...तरच सुसरींना सुदिन!

    08-May-2023   
Total Views |
Gharial

‘घडियाल’ अर्थात मराठीत ‘सुसर’ म्हणून ओळखली जाणारी मगरीची एक प्रजाती. जगातील सर्व मगरींच्या लांब प्रजातींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी ही प्रजाती. लांब अरुंद तोंड आणि तीक्ष्ण दातांमुळे मासे आपले खाद्य म्हणून पकडण्यात तरबेज असणारी ही सुसर उत्तर भारतीय उपखंडात विकसित झाल्याची शक्यता वर्तवली जाते. सुसर ही जलचर प्राणी असून केवळ ऊन शेकण्यासाठी किंवा घरटे बनवण्यासाठीच ती किनार्‍यांवर आल्याचे दिसते.

ऐतिहासिकदृष्ट्या भारताबरोबरच पाकिस्तान, बांगलादेश या दोन देशांत तसेच भुतान आणि नेपाळच्या दक्षिण भागातील नद्यांमध्ये सुसरी आढळून येत असत. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी झालेली असून आजतागायत त्या फक्त भारत आणि नेपाळच्या नद्यांमध्ये टिकून आहेत. पाकिस्तान, भुतान आणि म्यानमार या देशांमध्ये स्थानिक पातळीवर सुसर नामशेष झाल्याचे सर्वेक्षणांती निदर्शनास आले आहे. असे असतानाच भारतातील बिहारमधील गंदक या नदीमध्ये सुसरींची लक्षणीय संख्या आढळून येणं, हे काहीसं आशादायी चित्र आहे.
 
मध्य प्रदेशातील चंबल अभयारण्यानंतर बिहारमधील गंदक नदी हे भारतातील सुसरींचे दुसरे यशस्वी प्रजनन ठिकाण बनले आहे. अलीकडेच झालेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, गंदक नदीत एकूण ३७ प्रौढ, ५० उप-प्रौढ, ४९ अल्पवयीन तर ८१ पिल्ले एवढ्या सुसरींचा अधिवास आढळून आला. बिहार सरकारने सुसर संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचे यश म्हणून की काय - गंदक बॅरेच ते रिवा घाटापर्यंत या २८४ किलोमीटरच्या पट्ट्यात दि. २१ ते २८ फेब्रुवारी दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात २१७ सुसरींची नोंद करण्यात आली आहे. या आकडेवारीची माहिती प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. के. गुप्ता यांनी नुकतीच ‘पीटीआयशी’ (प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया) बोलताना दिली होती.

काही वर्षांपूर्वी भारत आणि नेपाळमधील काही भागांमध्ये बंद अधिवासात सुसरींचे प्रजनन करून नामशेष होण्यापासून त्यांचा बचाव करण्यात आला. भारतातील बिहारच्या पाटणा प्राणिसंग्रहालयामध्ये सुसरीचे बंद अधिवासात प्रजनन केले गेले. बंद अधिवासात प्रजनन केलेल्या ३० सुसरी २०१४ मध्ये गंदक नदीत सोडण्यात आल्या होत्या. सुसरींच्या प्रजननाचा हा प्रकल्प ‘वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’च्या (थढख) समन्वयातून राबवला गेला होता. अलीकडच्या सर्वेक्षणात त्यांच्या संख्येत झालेल्या लक्षणीय वाढीमुळे गंदक नदी हे सुसरींसाठीचे राखीव क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी स्थानिक अधिकार्‍यांची मागणी आहे.

चक्रीवादळ, अस्थिर अधिवास, नदीकाठची धूप आणि पावसासह पाण्याच्या पातळीत सतत होणारे चढ-उतार, धरणांमधून सोडले जाणारे पाणी, या सर्व नैसर्गिक तसेच मानवनिर्मित घटकांचा गंदकमधील सुसरींच्या प्रजनन क्षमतेवर आपत्तीजनक परिणाम करत असल्याचे अनेक वर्षांच्या अभ्यासात दिसून आले आहे. गंदक नदीवर प्रस्तावित वाळू उत्खनन प्रकल्पांमुळेही सुसरींच्या अधिवासाला धोका निर्माण झाला.
 
‘संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित केलेला भूभाग ‘वन्यजीव संवर्धन कायदा १९७२’ अन्वये संरक्षित होतो. तसेच, या भूभागात त्या विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी विविध संशोधन प्रकल्प राबवता येतात. त्याचबरोबर बंद अधिवासातील प्रजननासाठीही संशोधकांना प्रकल्प करता येतात. गंदक नदीला सुसरींसाठीचे संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केल्यास सुसर या जगभरात नामशेष होत असलेल्या प्रजातीचे संवर्धन अधिक चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल. चेन्नईमधील ‘मद्रास क्रोकोडाईल बँक’मध्ये त्यांचे ‘इन्सिटू’ (म्हणजेच प्राण्याच्या नैसर्गिक अधिवासातच त्यांचे संवर्धन) संवर्धन केले जाते.

जैवविविधतेतील प्रत्येक घटकाचे आपापले असे वेगळे महत्त्व आहे. मगर प्रजातीतील ही सुसर नदीपात्रातील तळापासून पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत पोषक घटकांचे वितरण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ म्हणजेच (खणउछ) च्या ‘रेड लिस्ट-क्रिटीकली एन्डेजर्ड’ म्हणजेच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली प्रजात आहे. त्यामुळेच जगभरात केवळ भारत आणि नेपाळमध्ये शिल्लक असलेल्या या प्रजातीसाठी संवर्धित राखीव क्षेत्र करणे गरजेचे आहे.

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.