हिंदू समाजाला हमीद दलवाईंच्या गरजेपेक्षा मुस्लीम समाजाला शेकडो हमीद दलवाईंची गरज आहे, मुस्लीम समाजसुधारकांची गरज आहे. राज्यघटनेचा तत्वविचार आणि मूल्यविचार हा मुस्लीम परंपरेतून आलेला नाही. त्यांची मुळे भारतीय दर्शनात, चिंतनात आणि मूल्यव्यवस्थेत आहेत. मुसलमानांनी प्रथम भारतीय होणे गरजेचे आहे. स्वतःला सोयीचे असेल तेव्हा राज्यघटना आणि गैरसोयीचे असेल तेव्हा पवित्र कुराण आणि हदीसचा आधार, अशी दुटप्पी वृत्ती चालणार नाही.
जो समाज गतिशील असतो, तो समाज जीवंत समाज समजला जातो. समाजाची गतिशीलता म्हणजे जसजसा काळ बदलत जातो, तसतसा समाजही आपल्यात बदल करून घेतो. बदलाचे हे काम सोपे नसते. यथास्थितीवादी लोकांचा बदलास विरोध असतो. परंपरेने चालत आलेल्या रूढी आणि परंपरा जर काल फायदेशीर होत्या, तर त्या आज का नाही, असा विचार समाजातील काही लोक करतात. बदल का आवश्यक आहेत, हे समाजातील थोर आणि कर्ते पुरूष सांगतात. त्यांना प्रथम विरोध होतो. परंतु, नंतर त्यांचे म्हणणे लोक स्वीकारतात, असा आपल्या हिंदू समाजाचा अनुभव आहे.
राजा राममोहन रॉय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी समाजसुधारकांची दीर्घ परंपरा हिंदू समाजाला लाभली आहे. महाराष्ट्राचा विचार करता, न्यायमूर्ती रानडे, आगरकर, लोकहितवादी महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, महर्षी कर्वे, बाया कर्वे अशी शेकडो नावे घ्यावी लागतात. या सर्वांच्या कामामुळे आज आपण जे आहोत, ते घडलो आहोत आणि समाजाने आपल्या भावविश्वात या सर्वांना मानाचे स्थान दिले आहे.भारतातील मुस्लीम समाज हा स्थितीवादी समाज आहे. त्यात बदल घडवून आणणे अतिशय कठीण काम आहे. ‘मुस्लीम सत्यशोधक समाजा’ची निर्मिती करून हमीद दलवाई यांनी मुस्लीम समाज सुधारण्याचे काम सुरू केले. त्याची काही तात्विक मांडणी त्यांनी केली. ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यांचा वसा पुढे चालविण्याचे काम शमसुद्दीन तांबोळी यांच्यासारखे समाजसुधारक करताना दिसतात. त्याचे स्वागतच केले पाहिजे. पण, त्यांनी लेखात लिहिलेले ‘हिंदू समाजाला हमीद दलवाई सारख्यांची गरज आहे,’ हे वाक्य मात्र पचनी पडणे कठीण आहे.
शेकडो हमीद दलवाई हिंदू समाजाने यापूर्वी निर्माण केले आणि आजही निर्माण होत आहेत. अण्णा हजारे, पोपटराव पवार, जलक्षेत्रात काम करणारे दिवंगत साळुंखे, शेतकरी आंदोलन करणारे शरद जोशी, सिंधुताई सपकाळ अशी या पिढीतील अनेकांची नावे घेता येतात. या सर्वांचा सन्मान हिंदू समाजाने आपली परंपरा राखत केला आहे. हिंदू समाजाला हमीद दलवाईंच्या गरजेपेक्षा मुस्लीम समाजाला शेकडो हमीद दलवाईंची गरज आहे, मुस्लीम समाजसुधारकांची गरज आहे. राज्यघटनेचा तत्वविचार आणि मूल्यविचार हा मुस्लीम परंपरेतून आलेला नाही. त्यांची मुळे भारतीय दर्शनात, चिंतनात आणि मूल्यव्यवस्थेत आहेत. मुसलमानांनी प्रथम भारतीय होणे गरजेचे आहे. स्वतःला सोयीचे असेल तेव्हा राज्यघटना आणि गैरसोयीचे असेल तेव्हा पवित्र कुराण आणि हदीसचा आधार, अशी दुटप्पी वृत्ती चालणार नाही. राज्यघटनेने स्त्री-पुरूष समानता, जातीभेदास नकार, विचार अभिव्यक्तिस्वातंत्र्य, उपासना स्वातंत्र्य, सर्वांना दिले आहे. मुस्लीम समाजाने ही मूल्ये स्वीकारली आहेत का? ‘मुस्लीम सत्यशोधक समाजा’ने ती स्वीकारली आहेत, एवढे म्हणून पुरेसे नाही.
ज्या मुस्लीम मुल्ला-मौलवींचे प्रभुत्व मुस्लीम समाजावर आहे, त्यांनी ही मूल्ये स्वीकारली का? आणि ती त्यांनी स्वीकारावीत म्हणून ‘मुस्लीम सत्यशोधक समाज’ कोणते प्रयत्न करीत आहे, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.हिंदू समाज झपाट्याने विज्ञाननिष्ठ बनत चालला आहे. संविधान साक्षरतेचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. कालचे स्त्रियांचे प्रश्न आज अस्तित्वहीन होत चालले आहेत. जातीयता आणि अस्पृश्यता समाजजीवनातून संपली पाहिजे, याबाबतीत बहुसंख्य हिंदूंचे मत सारखेच असते. या संदर्भात मुस्लीम समाजाची तुलना केली असता, परिस्थिती अंधकारमय आहे हे लक्षात येते. मुंबईसारख्या उकाड्याच्या शहरात काळ्या बुरख्यात फिरणार्या मुस्लीम माताभगिनी बुरख्यातून कधी बाहेर पडणार, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. हे काम मुस्लीम समाजातील समाजसुधारणा करू इच्छिणार्या सत्यशोधक मुस्लीम बांधव आणि भगिनींनी केली पाहिजे. त्यांनी जोरदार चळवळ सुरू केली, तर सुजाण हिंदू त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देतील.