‘ती’चे पाच दिवस...

    10-Jun-2023
Total Views |
Seva Sahyog Foundation World Menstrual Hygiene Day

दरवर्षी दि. २८ मे रोजी साजर्‍या होणार्‍या ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिना’निमित्त किशोरी विकास प्रकल्प ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’तर्फे दि. १४ मे रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच मातृदिनाचे औचित्य साधून या स्पर्धेची प्राथमिक व अंतिम फेरी जिल्हास्तरावर घेण्यात आली. या स्पर्धेसाठी मुंबई, रायगड, पालघर, नवी मुंबई आणि ठाणे अशा विभागांतून एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच ही स्पर्धा १२-१८ अशा वयोगटाची गट क्र. १ व १९-२५ आणि २५च्या पुढे असा दुसरा गट, अशा दोन गटांमध्ये झाली. समाजात असलेल्या मासिकपाळीविषयी श्रद्धा-अंधश्रद्धा, गैरसमजुती याविषयी आपापल्या शैलीत भाष्य करून आजच्या या तरुणपिढीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले होते. तेव्हा, या स्पर्धेतील पहिल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या सिद्धी मयेकर, वय वर्षे १७ हिचे स्पर्धेतील भाषण लेख स्वरुपात देत आहोत.

बोरिवलीत अडगळीत टाकलेल्या सॅनिटरी पॅडमध्ये पालीचे पिल्लू येते. मुलगी ते न बघताच वापरते आणि अवघ्या काही दिवसांतच तिचा इन्फेक्शनने मृत्यू होतो, तर उल्हासनगरमध्ये ३० वर्षांचा भाऊ आपल्या लहान बहिणीच्या कपड्यांवर तिच्या पहिल्या पाळीचे डाग बघतो आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारून टाकतो. या दोन्हीही दुर्दैवी घटनांमागचे कारण काय? तर मासिक पाळीला संकुचित विचारसरणीच्या भल्या मोठ्या भिंतींमध्ये डांबून ठेवण्याचा अट्टाहास, ज्यामुळे समाजात मासिक पाळीबद्दल अज्ञान निर्माण होते आणि वेळ येते ती तिच्यावर बोलण्याची!

सन्माननीय परीक्षक, व्यवस्थापक आणि इतर सर्वांना, मी सिद्धी नागेश मयेकर नमस्कार करते आणि ‘ती’चे पाच दिवस’ या विषयावरचे माझे विचार व्यक्त करते. ती पाचवी-सहावीत असेल तेव्हा, जेव्हा तिने ‘पाळी’ हा शब्द पहिल्यांदा ऐकला. एरवी कावळा शिवायचा आईला, मग पाळी म्हणजे नक्की काय? असा प्रश्न तिला पडला. ’‘थोडं पोटात दुखेल तुझ्या, पण ते सहन करायचं; अपवित्र तू असशील तेव्हा, त्यामुळे थोडं लांबच राहायचं; कितीही त्रास झाला तरी मलाच येऊन सांगायचं ; बाबा-दादाच्या कानावर याबद्दल काहीच पडू नाही द्यायचं!”

आईच्या सूचनांनी पाळी येण्यापूर्वीच तिला पाहिजे भीती वाटू लागली. बिचार्‍या तिला पाळीची दुसरी बाजू कळूच नाही शकली!
मित्रांनो, मासिक पाळीचे चक्र २८ दिवसांचे असते. प्रत्येक चक्रात तिच्या गर्भाशयात गर्भाला आधार देणारे जाडे अस्तर (एंडोमेट्रियम) बनते. दर चक्रात तिच्या लाखो बीजांडांमधून एक बीजांड पूर्णपणे विकसित होते आणि ते शुक्राणूची वाट बघते. जर शुक्राणू आले तर गर्भधारणा होते, पण जर गर्भधारणा झालीच नाही तर निकामी असलेले एंडोमेट्रियम, रक्त श्लेष्मा, उत्तक हे सारे तिच्या योनीद्वारे बाहेर पडते. हीच ती पाच दिवसांची तिची मासिक पाळी जिच्यात : ३०-४० मिली इतका रक्तस्राव होतो. तिच्या गर्भाशयात स्नायूंचे आकुंचन झाल्यामुळे तिची कंबर-पोट दुखते, पायात गोळे येतात. दरम्यान सुरू असलेल्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे तिच्यात स्वभावाच्या लहरी दिसून येतात. मित्रांनो, तारुण्यात सुरू झालेली तिची मासिक पाळी तिच्या ‘मेनोपॉस’पर्यंत अंदाजे ४५० वेळा येते

तुम्हाला एक गंमत सांगू का? स्त्रियांमध्ये त्यांच्या बीजांडांची निर्मिती त्या जेव्हा त्यांच्या आईच्या गर्भात असतात तेव्हाच झालेली असते. म्हणजेच काय तर तिच्या जन्माच्या आधीच तिच्यात नवा जीव जन्माला घालण्याची क्षमता येते. किती अद्भुत आहे हे, नाही का?

आता पुढे तिचे काय झाले ते ऐकूयात!

तिला पहिल्यांदा पाळी आली, तेव्हा आईने त्याचा सोहळा केला होता. तिला मात्र बाई झाल्याचा मुळीच आनंद नव्हता. कारण, दिवसभर फक्त स्कर्टकडे लक्ष ठेवायचं. रात्रभर बाथरूममध्ये कंबर मोडेपर्यंत कापड दिवस धुवायचं. एक सॅनिटरी पॅड दिवसाला, तो ही कागदा चापून-चोपून गुंडाळलेला; कितीही वाटलं तरी मऊ गादी नाही, थंड लादीवर लागायचं झोपायला.
पाळीच्या नंतर रॅशेस आणि इन्फेक्शन व्हायचं. मग ते बरं होईपर्यंत पुढल्या पाळीने आठवड्याभरावर येऊन पोहोचायचं. कहर तर तेव्हा झाला जेव्हा ‘नीट’च्या परीक्षेच्या दिवशी तिला पाळी आली. ७०० मार्क आणू शकणारी ती जेमतेम ५०० मार्कच चालू शकली...!
मित्रांनो, वास्तवात स्त्रिया कितीही भरारी घेत असल्या तरी अनेकदा त्या त्यांच्या पाळीच्या दिवसांत त्यांचे सर्वोत्तम नाही देऊ शकत. पण, त्याची तक्रार त्या कधीच करत नाही. शिवाय भारतात आजही मासिक पाळीच्या निगडित स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. भारतात आजही निम्म्याहून अधिक महिला कापड वापरतात. शिवाय ज्या काहीही सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पोन वापरतात, त्यातल्या कितीतरी जणी त्याची नीट विल्हेवाटसुद्धा नाही लावू शकत ; ज्यामुळे स्वच्छता कामगारांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे सरकारने ठिकठिकाणी सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन सारख्या मशिन्सची स्थापना तर करायला हवीच; पण स्वच्छतेची जबाबदारी स्त्री-पुरुष अशा प्रत्येकाने घ्यायला हवी.

अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे, मासिक पाळीच्या निगडित स्त्रियांवर लादलेल्या बंदी, ज्या हुंडा घेणे, बालविवाहाप्रमाणे नक्कीच गुन्हा म्हणून घोषित कराव्यात. अहो, आयुर्वेदात सुद्धा लिहून ठेवले आहेच की-

रजः प्रवर्तते यस्मान्मासि मासि विशोधयत्।
सर्वान् शरीर दोषांश्च न प्रमेहोस्त्यतस्त्रियाः॥
म्हणजेच मासिक पाळीमुळे स्त्रियांच्या शरीरातून त्यांच्या दोषांची शुद्धी होते. मग अशी ही ती तिच्या पाच दिवसांत अपवित्र कशी असू शकते? खंत हीच वाटते की, भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही आजही लोकांमध्ये वैचारिक स्वातंत्र्य दिसून येत नाही, ज्याचा खूपच वाईट पद्धतीने प्रभाव पडतो तो तिच्यावर...!

हळूहळू तिची पाळी अनियमित होते. ’गेला डोक्याचा ताप’ म्हणत ती मुद्दामूनच दुर्लक्ष करते. नंतर लक्षात येतं - तिला तर ‘पीसीओडी’ झालाय! लळ आई होण्यासाठी तिला करावाच लागणार काहीतरी उपाय!

अनियमित पाळी, जोरदार रक्तस्रावासारख्या अनेक समस्यांकडे स्त्रिया दुर्लक्ष करतात, ज्यामुळे भविष्यात त्यांना ‘पीसीओडी’ , ‘पीएमएस’, ‘मेनोरेजिया’सारखे आजार होतात. सकस आहार, संतुलित वजन, व्यायाम इत्यादी घटकांमुळे स्त्रियांची पाळी नियमित राहते. नियमित मासिक पाळी म्हणजे उत्तम आरोग्य आणि उत्तम गर्भाची क्षमता. पण, तिला तिच्या पाळीचे महत्त्व ठाऊकच नाही! म्हणूनच तिच्या पाच दिवसांवर इथे सर्वांसमोर बोलण्याची वेळ आली आहे. कारण, ती एकटी नाही ; तिच्यासारख्या अशा लाखो महिला आहेत, ज्या त्यांच्या महत्त्वाच्या पाच दिवसांना कमी लेखतात आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे तिच्यासोबत त्याला सुद्धा तिच्या पाच दिवसांबद्दल कळाले पाहिजे. शेवटी तिचे काय झाले ते ऐकूयात -
मेनोपॉज आल्यावर आनंद नाही तर खंत राहिली तिच्या मनात... कारण, तेव्हाच तर आलं ना तिच्या लक्षात की, पाळी तिची सजा नाही, ती तर होती तिची सखी...
चूक विचारांची होती, पाळीची नाही!
आता आपण काय करायचं...?
आपण आता तिच्या पाच दिवसांसाठी, तिला भेटायला जाऊ दिशा दहाही...
न थकता तिलाच आपण, तिच्यावर बोलू काही;
तिच्यासाठी करू काही!