बिहारच्या राजकारणामध्ये नितीश कुमार हे आपल्याच अतर्क्य निर्णयांमुळे अडचणीत येत असल्याचे चित्र आहे. काही महिन्यांपूर्वीच उपेंद्र कुशवाह यांनीदेखील नितीश कुमार यांची साथ सोडली आहे. आता मांझीदेखील त्याच मार्गाने जात आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सध्या २०१८ सालच्या चंद्राबाबू नायडू यांच्या अवतारात आले आहेत. त्यावेळी चंद्राबाबू नायडू हे भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी राज्याराज्यांमध्ये फिरत होते. त्याचवेळी आपल्याच राज्यात नेमकी राजकीय हवा काय आहे, हे त्यांना ओळखता आले नव्हते. परिणामी भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व दूरच राहिले, पण गृहराज्यातच त्यांचा पराभव झाला होता. आता नितीश कुमार यांनीदेखील दि. २३ जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.
या बैठकीस काँग्रेस, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, भारत राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, द्रमुकचे स्टालिन आदी नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते. अर्थात, या बैठकीमध्ये नितीश कुमार यांचा वरचश्मा कितपत असेल याविषयी संभ्रम आहे. कारण, काँग्रेसने या बैठकीस सहभागी होण्याचा सध्या, तरी होकार दिला आहे. मात्र, बैठकीमध्ये नितीश कुमार आणि अन्य प्रादेशिक पक्षांच्या सुरात सूर मिसळण्यास काँग्रेस सहजासहजी तयार होणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यातच या बैठकीत उपस्थित राहणार्या सर्वच नेत्यांना आपापल्या राज्यामध्ये असलेली आव्हाने कमी नाहीत. यामध्ये नितीश कुमार यांचाही समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारण करता करता राज्याच्या राजकारणातही अस्तित्व न उरलेल्या चंद्राबाबू यांच्याप्रमाणे नितीश कुमार यांची स्थिती होऊ शकते.
बिहारच्या राजकारणामध्ये उपेंद्र कुशवाह यांच्यानंतर आता जीतन राम मांझी यांनी नितीश कुमारांपुढे आव्हान उभे केले आहे. हिंदुस्थान आवाम पार्टीचे अध्यक्ष जीतन राम मांझी यांचे पुत्र संतोष मांझी यांनी बुधवारीच नितीश यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. मात्र, अद्यापही ते महागठबंधनचा भाग आहेत. नितीश यांच्या सरकारमध्ये संतोष मांझी यांच्याकडे अनुसूचित जाती - जमाती मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. राजीनाम्यानंतर संतोष मांझी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या पक्षाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे सांगितले. पक्ष वाचवण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला आहे. आता त्यांचा पक्ष भाजपप्रणित एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत बोलताना त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेले नाही. त्याचप्रमाणे नितीश कुमार यांनी यापूर्वीही आपल्या पक्षाच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव मांडला होता, असा दावा त्यांनी केला. दुसरीकडे, दि. २३ जून रोजी पाटणा येथे होणार्या विरोधी पक्षांच्या बैठकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “नितीश कुमार हे आमच्या पक्षाचे अस्तित्वच मान्य करत नाहीत.” त्यामुळे आमच्या पक्षाला २३ रोजी होणार्या बैठकीचे निमंत्रण दिले नसल्याचेही संतोष मांझी यांनी सांगितले आहे.
जितनराम मांझी यांनीदेखील आपल्या मुलाच्या सुरात सूर मिसळला आहे. एकेकाळी नितीश कुमार यांचे अत्यंत विश्वासू असलेले जितनराम आज नितीश यांचे विरोधक झाले आहेत. जितनराम मांझी यांचा राजकीय प्रवासही अतिशय रंजक आहे. त्यांचा प्रवास काँग्रेसमधून सुरू झाला. १९८० मध्ये ते पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर गयाच्या फतेहपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. १९८३ मध्ये ते चंद्रशेखर सिंह यांच्या काँग्रेस सरकारमध्ये पहिल्यांदा राज्यमंत्री झाले. त्यानंतर जवळपास चार दशकांच्या राजकीय प्रवासात मांझी यांनी तीन पक्षांच्या माध्यमातून स्वत:चा पक्ष स्थापन करण्याचा प्रवास पूर्ण केला आहे. यादरम्यान बिहारमध्ये मुख्यमंत्री बदलत राहिले, पण काही प्रसंग वगळता मांझी बहुतांश सरकारांमध्ये मंत्री राहिले. १९९० मध्ये बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव झाला.
मांझी यांचाही निवडणुकीत पराभव झाला. बिहारच्या राजकीय क्षितिजावर लालू यादवांचा उदय झाला. निवडणुकीतील पराभवानंतर मांझी लालू यादव यांच्या जनता दलात गेले. त्यानंतरही १९९५च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. १९९६ मध्ये लालू यादव यांनी ‘आरजेडी’ची स्थापना केली, तेव्हा मांझी त्यात सामील झाले. त्याच वर्षी त्यांनी ‘आरजेडी’च्या तिकिटावर पोटनिवडणूक जिंकली आणि राबडीदेवी यांच्या सरकारमध्ये मंत्री बनले. त्यानंतर २००५ मध्ये फेब्रुवारीमध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुका झाल्या. ‘राजद’ला सरकार स्थापन करता आले नाही. राष्ट्रपती राजवट लागू केली. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मांझी यावेळी नितीश कुमार यांच्यासोबत होते. बाराछत्तीतून ती निवडणूक जिंकून नितीश सरकारमध्ये मंत्री झाले. एका घोटाळ्यामुळे राजीनामा देण्याची वेळ आली होती. त्या प्रकरणात निर्दोष मुक्त होताच, नितीश २००८ मध्ये मंत्रिमंडळात परतले. २०१०च्या निवडणुकीत जेहानाबादमधील मखदुमपूर मतदारसंघातून विजयी होऊन ते पुन्हा मंत्री झाले.
पुढे २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ‘जेडीयु’च्या दारूण पराभवानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ‘जेडीयु’मध्ये त्यांची जागा घेण्यासाठी अनेक दावेदार होते. पण, त्या लोकसभा निवडणुकीत गया येथून तिसर्या क्रमांकावर राहिलेल्या जीतनराम मांझी यांना खुर्ची देण्यात आली. नितीश मुख्यमंत्रिपदावर परत आल्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये मांझी यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी ‘हिंदुस्थानी अवाम मोर्चा’ नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि ते भाजपसोबत आले. त्यावेळी भाजपचा पराभव झाला आणि मांझी यांच्या पक्षास केवळ एक जागा मिळाली. त्यानंतर मांझी यांनी पुन्हा ‘महागठबंधन’ची साथ धरली. पुढे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मांझी यांचा पराभव झाला आणि ते पुन्हा ‘एनडीए’कडे केले, त्याचवेळी नितीश कुमार यांनीही ‘एनडीए’मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर नितीश कुमार यांनी पुन्हा सवयीप्रमाणे भाजपसोबतची युती तोडून ‘राजद’ला सोबत घेतले, त्यावेळी मांझीदेखील नितीश यांच्यासोबत आले आणि आपला मुलगा संतोष मांझी यास मंत्रिपद मिळवून दिले.
बिहारच्या राजकारणामध्ये नितीश कुमार हे आपल्याच अतर्क्य निर्णयांमुळे अडचणीत येत असल्याचे चित्र आहे. काही महिन्यांपूर्वीच उपेंद्र कुशवाह यांनीदेखील नितीश कुमार यांची साथ सोडली आहे. आता मांझीदेखील त्याच मार्गाने जात आहेत. दुसरीकडे ‘राजद’च्या तेजस्वी यादव यांनी नितीश यांना अतिशय शांततेत कोंडीत पकडण्यास प्रारंभ केला आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वीच राजीनामा देऊन मांझी यांनी अतिशय ‘परफेक्ट टायमिंग’ साधले आहे. त्याचवेळी उपेंद्र कुशवाह, चिराग पासवान आणि जीतन राम मांझी मांझी यांनी ‘एनडीए’मध्ये प्रवेश केल्यास बिहारमध्ये प्रामुख्याने दलित मतदार नितीश कुमार यांच्यापासून दुरावण्याची भीती आहे. त्यामुळे सध्या तरी बिहारच्या राजकारणामध्ये ओ ‘मांझी’ रे हे नवे गीत सुरू झाले आहे.