारसंभवात येते. व्याघ्रचर्मावर पर्यंकबंधात स्थित नवद्वारांचे पिधान करून अर्धोन्मीलित दृष्टी नासाग्री स्थिर करून, शरीरांतर्गत वायूंचा निरोध करून शिवाने जी समाधी लावली (रघुवंश 3.44 आणि पुढील काही श्लोक) ती योगशास्त्रातील गूढतत्त्वांनुसार आहे, यात काही शंका नाही. भ्रूमध्यापासून ब्रह्मरन्ध्रापर्यंतचा हा मार्ग पश्चिममार्ग म्हणून ज्ञानेश्वरांनीही सांगितला आहे. (ज्ञानेश्वरी 6.159)तपःप्रभावाने प्राप्त होणार्या यौगिक सिद्धींचे वर्णन कुमारसंभवात येते. यासंबंधात पातंजलयोगसूत्र आहे,जन्मौषधि-मन्त्र-तपः समाधिजाः सिद्धयः अर्थ-सिद्धी पाच प्रकारच्या असतात, जन्माने प्राप्त, औषधीसिद्ध, मंत्रसाध्य, तपःसाध्य आणि समाधिने प्राप्त 4.1) कालिदासाचा योगशास्त्राचा सखोल अभ्यास असल्याशिवाय, असे नेमके संदर्भ त्याच्या काव्यात आले नसते.
शिवपार्वतीचा विवाह निश्चित करण्याकरिता सप्तर्षी मनोवेगाने, वायुवेगाने हिमालयाच्या नगरीत जातात, हे पतंजलीच्या कायाकाशयोः संबंधसंयमाल्लघुतूलसमापत्तेश्च आकाशगमनम् (3.42) अर्थ - शरीर व आकाशाचा संबंध आला असता संयमाने, चित्ताला कापसाप्रमाणे हलकेपणा प्राप्त होतो व जीव आकाशमय होतो, तो अवकाशात संचार करू शकतो, तसेच जलावरही चालू शकतो. जगद्गुरू आदि शंकरचाचार्यांच्या सनंदन नावाच्या शिष्याची कथा इथे स्मरते, हा गुरूच्या एका हाकेसरशी मागचापुढचा विचार न करता जमिनीवर ज्या सहजतेने चालावे, तसा पाण्यावर चालू लागला तेव्हा त्याच्या पावलाखाली कमळे फुलत गेली, म्हणून त्याला ‘पद्मपादाचार्य’ असे नाव प्राप्त झाले. दुसरे सूत्र आहे, ततो मनोजवित्वं विकरणभावः प्रधानजयश्च(3.48) अर्थ- स्थूल शरीरालाही तीव्रवेग, मनोजव प्राप्त होणे, भूत, भविष्य, वर्तमान या तीनही काळात मुक्त विहार करता येणे आणि प्रकृतीच्या 24तत्त्वांवर विजय प्राप्त होणे, या तीन सिद्धी प्राप्त होतात, या सूत्रांप्रमाणे कालिदासाने केलेले वर्णन चपखल वाटते.
रघुवंशात रघुराजाचा जन्मच मुळी निपुत्रिक दिलीप राजाने केलेल्या नंदिनी गाईच्या सेवारूप तपामुळे झाला, असे कालिदास लिहितो, तेव्हा तपाची (पतंजलीप्रणित नियम) महती अधोरेखित करतो. तेराव्या सर्गात अगस्त्य शातकर्णी, सुतीक्ष्ण, शरभंग, अत्री या मुनींच्या तपाचे वर्णन येते. परित्यक्त सीतासुद्धा रामाला संदेश पाठविते, प्रसूतेः पश्चात् सूर्यनिविष्टदृष्टिः तपश्चरितुं यतिष्ये। प्रसूतीनंतर सूर्यबिंबावर एकटक ध्यान करून तपः साधना करण्याचा प्रयत्न मी करेन (रघुवंश.14.66).शाकुंतलातील सातव्या अंकात तपस्व्यांचे उग्र तप वर्णित आहे. राजा दुष्यंत मातलीच्या रथात बसून स्वर्लोकातून भूलोकी येत असतानाचे हे वर्णन मोरिचाच्या आश्रमातील योग्यांचे उग्र तपाचरण दर्शवतो. शिवाय, काश्यप, मारीच, मेनका यांनाही अशा सिद्धी प्राप्त होत्या, हे शाकुंतलाच्या वाचनाने समजते. दुष्यंताने शकुंतलेचा स्वीकार केला नाही (शाकुंतल, पाचवा अंक) तेव्हा आपल्या कन्येची अधिक ससेहोलपट होऊ नये, म्हणून शकुंतलेची आई मेनका आकाशमार्गाने येते आणि तिला घेऊन अप्सरातीर्थाप्रती जाते, असे कालिदासाने लिहिले आहे.
योग केवळ साधन म्हणून न सांगता साध्य म्हणूनही कालिदास विशद करतो, तेव्हा रघुवंशातील राजांच्या वर्णनात तो सहज लिहून जातो, शैशवेऽभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्। वार्धके मुनिवृत्तीनां योगेनान्ते तनुत्यजाम्। योगाभ्यासाने मोक्षप्राप्ती हाही विषय कालिदासाने हाताळला आहे. रघुवंशात श्रीरामाच्या देहत्यागानंतर लक्ष्मणही शरयुतीरी योगाबलाने देहत्याग करतो (15.95), पुण्य नावाचा एक राजा योगसामर्थ्याने मुक्त होतो (18.33), कुमारसंभवात सती योगविसृष्टदेहा मेनेच्या पोटी उमा म्हणून जन्म घेते (3.58) असे उल्लेख येतात. रघुकुळातील सर्वच राजे धर्मनिष्ठ होते, असे असले, तरी ज्याच्या नावाने कुळाला अधिक प्रतिष्ठा मिळाली, त्या रघूच्या ब्रह्मपदप्राप्तीचे सूक्ष्मदर्शी वर्णन कालिदास करतो. दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यम् अर्थ - इहलोकी आणि परलोकी भोग भोगण्याविषयी ज्याची तृष्णा नाही, जो निःस्पृह झाला, त्याच्या वैराग्याला वशिकार वैराग्य म्हणतात, असे योगसूत्रात लिहिले आहे.(1.15) रघू प्रथम विरागी झाला, नंतर निःस्पृह झाला, मग योग्य आसनात बसून त्याने चित्त एकाग्र केले, मग प्रणिधानयोग्य समाधिच्या अभ्यासाने त्याने पाचही प्राण वश केले, नंतर त्रिगुणांवर विजय मिळवून निश्चलचित्त होऊन ऐक्यानुसंधान करून रघू परमात्मपदास प्राप्त झाला (8.10-22) असे सुरेख वर्णन कालिदास करतो, ते निश्चितच त्याच्या योगशास्त्राध्ययनाच्या बळावरच.
योगशास्त्रात अग्रेसर झाल्यावर ऋतंभरा प्रज्ञेचा आविष्कार होतो. निर्विचारवैशारद्ये अध्यात्मप्रसादः ऋतंभरा तत्र प्रज्ञा अर्थ- अभ्यासबळावर निर्विचार समापत्तीत रजतमोगुणांपासून निवृत्त होऊन केवळ सत्त्वस्थितीत राहणे, ज्याला ‘वैशारद्य’ म्हणतात, ते प्राप्त होते(1.47, 48) या प्रतिभेने योगी अतीत अनागत सर्व जाणू शकतो, असे पतंजलीचे सांगणे आहे. कालिदास स्वप्रतिभेने धरणीपासून स्वर्गापर्यंत लीलया विहार करतो, आकाशमार्गाने पृथ्वीवरील स्थळांची वर्णने करतो. जसे, आकाशमार्गाने जाणारे अतिमानवी जीव आणि त्यांना दिसणारे मनोहारी दृश्य, अमरकंटकाच्या शिखरावर ओठंगून राहिलेला काळाशार मेघ जणू भूमातेचा स्तन, चर्मण्वतीनदीच्या मध्यभागी येऊन जलपान करणारा मेघ म्हणजे जणू मोत्याच्या एकावलीत जडवलेला इंद्रनीलमणी अशा अनेक उत्प्रेक्षा कालिदास रंजकतेने मांडतो. (पहावे मेघदूत, रघुवंशात रामाने पुष्पकविमानातून अयोध्येचे केलेले वर्णन)
योगशास्त्रातील अनेकानेक बारकावे कालिदासाने त्याच्या काव्यनाटकांमधून सांगितले आहेत. तो एक द्रष्टा आणि विचारवंत कवी होता, हे कविलक्षणावरून प्रमाणित करता येते. दर्शनं वर्णनं चेति द्विविधं कवेर्लक्षणम्, अशी कवीची व्याख्या आहे. कवीला द्रष्टेपण हवे, असूर्यंपश्य गोष्टीही त्याला प्रतिभेच्या बळावर पाहता यायला हव्यात आणि त्यांचे सूक्ष्मवर्णनही करता यायला हवे. कालिदास त्याच्या विविध शास्त्रज्ञानामुळे दूरदर्शी होता, साक्षात काली मातेच्या प्रसादाने त्याच्यात दैवी प्रतिभेचा जागर झाला होता, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्याखेरीज त्याच्याकडे अद्भुत वर्णनशैली आहे, अर्थगर्भ शब्दसंपदा आहे, वृत्तांचे वैविध्य आहे, अलंकारांचा, विशेषत्वाने अर्थालंकारांचा यथायोग्य वापर करण्याची कुशलता आहे, सोप्या संवादांतूनही वैश्विक सत्य सांगण्याची कला आहे, त्यामुळे तो कवीच्या द्वितीय लक्षणाच्या कसोटीलाही उतरतो.
सुश्रुताचार्यांनी म्हटले आहे, एकं शास्त्रम् अधीयानो न विद्यात् शास्त्रनिश्चयम्। तस्मात् बहुश्रुतः शास्त्रं विजानीयात् विचक्षणः॥ केवळ एकांगी अध्ययन करणारा बहुश्रुत होत नाही, त्यासाठी विविध शास्त्रग्रंथांचा सांगोपांग अभ्यास आवश्यक ठरतो. सध्या शिक्षणक्षेत्रात जी नवी प्रणाली सांगितली आहे, ती बहुशाखीय अध्ययन आणि आंतरशाखीय अध्ययन या दोन्हींवर अधिक भर दिला आहे. सर्वांगीण विकासासाठी हे मापदंड सांगितले आहेत. कालिदासाच्या कृतींचा परामर्श करताना हे प्रकर्षाने जाणवतं की, हा असामान्य प्रतिभेचा, नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेचा अखंड उपासक आहे. कालिदास हा दर्शनामुळे ऋषी होता आणि विचित्र भाव धर्मांश वर्णनामुळे कवी होता, हे निस्संशय!यादिवशी त्या कविकुलगुरूचे कृतज्ञातापूर्वक स्मरण करून सर्व वाचकांना योगदिवसाच्या शुभेच्छा देते!
-डॉ. गौरी माहुलीकर
(लेखिका ’चिन्मय इंटरनेशनल फाऊंडेशन’, आदि शंकर निलयम्, वेलियनाड, केरळ येथे अॅकेडमिक डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत.)